बेळुंकीचा राकेश बनला शास्त्रज्ञ

रमजान कराडे
सोमवार, 23 जुलै 2018

केंद्र सरकारच्या अवघड परीक्षेत तो उत्तीर्ण झाला. कमी वयातच त्याला शास्त्रज्ञ होण्याची संधी मिळाली. तो ‘सिनिअर रिसर्च सायंटिस्ट’ झाला. बेळुंकी (ता. कागल) येथील राकेशकुमार पाटील याचा प्रेरणादायी प्रवास आदर्शवत आहे.

नानीबाई चिखली - देशपातळीवरील नामवंत अशा नवरत्न (पीएसयू) कंपनीत करिअर करण्याचे त्याचे स्वप्न, यासाठी त्याने कष्ट उपसले. मात्र यशाने त्याला हुलकावणी दिली; परंतु केंद्र सरकारच्या अवघड परीक्षेत तो उत्तीर्ण झाला. कमी वयातच त्याला शास्त्रज्ञ होण्याची संधी मिळाली. तो ‘सिनिअर रिसर्च सायंटिस्ट’ झाला. बेळुंकी (ता. कागल) येथील राकेशकुमार पाटील याचा प्रेरणादायी प्रवास आदर्शवत आहे.

त्याच्या यशाने गावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. राकेशचे प्राथमिक शिक्षण खडकेवाडा, तसेच सोनगेतील जि. प.च्या शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण दऱ्याचे वडगाव येथील गुरुकुल शाळेत तर बारावी सायन्स डी. वाय. पाटील, कदमवाडी येथे झाले. मुंबई विद्यापीठात इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करत पुण्यातील ‘व्हीआयटी’ संस्थेत त्याने डिझाईनमध्ये एमटेक पदवी घेतली.

एमटेकनंतर एमएनसी कंपनीत दोन वर्षे जॉब केला. दरम्यान, केंद्र सरकारच्या उद्योग मंत्रालयाने प्रायोगिक सुक्ष्मतरंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअरिंग अनुसंधारण (समीर) संस्थेने सिनिअर रिसर्च सायंटीस्टची निवड प्रक्रिया राबवली. लेखी, तोंडी परीक्षा तसेच अनुभवाच्या आधारे देशभरातून फक्त दोघांनाच संधी मिळाली. त्यापैकी महाराष्ट्रातून कोल्हापूर जिल्ह्यातील राकेशला संधी मिळाली. डिझाईन क्षेत्रात संशोधन व मार्गदर्शन करण्याची संधी  मिळाली. त्याला वडील कृष्णात, आई निर्मला, शिक्षक संजय मांडवे आदींचे मार्गदर्शन लाभले.

करिअरच्या दृष्टीने पहिले पाऊल असून सायंटिस्टमधील ही पहिली पायरी आहे. कामाच्या माध्यमातून देशसेवेची संधी मिळते, ही अभिमानाची गोष्ट आहे.
- राकेशकुमार पाटील

Web Title: Kolhapur News Rakesh Patil as a scientist