रंकाळ्यातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी विद्यापीठाकडे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

रंकाळ्याच्या प्रश्‍नी "सकाळ'चा पुढाकार 
रंकाळा पदपथ उद्यानात झाडे लावण्याच्या चळवळीला "सकाळ' ने पाठबळ दिले. दरवर्षी झाडांचा वाढदिवस साजरा होतो. पर्यावरणाची जागृती करताना प्रदूषणाच्या प्रश्‍नावर "सकाळ' ने नेहमीच आवाज उठविला आहे. काल रंकाळा हिरवागार झाल्याची बातमी आणि छायाचित्र प्रसिद्ध झाले आणि महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. हिरव्या पाण्याचे नमुने तातडीने घेतले गेले. 

कोल्हापूर - रंकाळा तलावातील हिरव्यागार पाण्याचे नमुने घेतले गेले आहेत. शिवाजी विद्यापीठाकडे तपासणीसाठी ते पाठविले आहेत. "सकाळ' ने काल यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे प्रदूषणाकडे लक्ष वेधले होते. 

पावसाळ्यात सांडपाणी मिसळण्याची व्यवस्था नसल्याने तलावातील पाणी हिरवेगार झाले. "ब्ल्यू ग्रीन अलगी'च्या प्रादुर्भावामुळे तलाव प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. श्‍याम सोसायटी, सरनाईक कॉलनी, रंकाळ्याच्या पिछाडीस असलेल्या नाल्यातून सांडपाणी मिसळते. श्‍याम सोसायटीपासून सात कोटी रुपये खर्चून ड्रेनेजलाईन टाकली गेली आहे. केवळ उन्हाळ्यापुरत्या ड्रेनेजलाईनचा उपयोग होता. पावसाळ्यात सांडपाणी थेट रंकाळ्यात मिसळते. त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. ब्ल्यू ग्रीन अलगीची व्याप्ती इतकी वाढली आहे, की रंकाळा हिरव्या रंगाने गडद होऊ लागला आहे. पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. प्रदूषणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिकेच्या पाणीपुरवठा आणि ड्रेनेज विभागाने मंगळवारी पाण्याचे नमुने घेऊन शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाकडे तपासणीसाठी पाठविले आहेत. 

रंकाळा तलावात 44 टक्के गाळ आहे. हा गाळही ब्ल्यू ग्रीन अलगीच्या वाढीस कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. रंकाळ्याचे प्रदूषण रोखण्यासाठी आजपर्यंत अनेक प्रयोग झाले, मात्र प्रदूषणावर नामी उपाय शोधता आलेला नाही. अमृत योजनेतही रंकाळ्याचा समावेश झाला आहे. 

Web Title: kolhapur news rankal lake water