राजाराम महाराज चित्ररूपात येणार नव्या पिढीसमोर

राजाराम महाराज चित्ररूपात येणार नव्या पिढीसमोर

कोल्हापूर - रंकाळा तलावाच्या काठावरचा शालिनी पॅलेस, ट्रेझरी, बी. टी. कॉलेज, विल्सन पूल; एवढेच काय, विमानतळ आणि राधानगरी धरण ज्यांनी पूर्णत्वास नेले, अशा श्री छत्रपती राजाराम महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास छायाचित्रांच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर आणणे; राजाराम महाराज म्हणजे शाहू महाराजांचे चिरंजीव.

शाहू महाराजांनी डोंगराएवढे उभे केलेले काम पूर्णत्वास नेणे, हे तर त्याहून मोठे काम; पण राजाराम महाराजांनी या कामावर पूर्णत्वाचा तुरा चढवला आणि आपल्या कार्यशैलीचा वेगळा ठसा कोल्हापूरच्या इतिहासावर उमटवला. येत्या ३१ जुलैला त्यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने श्री शिवाजी मराठा फाऊंडेशनचे गणेश खोडके, राम यादव, अमित अडसुळे, नागराज सोळंकी यांनी राजाराम महाराजांच्या काळातील छायाचित्रे, त्यांच्या राज्यकारभारातील आदेश, निर्णय यांचे संकलन केले आहे. २८ ते ३१ जुलै या कालावधीत चित्रप्रदर्शन सर्वांसाठी खुले केले जाणार आहे. 

शाहू स्मारक भवनात चार दिवस प्रदर्शन
राजाराम महाराजांचे हे छायाचित्ररूपी कार्यकर्तृत्व प्रदर्शन २८ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ८ या वेळेत शाहू स्मारक भवन कला दालनात सर्वांना मोफत पाहता येणार आहे. त्यात साठ छायाचित्रे व कागदपत्रांचा समावेश आहे. 

कोल्हापूर शहरात शालिनी पॅलेस, बी. टी. कॉलेज, शिवाजी टेक्‍निकल, ट्रेझरी, राधाबाई बिल्डिंग (कोर्ट), कलेक्‍टर ऑफिस, साईक्‍स लॉ कॉलेज अशा खूप देखण्या वास्तू आहेत. छत्रपती शाहू, आईसाहेब महाराज, प्रिन्स शिवाजी यांचे पुतळे आहेत. या वास्तू, हे पुतळे कोणी उभे केले याबद्दल नव्या पिढीतही खूप उत्सुकता आहे. या साऱ्यांत राजाराम महाराजांचा खूप मोठा वाटा आहे; पण काळाच्या ओघात राजाराम महाराजांचे हे काम दडून गेले आहे. केवळ वास्तूच नव्हे, तर १९२२ ते १९४० अशी अठरा वर्षे त्यांनी कोल्हापूर संस्थानचा राज्यकारभार पाहिला. राजा म्हणजे राजवाडा, ऐषआरामी यात गुंतून न राहता, राजाराम महाराजांनी कोल्हापूरला विकासाचा नवा मार्ग दाखवला.

त्यांच्या कारकिर्दीतच रंकाळा तलावाच्या काठावर शालिनी पॅलेस उभा राहिला. शाहू महाराजांनी सुरू केलेले राधानगरी धरणाचे काम त्यांनी पूर्णत्वास नेले. दसरा चौकात शाहू महाराजांचा, लक्ष्मीपुरीत आईसाहेब महाराजांचा देखणा पुतळा उभा केला. याशिवाय सर्वांत महत्त्वाचे म्हणजे छत्रपती प्रमिलाराजे इस्पितळात बाळंतपण व शिशुउपचार असे स्वतंत्र मोफत उपचार कक्ष सुरू केले. 

याशिवाय कोल्हापूर बॅंकेची त्यांनी स्थापना केली. लक्ष्मीपुरी परिसराची उभारणी केली. जयभवानी फुटबाल टीमची स्थापना करून उभरत्या खेळाडूंना संधी मिळवून दिली. कोल्हापूरच्या विमानतळावरून पहिल्या विमानाने अवकाशात भरारी राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतच घेतली. 

शालिनी पॅलेस सरकारने ताब्यात घ्यावा
राजाराम महाराजांनी बांधलेला शालिनी पॅलेस कर्जापोटी एका संस्थेच्या ताब्यात आहे. तो सरकारने कर्जाची पूर्तता करून आपल्या ताब्यात घ्यावा. जेणेकरून हा अमूल्य वास्तूचा ठेवा पुन्हा जनतेचा व्हावा, या मागणीला प्रदर्शनाच्या माध्यमातून तोंड फोडले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com