रंगपंचमीने दिली आयुष्यभर काळ्या रंगाची सोबत...

सुधाकर काशीद
सोमवार, 5 मार्च 2018

कोल्हापूर - रंगपंचमीला त्याच्यावर नवरंगांची उधळण झाली. परंतु, रंगांच्या नावाखाली वापरल्या जाणाऱ्या काही रासायनिक पावडरचीही त्यात भर घातली. ही पावडर त्याच्या डोळ्यात गेली आणि त्याची दृष्टीच गेली. रंगपंचमी संपली; पण त्याच्या डोळ्यांसमोर आयुष्यभर फक्त काळ्या रंगाचीच साथ राहिली.

कोल्हापूर - रंगपंचमीला त्याच्यावर नवरंगांची उधळण झाली. परंतु, रंगांच्या नावाखाली वापरल्या जाणाऱ्या काही रासायनिक पावडरचीही त्यात भर घातली. ही पावडर त्याच्या डोळ्यात गेली आणि त्याची दृष्टीच गेली. रंगपंचमी संपली; पण त्याच्या डोळ्यांसमोर आयुष्यभर फक्त काळ्या रंगाचीच साथ राहिली.

रंगपंचमी जरूर आनंदाचा सोहळा असेल; पण रंगपंचमीला बीभत्स स्वरूप आले तर रंगाचा बेरंग नव्हे; तर उभ्या आयुष्याचा बेरंग कसा होऊ शकतो, याची प्रचिती त्याला आली. गेली २७ वर्षे तो डोळ्यात अंधाराचा काळा रंग घेऊन वावरतो आहे. रंगपंचमीचा सण म्हटला की, त्याला कापरेच भरते, अशी अवस्था आहे.

शाहूपुरी-कुंभार गल्लीतल्या दीपक विश्‍वास बिडकर या तरुणाच्या बेरंग आयुष्याची ही चटका लावणारी कथा आहे. २७ वर्षांपूर्वी रंगपंचमीला घोळक्‍याने तो गल्लीबाहेर पडला. सोबत २०-२५ मित्र. रंगांची उधळण चालू होती. जरूर त्या क्षणाला आनंदाची किनार होती. परंतु, कोणाच्या तरी हातात चंदेरी रंगाच्या पावडरीचे पोते होते. चंदेरी रंग म्हणजे आकर्षक रंग, त्यामुळे हा रंग उधळला व तो नेमका दीपकच्या डोळ्यांवर, चेहऱ्यावर उडाला. या चंदेरी रंगाचा दाह एवढा होता, की दीपक रस्त्यावर आडवा पडून तळमळू लागला. पाणी मारून डोळे धुण्याचा प्रयत्न झाला; पण पाण्याच्या मिश्रणाने दाह अधिकच वाढला.

तळमळणाऱ्या अवस्थेत त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केले. दोन दिवस तेथे उपचार झाले; पण फरक न पडल्याने खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. तेथे उपचार सुरू झाले आणि त्याला कसेबसे अंधुक दिसू लागले. परंतु, काही दिवसच त्याने अंधुकपणे हे जग पाहिले आणि एके दिवशी डोळ्यांसमोर फक्त काळा रंग ठेवून त्याला दिसायचे कायमचे बंद झाले.

कामातून पुन्हा आयुष्याला रंग... 
या आघाताने दीपक व त्याचे कुटुंबीय हादरून गेले. त्यांनी देशभरातले नामवंत नेत्रतज्ज्ञ उपचारांसाठी गाठले; पण सर्वांनीच पुन्हा दृष्टी येणे अशक्‍य आहे, असे सांगितले. यानंतर दीपक खूप अस्वस्थ होता. मानसिकदृष्ट्या खचला; पण त्याच्या लक्षात आले आणि त्याने ठरवले रंग दिसत नसले तरीही रोजच्या कामातून पुन्हा आयुष्यात रंग भरायचे. मग तो तिजोरी तयार करण्याच्या कामात गुंतला. आज तो यात तरबेज आहे. एखादा डोळस माणूस करणार नाही, इतक्‍या हुशारीने तिजोरी बनवणे, कामगारांना सूचना देणे, ग्राहकांना माहिती देणे, ही कामे नियमित करतो. 

आपल्यावरील प्रसंग कोणावर नको...
त्याने स्वतःला या कामात गुंतवून घेतले. परंतु, त्याला त्या अज्ञात रासायनिक रंगांची भीती अजूनही आहे. रंगपंचमीला आपल्यावर जे संकट आले, ते कोणावरही येऊ नये, अशी त्याची भावना आहे. यासाठीच त्याची इको फ्रेंडली रंगानेच होळी खेळा, अशी हात जोडून सर्वांना विनंती आहे.

रंगांचा दर्जा तपासणार कोण...?
कोल्हापुरात पिवडी स्वरूपात पोत्यातून जो रंग विकला जातो, त्यालाही रासायनिक वास आहे. याशिवाय काही परप्रांतीय अत्यंत गडद स्वरूपाचा विचित्र रंग घेऊन विक्रीसाठी ठिकठिकाणी बसले आहेत. रंग हे शेवटी रसायनच आहे. त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम ठरलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर अक्षरशः ट्रक भरून रंग कोल्हापुरात आला आहे. त्याचा दर्जा काय? त्याचे परिणाम काय? हे कोण तपासणार आहे?

Web Title: Kolhapur News Rangpanchami special story