कोल्हापूरात पावसाने दाणादाण 

कोल्हापूरात पावसाने दाणादाण 

कोल्हापूर - काल मध्यरात्रीच्या धुवॉंधार पावसामुळे शहरासह उपनगरात अक्षरक्षः हाहाकार उडाला. विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसामुळे पाचशेहून अधिक घरात पाणी घुसले. शास्त्रीनगर, रेसिडेन्सी कॉलनीतील घरात दहा फूटाहून अधिक पाणी असल्याने घराचे पत्रे काढून लोकांचा जीव वाचविण्यात आला.वाहत्या ओढ्यावर अतिक्रमण झाल्याने राजोपाध्येनगरात लोकांनी बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयाची तोडफोड केली. रामानंदनगर, देवकर पाणंद, राजलक्ष्मीनगरासह न्यू शाहूपूरीतील बेकर गल्ली, शाहूपूरी कुंभार गल्लीसह उपनगरात रात्रभर भीतीचे वातावरण होते. मोरेवाडी, शिवाजी विद्यापीठ, ऍस्टर आधार, शास्त्रीनगर येथील ओढ्यात बलेरो गाडीसह सह रिक्षा, दोन बुलेट, स्पेलेंन्डर वाहून गेली. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे मजबूत अशा लोंखडी कोंडाळ्याचीही सुटका झाली नाही. 

ओढ्याच्या काठाला बांधलेली घरे, नाला अडवून झालेली बांधकामे, वाहत्या पाण्याची अडविलेली वाट याचे भयंकर परिणाम काल रात्री नागरिकांना सोसावे लागले. काही कुटुंबांनी आख्खी रात्र जागून काढली. आजचा दिवस उजाडला तो ही घरात आणि अंगणात शिरलेले पाणी काढण्यातच गेला. 

रात्री अकराच्या सुमारास पावसाने जोर धरला तो अडीच पर्यंत कायम होता. एरव्ही पावसाळा आहे म्हंटल्यांवर पाऊस पडणारच असे सहज म्हंटले जाते. मात्र काल रात्री विजांचा प्रचंड कडकडाट आणि मिनिटा मिनिटाला वाढत जाणारा पावसाचा जोर यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले. शास्त्रीनगर ओढ्याच्या काठाला बांधकामे झाली आहेत, तेथे रात्री लोकांची भंबेरी उडाला. ओढ्याचा पाण्याचा आवाज त्यात पाऊस आणि अचानक अनेकांच्या घरात रात्री पाणी घुसले. भांडी कुंडी पाण्यावर तरंगू लागली. कुणाकडे मदत मागावी तर सगळीकडेच गोंधळाची स्थिती, यामुळे कुणाला काय करावे हेच सूचत नव्हते. अग्निशमनचा फोन सातत्याने खणखणत होता. एक गाडी गेली, दुसरी अन्य भागात पाठविण्याची वेळ आली. रेसिडन्सी कॉलनीतील सुभाष घाडगे (वय 70), शुभांगी घाडगे (वय 60) आणि त्यांचा मुलगा संदीप (वय 34) यांना दोरी आणि इनरच्या सहाय्याने अग्निशमनच्या जवानांनी बाहेर काढले. घाडगे यांच्या घरात पाणी गेल्याने त्यांच्यासमोर संकट उभे राहिले. वाय. पी. पोवार नगर येथे महेश सखाराम कांबळे यांच्या घराची भिंत कोसळून तीस ते चाळीस हजारांचे नुकसान झाले. 

जयंती नाला, साळोखनगर ते श्‍याम सोसायटीमार्गे रंकाळ्यात मिसळणारा ओढा, दुधाळी नाला ओव्हरफ्लो होऊन वाहत होते. नाले तुडुंब भरल्यानंतर घरात पाणी जाण्यास सुरवात झाली. पाचशेहून अधिक घरात गुडघाभर पाणी होते. रात्रीची वेळ त्यात वीज गायब, आणि प्रापंचिक साहित्य आवरताना लोकांची त्रेधातिरपीट उडाली. ज्या ठिकाणी ड्रेनेजचे काम झाले आहे तेथे ड्रेनेजच्या झाकणातून पाणी बाहेर पडू लागले. पावसाचा जोर काही ओसरेना आणि घरातील पाणी काही कमी होईना अशा वातारवरणात रात्र गेली. दुधाळी, उत्तरेश्‍वर परिसरात काही ठिकाणी जनावरांच्या गोठ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले. 

राजोपाध्येनगर येथे रस्त्याच्या उतरणीला ओढ्यात टोलेजंग बांधकाम झाले आहे. स्थानिक नगरसेविका रिना कांबळे यांनी गेल्या स्थायी सभेत संबंधित बिल्डर ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर सोडत असल्याची तक्रार केली होती. काल रात्री ओढ्यामुळेच पाणी घुसल्याचा आरोप लोकांनी केला. संतप्त लोकांनी बिल्डरच्या कार्यालयाची तोडफोड केली. घरातील पाणी बाहेर काढण्यासाठी भिंत फोडण्याची वेळ लोकांवर आली. 

देवकर पाणंद परिसरातील राजलक्ष्मीनगर,पांडूरंग नगरी येथे विचित्र स्थिती होती. पाण्याचे लोटच्या लोट घरात घुसत होते. अनेकांच्या घरात आणि अंगणातही पाणीच पाणी होते. रात्रभर कॉलन्यांचा परिसर जागता राहिला. 

रात्री अडीचच्या सुमारास पावसाचा जोर कमी झाला मात्र रात्रभर जो हाहाकार माजला त्याचे परिणाम सकाळपासून दिसू लागले.ओढ्याकाठलगतची रस्ते चिखलमय झाले होते. आजची दुपारही पाणी काढण्यातच गेली. सकाळपासून महापालिकेची यंत्रणा कामाला लागली मात्र पाण्याचे नैसर्गिक स्तोत्र अडवून बांधकामे झाली की कोणत्या टोकाची आपत्कालीन स्थिती येऊ शकते याचा अनुभव शहराने घेतला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com