स्वाईन फ्लूवर नियंत्रणासाठी सज्ज - डॉ. कुणाल खेमणार

स्वाईन फ्लूवर नियंत्रणासाठी सज्ज - डॉ. कुणाल खेमणार

कोल्हापूर - वातावरणात होणारा अचानक बदल आणि दैनंदिन कमाल व किमान तापमानात आढळून येणारी तफावत यामुळे नवनवीन विषाणू विकसित होत असल्याने स्वाईन फ्लूसारख्या साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे.आतापर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावर साडेतीन हजार रुग्णांचे सर्वेक्षण केले आहे. मात्र या काळात नागरिकांनीही काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ते म्हणाले, ‘‘जानेवारीपासून वीस जणांना इन्फ्लुएंझा ए एच १ एन १ लागण झाली असून त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला. तापमानात तफावतीमुळे स्वाईन फ्लू विषाणूच्या वाढीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रांच्या वतीने सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. त्यांना नियमीत आरोग्य सेवा पुरविण्यासाठी जिल्ह्यातील ७४ प्राथमिक आरोग्य केंद्र, ५ प्राथमिक आरोग्य पथके, २० ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, १६ आयुर्वेदिक दवाखाने, ८ तालुका दवाखाने व ४१३ उपकेंद्र अशा ५३६ आरोग्य संस्था ग्रामीण भागात कार्यरत आहेत. याकरिता ४२६ आरोग्य सेविका, १०८ आरोग्य सहाय्यिका, २२८ आरोग्य सेवक, १२८ आरोग्य सहाय्यक, २२ आरोग्य पर्यवेक्षक, १२४ वैद्यकीय अधिकारी तसेच एनआरएचएम अंतर्गत २४० आरोग्य सेविकांसह अन्य कर्मचारी व अधिकारी मिळून १३४५ जण कार्यरत आहेत. तालुका वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यात समन्वय साधून सर्वेक्षण केले जात आहे. इन्फ्ल्युएंझा सर्वेक्षण, रुग्णावर लक्षणानुसार उपचार आणि रुग्णांचा शोध व उपचार ही जबाबदारी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपविली आहे. प्राथमिक स्तरावर उपचारात रुग्णात फरक नाही पडला तर हे रुग्ण सीपीआरकडे पाठविले जातात. या ठिकाणी दहा बेड व तीन व्हेंटीलेटर कार्यरत आहेत. यासाठी लागणारा औषधसाठा देखील पुरेसा आहे. आतापर्यंत ७६० जणांनी लस टोचून घेतली आहे.

हे करा
ताप, थंडीची लक्षणे दिसताच तातडीने उपचार घेणे.
बाहेरून आल्यानंतर हात स्वच्छ साबणाने धुणे.
शिंकताना नाकासमोर रुमाल धरा.
सर्दी किंवा श्वसनाचा विकार झाल्यास डॉक्‍टरांशी संपर्क साधा.
लिंबू, आवळा, मोसंबी, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात उपयोग करा
फ्लूवरील उपचार ४८ तासांच्या आत सुरू झाल्यास अधिक गुणकारी ठरते.

हे करू नका
उपचारास विलंब व घरगुती अथवा गावठी औषधोपचार करू नयेत.
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
उघड्यावर शिंकू नका.
स्वत:च्या इच्छेप्रमाणे औषध बंद करू नका.
रुग्णांना भेटावयास जाताना योग्य ती खबरदारी घेतल्याशिवाय जाऊ नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com