कोल्हापूर महापालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीचा विजय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर : अंत्यत चुरशीने झालेल्या कोल्हापूर महापालिकेच्या ताराबाई पार्क (प्रभाग क्रमांक ११)  पोटनिवडणुकीत रत्नेश शिरोळकर (1,399) यांनी बाजी मारली. त्यांनी राजू लाटकर (1,199) यांचा 200 मतांनी पराभव केला.

कोल्हापूर : अंत्यत चुरशीने झालेल्या कोल्हापूर महापालिकेच्या ताराबाई पार्क (प्रभाग क्रमांक ११)  पोटनिवडणुकीत रत्नेश शिरोळकर (1,399) यांनी बाजी मारली. त्यांनी राजू लाटकर (1,199) यांचा 200 मतांनी पराभव केला.

राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादी नेते आमदार हसन मुश्रीफ, भाजप आमदार अमल महाडिक या नेतेमंडळी थेट प्रचारात उतरल्याने ही निवडणूक रंगतदार बनली होती. 

महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. परंतु, सत्ताधारी आणि विरोधी भाजप-ताराराणी आघाडी यांच्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत संख्येचा फरक आहे. परिणामी स्थायी समितीसह परिवहन समिती, महिला व बालकल्याण समिती, प्राथमिक शिक्षण समितीसह चारही प्रभाग समितीत एक-दोन मतांच्या फरकाने सभापती निवड होत असते. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणात सत्ताधारी व विरोधकांना एकेक नगरसेवक महत्वाचा आहे. अक्षरशः पॉइंटमध्ये पारडे इकडचे तिकडे होऊन सभापती बदलाचे राजकारण घडू शकते. त्यामुळे दोन्ही आघाड्यांचे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

ताराराणी आघाडीच्या नगरसेवकाचा जातीचा दाखला अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले. परिणामी पोटनिवडणूक लागली आहे. परंतु, कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकण्यासाठी खुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या आठवड्यात एका दिवसात प्रभागात वीसहून अधिक बैठका घेऊन भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्न केले.

भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्यासह भाजप-ताराराणी आघाडीच्या कारभाऱ्यांनीही गेले आठवडाभर प्रभागात ठाण मांडले होते. हक्काचा मतदारसंघ असल्याने कोणत्याही स्थितीत उमेदवार विजयी करण्याचा चंग बांधला आहे. त्याला शह देण्यासाठी काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनीही प्रभागातील एक आणि एक घर अक्षरशः पिंजून काढले. राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनीही जोरदार फिल्डिंग लावली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही आपापल्यापरीने मतदारांची जबाबदारी स्विकारली होती.

Web Title: Kolhapur News Ratnesh Shirolkar wins in municipal By-Election