‘राऊतवाडी क्षेत्र होणार सुरक्षित पर्यटनस्थळ’

मोहन नेवडे
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

राधानगरी - पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांचा वाढता ओघ असलेल्या राधानगरी वन्यजीव अभयारण्य क्षेत्रातील राऊतवाडी धबधबा स्थळाचा प्रस्तावित विकास आराखड्याच्या अंमलबजावणीतून कायापालट होणार आहे. ते सुरक्षित पर्यटनस्थळ होईल. पुढील पावसाळ्यापूर्वी धबधबा क्षेत्राचे बदललेले रुपडे पर्यटकांसमोर येणार आहे. 

राधानगरी - पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांचा वाढता ओघ असलेल्या राधानगरी वन्यजीव अभयारण्य क्षेत्रातील राऊतवाडी धबधबा स्थळाचा प्रस्तावित विकास आराखड्याच्या अंमलबजावणीतून कायापालट होणार आहे. ते सुरक्षित पर्यटनस्थळ होईल. पुढील पावसाळ्यापूर्वी धबधबा क्षेत्राचे बदललेले रुपडे पर्यटकांसमोर येणार आहे. 

अभयारण्य क्षेत्रात निसर्ग पर्यटन विकासासाठी पहिल्यांदाच बक्कळ निधी प्राप्त झाला. त्यातून धबधबा क्षेत्र सुधारण्याबरोबरच पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा आणि पर्यटक सुरक्षिततेवर भर देण्यात आला. आगामी महिनाभरात प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करण्याचे नियोजन वन्यजीव विभागाने केले आहे. यंदाच्या पावसाळयापूर्वी निसर्ग पर्यटन योजनेंतर्गत प्रस्तावित कामे पूर्ण करण्याचे निर्धारित केले आहे. 

दोन वर्षांपासून या धबधबास्थळी येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला आहे. मात्र, सद्यस्थितीत धबधबा क्षेत्रात सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना आणि पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा नाहीत. या त्रुटी प्रस्तावित विकास आराखड्यातील कामामुळे दूर होणार आहेत. 

धबधबास्थळी पोचण्यासाठीच्या मार्गात ओढ्याचे पात्र आहे. पावसाळ्यात पाण्याच्या जोरदार प्रवाहातूनच निसरड्या पायवाटेने जावे लागते. धबधबा क्षेत्रात सहजपणे वावरात येण्याच्या दृष्टीने उपाययोजनांचा समावेश आराखड्यात केला आहे; तर चेंजींग रूम, प्रसाधनगृहामुळे महिला पर्यटकांची गैरसोय व कुचंबणा संपणार आहे. धबधबा क्षेत्रात नियोजनबद्धरीत्या वाहतूक व्यवस्था, सुरळीत राहण्यासाठी वाहनतळ उभारणीही प्रस्तावित आहे. 
जवळपास ५० लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावित विकास आराखड्यातून आगामी काळात राऊतवाडी धबधबा क्षेत्र वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. आता प्रस्तावित आराखड्यातील कामांची अंमलबजावणी निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे आव्हानात्मक काम वन्यजीव विभागाच्या यंत्रणेला पार पाडावे लागणार आहे. 

प्रस्तावित कामे :
* राऊतवाडी धबधबा क्षेत्र -  काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक बसविणे, धबधबा क्षेत्र सुधारणा, वाहनतळ, प्रसाधनगृह.
* फेजीवडे, सावर्धन, राधानगरी, हसणे, पडळी, ओलवण आदी ठिकाणी पाणस्थळ बांधणी.
* राधानगरी निसर्ग माहिती केंद्र- स्टॅम्पड फौंटन उभारणी, जांभा खडक रस्ताबांधणी, पार्किंग शेड आदी.

निसर्गपर्यटन योजनेंतर्गत विस्तारित राधानगरी अभयारण्य क्षेत्रात निसर्ग पर्यटन विकासासाठी ८८ लाखांचा निधी मंजूर आहे. या निधीतून प्रस्तावित कामांचा आराखडा, अंदाजपत्रकाला लवकरच मंजुरी मिळेल. आगामी महिनाभरात कामांना प्रारंभ होईल. पुढील पावसाळ्यापूर्वी निसर्ग पर्यटन योजनेतून राऊतवाडी धबधबा क्षेत्र परिपूर्ण निसर्ग पर्यटनस्थळ बनेल.
- डॉ. अजित साजणे, वन्यजीव विभाग अधिकारी.
 

Web Title: Kolhapur News Rautwadi place develop as tourism spot