कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर रहदारी वाढली, रुंदीकरण केव्हा?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - रस्त्यांवरील वाहने वाढली; मात्र रुंदीकरण नसल्यामुळे कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले. आजच साताऱ्यातील एकाचा अपघाती मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला. वारंवार होणाऱ्या अपघातानंतरही कोणतीही उपाययोजना नसल्याचे दिसून येते. तातडीने या मार्गाचे रुंदीकरण गरजेचे आहे.

कोल्हापूर - रस्त्यांवरील वाहने वाढली; मात्र रुंदीकरण नसल्यामुळे कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले. आजच साताऱ्यातील एकाचा अपघाती मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला. वारंवार होणाऱ्या अपघातानंतरही कोणतीही उपाययोजना नसल्याचे दिसून येते. तातडीने या मार्गाचे रुंदीकरण गरजेचे आहे.

कोल्हापूरपासून केवळ १७ किलोमीटरवर ऐतिहासिक पन्हाळा किल्ला आहे. राज्य महामार्ग क्रमांक २०४ वरील रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली. त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. कोकणाकडे जाणारी बहुतांशी वाहने या मार्गाने जातात. याच मार्गावर असलेल्या छोट्या-मोठ्या गावांतील रहदारी असते. रत्नागिरी, गोव्याला याच मार्गावरून अवजड वाहनांचीही वाहतूक होते. दख्खनचा राजा जोतिबा डोंगर, वारणानगर, कोडोलीकडे जाण्यासाठी अनेक वाहनधारकांकडून याच मार्गाचा वापर होतो. रस्त्याच्या दुतर्फा झाडी आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला सखल भाग आहे. पर्यायाने वाहनधारकांना बाजूने जाणे शक्‍य होत नाही. परिणामी, अपघाताला सामोरे जावे लागते.

रस्त्यावर शेजारून जाणाऱ्या गाडीची ठोकर लागून झालेल्या अपघातात केर्लीतील बाप-लेकाचा मृत्यू झाला. ट्रॅक्‍टर ट्रॉलीला धडकून सायकलस्वार जागीच ठार झाला. गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकचा आणि एसटी बसच्या अपघातात वरणगे-पाडळीतील चालक ठार झाले. कोल्हापुरातून शिवाजी पुलावरून पुढे जाताना वडणगे फाट्यापासूनच अपघाताच्या ठिकाणांना सुरवात होते. पुढे रजपूतवाडी, जोतिबा फाटा (केर्ली), वरणगे पाडळी फाटा (आंबेवाडीजवळ), कोतोली फाटा, चिखली फाटा या ठिकाणी छोटे-मोठे अपघात ठरलेलेच आहेत.

रत्नागिरी-नागपूर चौपदरीकरण
रत्नागिरी-नागपूर या मार्गाचे चौपदरीकरण सुरू झाले असून, रत्नागिरीपासून याला सुरवात झाली आहे. याच मार्गाचे पुढील काम कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर येणार असल्याचे सांगण्यात येते. हे काम तातडीने सुरू झाल्यास येथील अपघात रोखण्यास मदत होईल.

कोल्हापूर ते कोतोली फाट्यापर्यंत दिवसेंदिवस अपघात वाढत आहेत. वर्षाभरात सात जणांचा बळी गेला. अरुंद रस्ता असल्यामुळे हे अपघात होतात. या रस्त्याचे लवकरात लवकर विस्तारीकरण किंवा चौपदरीकरण होणे आवश्‍यक आहे.
- चंद्रकांत पाटील, पं. स. सदस्य.

 

Web Title: Kolhapur News ratnagiri road issue