कोल्‍हापुरात जिजाऊंच्या नावाचे हायस्कूल आजही तग धरून

सुधाकर काशीद
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

बहुजन समाजातील मुलींना शिकता यावे म्हणून ६४ वर्षांपूर्वी त्यावेळच्या नगरपालिकेने फक्त मुलींसाठी हे हायस्कूल सुरू केले. मोठी इमारत बांधली, मैदान उपलब्ध करून दिले, मैदानात जिजाऊंचा पुतळा उभा केला.

कोल्हापूर - राजमाता जिजाऊंचे नाव घेणं, त्यांचा जयजयकार करणे सोपं आहे; पण त्यांच्या नावाने वाजत-गाजत सुरू केलेल्या संस्था चालवण्याकडे किती सहजपणे पाहिले जाते, याचे उदाहरण कोल्हापुरातील राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूल ठरले आहे. बहुजन समाजातील मुलींना शिकता यावे म्हणून ६४ वर्षांपूर्वी त्यावेळच्या नगरपालिकेने फक्त मुलींसाठी हे हायस्कूल सुरू केले. मोठी इमारत बांधली, मैदान उपलब्ध करून दिले, मैदानात जिजाऊंचा पुतळा उभा केला.

हायस्कूलमध्ये बहुजन समाजातील मुलीही शिकल्या. मुलींच्या संख्या हजारावर गेली; पण आता या हायस्कूलमध्ये फक्त ७९ मुली आहेत. हायस्कूल कसेबसे तग धरून आहे. उद्या या हायस्कूलच्या प्रांगणात नेहमीप्रमाणे जिजामाता जयंती साजरी होणार आहे; पण या हायस्कूलला पुन्हा उभारी येण्यासाठी जर काही घोषणा केली नाही, तर जयंती केवळ नावालाच राहणार आहे. ६४ वर्षांपूर्वीचा काळ बघितला तर कोल्हापूर हे एक शहरवजा छोटे गावच होते.

या हायस्कूलचे अस्तित्व जपण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. ६४ वर्षांपूर्वीच्या या शाळेला मोठी परंपरा आहे. आम्ही शिक्षिका जरूर पालकांना भेटून मुलींना या हायस्कूलमध्ये घालण्यासाठी विनंती करत आहोत. त्याला साथ मिळाली तर हे हायस्कूल पुन्हा मूळ पदावर येईल. जिजाऊंची स्मृती त्यावेळीच खऱ्या अर्थाने जपली जाईल. 
- अंजली जाधव, 

प्रभारी मुख्याध्यापिका

आजही शहराच्या जुन्या काही भागात तशी परिस्थिती आहे. त्या काळात मुले-मुली एका शाळेत ही पद्धत रूढ नव्हती. त्यामुळे तत्कालीन नगरपालिकेने बहुजन समाजातील मुलींसाठी स्वतंत्र हायस्कूल काढले. पाचवी ते अकरावी अशी शिक्षणाची मोफत सोय केली. युनिफॉर्म, पुस्तके; एवढेच काय विद्यार्थिनींना केएमटी बससेवा मोफत दिली. मुली शिकाव्यात याच हेतूने त्याची तरतूद केली. गंगावेस, धोत्री, उत्तरेश्‍वर, रंकाळवेस, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, कुंभार गल्ली, पापाची तिकटी, जोशी गल्ली, बुरूड गल्ली, खोलखंडोबा, जुना बुधवार पेठ या परिसरातील मुली याच हायस्कूलमध्ये शिकल्या. 

हायस्कूलमध्ये ७९ मुली
आज मात्र या हायस्कूलची अवस्था खूप वाईट आहे. २०१५ मध्ये  अवघ्या ३४ मुली या हायस्कूलमध्ये होत्या. आज ७९ आहेत. महापालिकेचे हे हायस्कूल आहे; पण या हायस्कूलचे वेगळेपण ठसवण्यात महापालिका प्रशासन कमी पडत आहे. हायस्कूल चालवण्यासाठी शिक्षकांची कसरत चालू आहे. 

केवळ मुलींच्या या शाळेत पटसंख्या वाढीसाठी गेल्या वर्षापासून मुलांनाही प्रवेश जाहीर केला; पण प्रमाण खूप कमी आहे. या हायस्कूलमध्ये प्रभारी मुख्याध्यापकांसह सात शिक्षक आहेत. परिसरात फिरून ते हायस्कूलसाठी विद्यार्थिनी मिळाव्यात म्हणून पालकांची मनधरणी करत आहेत. अलीकडे शाळा म्हणजे शिक्षणापेक्षा चकचकीत इमारत, झगमगीत युनिफॉर्म, भरमसाट फी असे समीकरण झाले आहे. पालकही त्याला भुलला आहे. त्यामुळेही हा पूर्ण मोफत असलेल्या हायस्कूलचा ‘दर्जा’ कमी समजला जात आहे; पण या हायस्कूलला जिजामातांचे नाव आहे. जिजामातांचे नाव घेणे सोपे आहे; पण इथे तर जिजामातांचे नाव घेत शिक्षणात मुलींची नवी पिढी घडवण्याचे आव्हान आहे; पण हे आव्हानच बाजूला पडले आहे. आणि भाषणात ‘जय जिजाऊ’ म्हणणे फार सोपे झाले आहे. 

 

Web Title: Kolhapur News Rajmata Jijau Birth anniversary