औक्षिते प्रेमाने...  उजळूनी दीपज्योती...! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - 
बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी 
बांधिते भाऊराया, आज तुझ्या हाती
औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती 
रक्षावे मज सदैव अन्‌ अशीच फुलावी प्रिती
बंधन असूनही बंधन हे थोडेच, 
या तर हळव्या रेशीमगाठी

असे म्हणत रक्षाबंधनासाठी राखी खरेदी करण्यासाठी भगिनीची पाऊले राख्या खरेदी करण्यासाठी बाजारपेठेकडे वळली आहेत. आज दिवसभर पापाची तिकटी, महाद्वार रोड, श्री अंबाबाई मंदिर परिसर, कपीलतीर्थ मार्केट परिसर, भवानी मंडप, अन्य भागातील राख्यांच्या स्टॉलवरून राख्यांची खरेदी करण्यासाठी महिला, युवतींनी गर्दी केली. 

कोल्हापूर - 
बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी 
बांधिते भाऊराया, आज तुझ्या हाती
औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती 
रक्षावे मज सदैव अन्‌ अशीच फुलावी प्रिती
बंधन असूनही बंधन हे थोडेच, 
या तर हळव्या रेशीमगाठी

असे म्हणत रक्षाबंधनासाठी राखी खरेदी करण्यासाठी भगिनीची पाऊले राख्या खरेदी करण्यासाठी बाजारपेठेकडे वळली आहेत. आज दिवसभर पापाची तिकटी, महाद्वार रोड, श्री अंबाबाई मंदिर परिसर, कपीलतीर्थ मार्केट परिसर, भवानी मंडप, अन्य भागातील राख्यांच्या स्टॉलवरून राख्यांची खरेदी करण्यासाठी महिला, युवतींनी गर्दी केली. 

अगदी दोन रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत  उपलब्ध असणाऱ्या राख्यांची आपल्या आवडीप्रमाणे खरेदी केली. भय्या-भाभी, राजस्थानी, गुजराती, स्टोन, गोंडा, देवांच्या प्रतिमा असणाऱ्या, धार्मिक प्रतिके असणाऱ्या, कापसापासून तयार केलेल्या, मनी, कार्टून, बाहुबली, लाईट, भीम आदी राख्यांनी स्टॉल्स भरून गेले आहेत. अवघ्या दोन रुपयांना मिळणाऱ्या फॅन्सी राख्यांना सर्वाधिक मागणी आहे. स्टोन राख्यांमध्ये असंख्य व्हरायटीज असून काचेच्या मण्यांपासून बनलेल्या राख्याही खरेदी करण्यात येत आहेत. पूर्वी मिळणाऱ्या गोंडा, स्पंजाचा वापर केलेल्या राख्याही आवर्जुन खरेदी केल्या जात आहेत.  

पोस्टाचा अजूनही प्रभाव 
मोबाईल आला, सोशल नेटवर्किग साईटस्‌ही खूप आहेत. अशावेळी पहिल्यासारखे पोस्टाने कोण राखी पाठवितो, हा प्रश्‍न अनेकदा विचारला जातो; मात्र सोशल नेटवर्कचा प्रभाव असलेल्या आजच्या काळातही साधे टपाल किंवा स्पीड पोस्टने आवर्जुन राख्या पाठविण्याचा ट्रेंड अजूनही टिकून आहे. कोल्हापुरातील पोस्ट कार्यालयातून या कालावधीत दररोज पाच रुपयांच्या स्टॅपची साधारणपणे पाच हजारांच्या पुढे विक्री होत आहे. पोस्टाने राख्या पाठविण्याचे प्रमाणही खूप आहे. इतकेच नव्हे, तर पोस्टाने आलेल्या राख्या तातडीने पोचविण्यासाठी यंत्रणाही गतिमान झाली आहे. 

खंडग्रास चंद्रग्रहण आणि रक्षाबंधन 
सोमवारी (ता. ७) श्रावण पौर्णिमेला होणारे खंडग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसेल. चंद्रग्रहण असले तरीही नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन हे सण साजरे करावेत, असे खगोल अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. हे चंद्रग्रहण भारताप्रमाणेच संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरोप, पश्‍चिम पॅसिफिक महासागरातून दिसेल. सोमवारी सायंकाळी ६ वाजून ५४  मिनिटांनी चंद्रोदय होईल. यानंतर चंद्राचे बिंब ९९.६ टक्के तेजोमय दिसेल. नंतर रात्री १० वाजून ५२ मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. चंद्र पृथ्वीच्या छायेत येण्यास प्रारंभ होईल. रात्री ११ वाजून ५१ मिनिटांनी ग्रहणमध्य होईल. त्यावेळी चंद्रबिंबाचा २४. ६ टक्के भाग पृथ्वीच्या छायेत येईल. यानंतर ग्रहण सुटण्यास प्रारंभ होईल. रात्री १२ वाजून ४९ मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडेल. चंद्रग्रहण सुटेल. या वर्षी श्रावण अमावास्येला सोमवारी (ता. २१) खग्रास सूर्यग्रहण होईल; परंतु हे ग्रहण भारतातून दिसणार नाही.

Web Title: kolhapur news rakshabandhan