खाण प्रकल्पास राजू शेट्टी यांचा ठाम विरोध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - शाहूवाडी तालुक्‍यातील ११० हेक्‍टर वनजमिनीमध्ये खाण प्रकल्प सुरू करण्याला खासदार राजू शेट्टी आणि शाहूवाडी तालुका कृती समितीने  विरोध करीत हरकत घेतली आहे. या प्रकरणी वनमंत्री, वन सचिव, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यात येणार आहे.

कोल्हापूर - शाहूवाडी तालुक्‍यातील ११० हेक्‍टर वनजमिनीमध्ये खाण प्रकल्प सुरू करण्याला खासदार राजू शेट्टी आणि शाहूवाडी तालुका कृती समितीने  विरोध करीत हरकत घेतली आहे. या प्रकरणी वनमंत्री, वन सचिव, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यात येणार आहे. नदीचे उगमस्थान आणि जैवविविधता धोक्‍यात आणणारा हा प्रकल्प असल्याने पर्यावरणप्रेमी संघटनांनी याला विरोध केला आहे. 

शाहूवाडी तालुक्‍यातील घुंगूर, परखंदळे, परळी, आंबर्डे येथील परिसरात परदेशी कंपन्यांना लागणारे लॅटेएईट खनिज उत्खनन करण्यासाठी खाणकाम सुरू करण्यात येणार आहे. सात कंपन्यांनी यासाठी एकत्रित मागणी केली असून, खाणकामाचे उत्खनन ८ वर्षांपासूून ४५ वर्षांपर्यंत चालणार आहे. यासाठी वन विभागाने आपली ११० हेक्‍टर जमीन यासाठी देऊ केली आहे. यासाठी लागणाऱ्या साऱ्या कागदपत्रांची पूर्तता जवळपास पूर्ण करण्यात आली असून, आता केवळ जनसुनावणी बाकी आहे.

जनसुनावणीत याला विरोध झाल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळच त्याचा परवाना थांबवू शकते. जनसुनावणी देण्यात आलेल्या आराखड्यात अनेक गंभीर बाबी पुढे  आल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे. या ठिकाणी नद्यांचे उगमस्थान आहे. विविध प्रकारची जैवविविधताही असून, या ठिकाणापासून राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प अगदी जवळ असताना केवळ कागदोपत्री मार्ग काढून खाणकाम सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

२७ ऑक्‍टोबरला होणारी जनसुनावणी ही अत्यंत महत्त्वाची आहे. यामध्ये ग्रामस्थांनी विरोध केला तर हा प्रकल्प थांबू शकतो. कारण हा प्रकल्प सुरू झाल्यास त्याचा परिणाम गावातील शेतीवर व पिकांवर मोठा परिणाम होणार आहे. वाहनांच्या धुळीमुळे पिके धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. ११० हेक्‍टर उत्खननासाठी दररोज १००० हून अधिक वाहनांची ये-जा या मार्गावरून होऊन त्याचे प्रदूषण, धूळ याचा परिणाम गावातील पिकांवर होऊन शेती धोक्‍यात येऊ शकते. 

खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘‘वनजमीन परदेशी कंपन्यांसाठी देणे अत्यंत गंभीर बाब आहे. पर्यावरणाचे आणि शेतीचे नुकसान करून हा प्रकल्प सुरू करणे चुकीचे आहे. यासाठी उद्या (ता. २६) वनमंत्री आणि राज्याचे वन सचिव यांची भेट घेऊन निवेदन देणार आहे. पर्यावरणाला हानिकारक प्रकल्प थांबवलाच पाहिजे.’’

शाहूवाडी तालुका कृती समितीतर्फे उद्या (ता. २६) प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी यांना भेटून याविषयी जाब विचारण्यात येणार आहे. ऐतिहासिक विशाळगड, धार्मिक स्थळे, जैवविविधता, वन्य प्राण्यांचे जीवन धोक्‍यात येत आहे. यापूर्वी याला विरोध करण्यात आल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

 

Web Title: kolhapur News Raju Shetty against Mining Projects