राजर्षी शाहू महाराजांचा बिंदू चौकात अर्धपुतळा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा अर्धपुतळा ऐतिहासिक बिंदू चौकात बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापौर हसीना फरास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. या बैठकीस अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. यासाठी निधीची तरतूद करण्यात आली. याबाबतची माहिती महापौर हसीना फरास यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कोल्हापूर - लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा अर्धपुतळा ऐतिहासिक बिंदू चौकात बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापौर हसीना फरास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. या बैठकीस अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. यासाठी निधीची तरतूद करण्यात आली. याबाबतची माहिती महापौर हसीना फरास यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

महापौर हसीना फरास म्हणाल्या, ‘‘करवीर ही पुरोगामी विचारांची नगरी आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा या नगरीला आहे. कोल्हापूरचा बिंदू चौक हा देखील ऐतिहासिक आहे. विधायक उपक्रम, विधायक विचारांची लढाई या चौकातून सुरू केली तर ती हमखास यशस्वी होते, असा आजवरचा अनुभव आहे. 

महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धपुतळे व स्वातंत्र्यसंग्रामातील हुतात्म्यांचे स्मारक स्तंभ बिंदू चौकात आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा व अन्य सर्वच क्षेत्रांत कोल्हापूरचे नाव गौरविले आहे. शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांचे एकत्रित स्मारक बिंदू चौकात झाले तर चौकाचे महत्त्व अधिक वाढेल. त्यामुळे बिंदू चौकात शाहू महाराजांचा अर्धपुतळा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी बजेटमध्ये दोन लाखांची तरतूद केली आहे.’’

या बैठकीस स्थायी समितीचे सभापती डॉ. संदीप नेजदार, प्राथमिक शिक्षण मंडळाच्या सभापती वनिता देठे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. वहिदा सौदागर, प्रभाग समिती सभापती सुरेखा शहा, गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक अशोक जाधव, प्रतापसिंह जाधव, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, सहायक संचालक नगररचना विभाग धनंजय खोत, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते. या बैठकीत पुतळ्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णयही घेण्यात आला. पत्रकार परिषदेस सभागृह नेते प्रवीण केसरकर, माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास उपस्थित होते.

गंगाराम कांबळे स्मृती स्तंभाचेही सुशोभीकरण
शहरातील गंगाराम कांबळे स्मृती स्तंभाचेही सुशोभीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. अंदाजपत्रकात त्यासाठी दोन लाखांची तरतूद केली आहे. शंभर वर्षांपूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराज व गंगाराम कांबळे यांचे एक अलौकिक असे नाते होते. हा संदेश समता व एकोप्यासाठी उपयोगी आहे. अस्पृश्‍यता संपविण्यासाठी महाराजांनी त्याकाळी सुरवात केली. त्यामुळे गंगाराम कांबळेंचे स्मारक हे समतेचे प्रतीक आहे.

Web Title: kolhapur news rajshri shahu maharaj statue in bindu chowk