पावसाच्या दणक्‍याने रस्त्याची झाली तळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

कोल्हापूर - सलग दुसऱ्या दिवशीही पडणाऱ्या संततधार पावसाने शहरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांना आज तळ्याचे स्वरूप आले. महापालिकेने मुख्य नाले आणि चॅनेल साफ केले नसल्याचेच यावरून आज स्पष्ट झाले. गजबजलेल्या स्टेशनरोडवर शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या दारातच पाण्याचे तळे निर्माण झाल्याने या मार्गावरील वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात झाली. व्हीनस कॉर्नर, कावळा नाका, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, परिख पूल टेंबलाई नाका शहरात ठिकठिकाणी अशी पाण्याची तळी साचली होती. त्यामुळे रस्त्यावरची पाण्याची तळी, वाहतुकीची कोंडी यामुळे शहरवासीयांची अक्षरशा दैना उडाली.

दोन दिवसांपासून संततधार पाउस सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी नाले आणि चॅनेल सफाई केली जाते. मुख्य नाले साफ केल्याचा महापालिकेचा दावा होता, पण अनेक ठिकाणी हे चॅनेल साफ झाले नसल्याचेच स्पष्ट झाले. वाहतुकीने नेहमी गजबजलेल्या स्टेशन रोडवर लिशा हॉटेल चौक, कावळा नाका, दाभोळकर कॉर्नर, शाहूपुरी पोलिस ठाणे आणि व्हीनस कॉर्नर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून राहिले. शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या दारात गुडघाभर पाणी होते. आयआरबी कंपनीने रस्ते करताना रस्त्यालगत बांधलेल्या गटारीतूनच पाण्याचा निचराच होत नसल्याचे वास्तव उघड झाले आहे. या गटारीच साफ होत नसल्याचे आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी सांगितले.

दाभोळकर चौक ते सासने मैदान या रस्त्यावर वायल्डर मेमोरियल चर्चकडे जाणाऱ्या कॉर्नरवरही पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते. यामुळे नवा कोरा रस्ता खराब झाला आहे, तर बेकर गल्लीतून पर्ल हॉटेलकडे गेलेल्या रस्त्याचीही पावसाने दुरवस्था झाली आहे.

राजाराम रोडवर पार्वती टॉकीजवळही पाण्याचे तळे निर्माण झाले आहे. गटारी साफ केले नसल्याचा हा परिणाम दिसून आला. त्याचबरोबर राजारामपुरी जनता बझार चौक ते लॉ कॉलेज चौक या रस्त्यावरही पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी होत होती. न्यू महाद्वार रोडवरही पद्माराजे गर्ल्स हायस्कूलसमोरही रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी वाहत होते. 

आयआरबीच्या गटारी साफ कशा करायच्या?
आयआरबी कंपनीने रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारी बांधल्या आहेत. या गटारीवरच फूटपाथ तयार केले आहेत. ५० फुटांवर  चेंबर ठेवले आहेत, पण आरोग्य कर्मचाऱ्यांना या चेंबरमध्ये उभा राहून गटर साफ करता येत नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांनी या गटारीच साफ होत नसल्याचे आरोग्य निरीक्षकांच्या निदर्शनास आणून दिले आहे. चेंबरमध्ये उभा राहून गटरात खोरे घालून ते साफच करता येत नाहीत. त्यामुळे बहुतांशी रस्त्यावरच्या या गटारीच साफ झालेल्या नाहीत. परिणामी पाणी रस्त्यावर साचून राहत आहे. यामुळे रस्ते खराब होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.

Web Title: kolhapur news rain