सद्‌भावना दौड उत्साहात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 73 व्या जयंतीनिमित्त आज कॉंग्रेसच्या वतीने सद्‌भावना दौड काढण्यात आली. दसरा चौक येथून सुरू झालेल्या या दौडीसाठी जिल्ह्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केली. कॉंग्रेसमधून निलंबित केलेले माजी आमदार महादेवराव महाडिक यांची उपस्थिती तर आमदार सतेज पाटील यांची दांडी चर्चेचा विषय ठरली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. 

राजीव गांधी अमर रहे, पी. एन. पाटील यांचा विजय असो असा जयघोष करत निघालेल्या या दौडीमुळे शहरातील दसरा चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, पाण्याचा खजिना, संभाजीनगर, कळंबा परिसर दणाणून निघाला. हातात कॉंग्रेसचे झेंडे, टोप्या व मफलर बांधून कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. करवीर, राधानगरी, चंदगड, गडहिंग्लज, हातकणंगलेसह इतर तालुक्‍यातील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी या रॅलीत सहभाग घेतला. 

ढोल-ताशांच्या गजरात या दौडला शहाजी कॉलेजच्या प्रांगणातून सुरवात झाली. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी हातात मशाल घेऊन सद्‌भावना दौडला सुरूवात केली. दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही दौड दिंडनेर्ली येथील राजीव सूत गिरणीकडे रवाना झाली. दसरा चौकातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार उल्हास पाटील, आनंदराव पाटील, रमणसिंग यांच्यासह पी. एन. हे सर्व जण एका उघड्या जीपमध्ये बसून दिंडनेर्लीला रवाना झाले. त्यांच्या पुढे वाहनांचा मोठा ताफा होता. या वेळी माजी आमदार महादेवराव महाडिक, जयवंतराव आवळे, भरमूआण्णा पाटील, प्रल्हाद चव्हाण, माजी आमदार बजरंग देसाई, श्रीपतरावदादा बोंद्रे बॅंकेचे अध्यक्ष राजेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील, डॉ. के. एन. पाटील उपस्थित होते. श्री. महाडिक यांना कॉंग्रेसमधून निलंबित केले असतानाही ते शहाजी कॉलेज ते शाहू पुतळ्यापर्यंत दौडमध्ये सहभागी झाले. सतेज पाटील यांनी मात्र या दौडनंतर झालेल्या शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली. त्यात त्यांचे भाषण मात्र झाले नाही.

Web Title: kolhapur news Rajiv Gandhi congress