कोल्हापूर: रजनीताई करकरे-देशपांडे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

१५ आॅगस्टला विवाह
रजनीतार्इंना वयाच्या पाचव्या वर्षी १५ आॅगस्टलाच पोलिओ झाला होता. पराकोटीच्या अपंगत्वावर मात करत त्यांनी संगीत क्षेत्रात नाव मिळविले. पी. डी. देशपांडे यांच्याबरोबर १५ आॅगस्ट रोजी त्या विवाहबद्ध झाल्या. हा दिवस माझ्यासाठी नवा स्वातंत्र्यदिन असल्याचे त्या सांगायच्या.

कोल्हापूर : सुगम संगीताच्या ज्येष्ठ गायिका व हेल्पर्स आॅफ हॅन्डीकॅप्ड या संस्थेच्या उपाध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या रजनी करकरे - देशपांडे (वय ७४) यांचे शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनाने सुगम संगीत व दिव्यांगांच्या विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

श्वसन यंत्रणेतील बिघाडामुळे ३ आॅगस्टपासून येथील एका खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांना फिट्सचाही त्रास सुरू झाला होता. फुफ्फुसाच्या विकाराने रात्री सव्वाअकरा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती पी. डी. देशपांडे आहेत. अंत्यसंस्कार आज, रविवारी सकाळी आठ वाजता पंचगंगा स्मशानभूमीत होणार आहेत.

रजनीताई यांना वयाच्या पाचव्या वर्षी पोलिओ झाला होता. पराकोटीच्या अपंगत्वावर मात करत त्यांनी संगीत क्षेत्रात नाव मिळविले. तीस वर्षांहून अधिक काळ आकाशवाणी पुणे, औरंगाबाद, सांगली, आदी केंद्रावरून गायनाचे कार्यक्रम सादर केले. विविध संस्थांच्या निमंत्रणावरून त्यांनी मैफिली सादर केल्या. ‘आनंदाचे डोही’ या त्यांच्या कार्यक्रमाचे एक हजारहून अधिक प्रयोग झाले आहेत. वरात, हे दान कुंकवाचे, दैवत, आदी सिनेमांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. १९८४ मध्ये नसिमा हुरजुक यांच्याबरोबर हेल्पर्स आॅफ दि हॅन्डीकॅप्ड या संस्थेची त्यांनी स्थापना केली. गेली तीस वर्षे या संस्थेच्या उपाध्यक्षा म्हणून त्या काम पाहात होत्या. सुचित्रा मोर्डेकर यांच्याबरोबर कलांजली या संस्थेची स्थापना करून सुगम संगीत मार्गदर्शनाचे वर्ग सोळा वर्षांहून अधिक काळ त्यांनी चालविले. महागायक अभिजित कोसंबी, प्रसन्नजित कोसंबी, शर्वरी जाधव, आदी शिष्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.

१५ आॅगस्टला विवाह
रजनीतार्इंना वयाच्या पाचव्या वर्षी १५ आॅगस्टलाच पोलिओ झाला होता. पराकोटीच्या अपंगत्वावर मात करत त्यांनी संगीत क्षेत्रात नाव मिळविले. पी. डी. देशपांडे यांच्याबरोबर १५ आॅगस्ट रोजी त्या विवाहबद्ध झाल्या. हा दिवस माझ्यासाठी नवा स्वातंत्र्यदिन असल्याचे त्या सांगायच्या.

Web Title: Kolhapur news Rajnitai Karkare is no more