‘स्वाभिमानी’साठी पाऊल मागे येण्याची गरज

निवास चौगले
गुरुवार, 6 जुलै 2017

संघटनेत धुसफूस - काळाची पावले ओळखून राजू शेट्टी, सदाभाऊंनी निर्णय घ्यावा

संघटनेत धुसफूस - काळाची पावले ओळखून राजू शेट्टी, सदाभाऊंनी निर्णय घ्यावा

कोल्हापूर - संघटना मग ती शेतकऱ्यांची असो की कामगारांची तिला चांगले दिवस आले की त्यात धुसफूस ही सुरू होतेच. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची अवस्था अशीच झाली आहे. सरकार कोणतेही असो ‘फोडा आणि जोडा’ ही रणनीती त्यांच्याकडून आखली जातेच. त्यालाच ‘स्वाभिमानी’ बळी पडल्याचे खासदार राजू शेट्टी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील मतभेदावरून स्पष्ट झाले आहे. यातून एका चांगल्या चळवळीला ग्रहण लागण्याची शक्‍यता असून काळाची पावले ओळखून या दोघांनीही एक पाऊल मागे येण्याची गरज असल्याचे मत या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. 

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर एकीकडे खासदार राजू शेट्टी देशभरातील शेतकरी संघटनांची एकत्र मोट बांधत असताना त्यांच्याच संघटनेत फुटीची बीजे रोवली जात आहेत. हा विरोधभास संघटनेला किंवा या चळवळीला परवडणारा नाही. आजपर्यंत शेतकरी संघटनांचा इतिहास हा फुटीचाच आहे. त्याचीच पुनरावृत्ती ‘स्वाभिमानी’त होताना दिसत आहे. आपल्या संघटनेचे दोन तुकडे होत असताना देशभरातील शेतकरी संघटना एकत्र करून श्री. शेट्टी काय साध्य करणार आहेत? हाही प्रश्‍न महत्त्वाचा आहे. 

लोकसभेच्या निवडणुकीत श्री. शेट्टी यांनी भाजपला पाठिंबा दिला. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही त्यांनी हीच भूमिका घेतली. या बदल्यात संघटनेला दोन महामंडळे व एक विधानपरिषद देण्याचा ‘शब्द’ त्यांनी घेतला. 

संघटनेला पद मिळणार म्हटल्यावर कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढणे हे साहजिकच आहे, त्यातून मार्ग काढण्यासाठी विधानपरिषद श्री. खोत यांनाच दिली जाईल, असे श्री. शेट्टी यांनी अगोदरच जाहीर करून वाद टाळण्याचा प्रयत्न केला. संघटनेचे हे ऋण समजून श्री. खोत यांनी चळवळीसाठी काम करावे, ही माफक अपेक्षा श्री. शेट्टी यांची होती आणि ती असणेही काही गैर नाही. 

पण मंत्रिपदानंतर श्री. खोत हे संघटनेचे कमी आणि सरकारचेच जास्त लाडके झाल्याचे चित्र पहायला मिळाले. सरकारमध्ये असल्याने मंत्री म्हणून सरकारची बाजू मांडणे गैर काही नाही, अशी त्यांची भूमिका आहे. गेली २५ वर्षे मी संघटनेत आहे, घरादारावर तुळशीपत्र ठेवून संघटनेसाठी काम करत असताना आपल्याला ‘लक्ष्य’ केले जात असल्याची भावना श्री. खोत यांची आहे. पण या दोघांत समोरासमोर कधी चर्चा नाही, वाद नाही, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांच्या कार्यकर्त्यांनीच या वादाला खतपाणी घातले व त्यातून हा वाद चिघळला आहे, ही वस्तुस्थिती आहे. 

शेतकरी मुळात कधी एकत्र येत नाही, किंबहुना तो एकत्र येऊच नये, यासाठीच राज्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू असतात. यात ‘स्वाभिमानी’ सरकारच्या हाताला लागली, पण आता संघटित शेतकऱ्यांना एकत्र ठेवून त्यांच्यासाठी काम करायचे असेल तर या दोघांनी एक पाऊल मागे घेऊन एकत्र येण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या आणि चळवळीच्या व्यापक हितासाठी हे दोघे एकत्र आले नाही तर आणखी एका शेतकरी संघटनेची भर पडेल आणि पुन्हा नेत्यांच्या या वादात संघटनेची वाताहात झालेली पहायला मिळेल एवढे निश्‍चित.

संघटनेला फुटीचा शाप
१९७९- शरद जोशी यांच्याकडून संघटनेची स्थापना, अनिल गोटे, श्री. शेट्टी, पाशा पटेल, सदाभाऊ खोत, लक्ष्मण वडले यांचा सहभाग
२००२- जोशी यांनी भाजपशी संधान बांधल्याचा आक्षेप घेत श्री. शेट्टी यांनी यांच्याकडून ‘स्वाभिमानी’ची स्थापना
२००९ - शरद जोशी यांच्या संघटनेतून श्री. खोत यांचा ‘स्वाभिमानी’ त प्रवेश
२०१४- पंजाबराव पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा ‘स्वाभिमानी’ला रामराम, बळिराजा संघटनेची स्थापना
रघुनाथदादा पाटील यांनी जोशींच्या संघटनेत राहूनच आपले वेगळे अस्तित्व कायम ठेवले
अनिल गोटे, पाशा पटेल यांनी वेगळी संघटना न काढता भाजपसोबत जाणे पसंत केले. 
लक्ष्मण वडले सध्या शिवसेनेसोबत 
 

शेट्टींचे खोतांवर आक्षेप
मंत्री झाल्यानंतर त्यांची संघटनेसोबतची नाळ तुटली
संघटनेपेक्षा त्यांना सरकार प्रिय असल्याचे चित्र
शेतकरी संपात त्यांची शेतकऱ्यांविरोधात लुडबूड
आत्मक्‍लेश यात्रेत ते सहभागी झाले नाहीत
संघटनेच्या ध्येयधोरणाविरोधात काम 
खोतांच्या कार्यकर्त्यांचे शेट्टींवर आक्षेप
श्री. खोत यांच्या मुलाला उमेदवारी दिल्यावर घराणेशाही, मग इतर कार्यकर्त्यांच्या घरात उमेदवारी का? 
श्री. खोत जातीयवादी असते तर विधानसभा निवडणुकीत त्यांनी श्री. मादनाईक यांचा प्रचार केला असता का?
राष्ट्रपती निवडणुकीत भाजपला पाठिंबा देताना शेट्टींनी स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणीची अट का घातली नाही.
कोल्हापूर जिल्हा परिषदेत ते भाजपसोबत का आहेत?

Web Title: kolhapur news raju shetty & sadabhau khot dispute