शाहू जन्मस्थळ परिसरात साकारणार हत्तीच्या रथाची प्रतिकृती 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

कोल्हापूर - कसबा बावडा येथील राजर्षी शाहू जन्मस्थळ, लक्ष्मी विलास पॅलेस परिसरात लवकरच महाराजांनी खास तयार करून घेतलेल्या हत्तीच्या रथाची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. त्याशिवाय महाराजांचा राज्यारोहण समारंभाचा देखावा इपॉक्‍सी माध्यमातून सर्व दरबारी पोषाखांसह एका दालनामध्ये उभारला जाणार आहे. या कामांची निविदा प्रसिद्ध झाली असून येत्या वर्षभरात ही सर्व कामे पूर्ण केली जाणार आहेत. 

राज्य संरक्षित स्मारक जतन व विकास कामांतर्गत 2008-09 ते 2013-14 अखेर एकूण सहा कोटी 56 लाखांवर निधी खर्च झाला असून आता वस्तुनिष्ठ संग्राहलयाची उभारणी हा महत्त्वाचा टप्पा आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विकास नियामक समितीने तयार केलेले तेरा कोटी 42 लाखांचे अंदाजपत्रक दहा सप्टेंबर 2016 ला शासनाला सादर केले होते. अंदाजपत्रकातील प्राधान्यक्रमाने निश्‍चित केलेल्या बाबींचा विचार करून पहिल्या टप्प्याच्या कामासाठी दोन कोटी आठ लाखांवर निधी मंजूर झाला आहे. या कामासाठी ई-निविदा प्रक्रिया सुरू झाली असून एक ते 25 जुलै या काळात ही प्रक्रिया राबवली जाईल. त्यानंतर कामासाठी नऊ महिन्यांचा कालावधी दिला जाईल. 

संग्रहालय उभारणी कामातील या पहिल्या टप्प्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावरील छायाचित्रे हायरिझोलेशनला एन्लार्ज करून त्यांना उच्च प्रतीच्या सागवानी लाकडाच्या नक्षीदार फ्रेम्स तयार केल्या जातील. ही छायाचित्रे दालनात प्रसंगानुरूप प्रदर्शित केली जातील. हत्तीच्या रथाची प्रतिकृतीही सागवानी लाकडाची तयार केली जाणार असून जीआरसी माध्यमात लाईफसाईज हत्ती व ब्रॉंझ माध्यमात माहुताचा पुतळा तयार केला जाणार आहे. राज्यारोहण समारंभाच्या देखाव्यासह जन्मस्थळ कक्षामध्ये गालिचा, जुन्या पद्धतीचे झुंबर, विद्युत व्यवस्था व अनुषंगिक कामे, शाहू महाराजांचे बालपण, राजाश्रय दिलेले विविध कलाकार, मल्लांची छायाचित्रे, शाहूकालीन भांडी व विविध वस्तू तसेच कलाकृतीही येथे प्रदर्शित केल्या जातील. निर्धारित वेळेत हे काम पूर्ण करून जनतेसाठी खुले करण्याचे नियोजन पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाकडून केले असल्याचे सहायक अभिरक्षक अमृत पाटील यांनी सांगितले. 

Web Title: kolhapur news Rajarshi Shahu maharaj