राधानगरी ‘अभयारण्यग्रस्तां’चे टप्प्याटप्प्याने पुनर्वसन

मोहन नेवडे
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

राधानगरी - विस्तारीत राधानगरी वन्यजीव अभयारण्यात समाविष्ट आणि अभयारण्य क्षेत्राबाहेर पुनर्वसनाची मागणी केलेल्या १३ महसुली गावांतर्गंत ३० वाड्यांवस्त्यातील जवळपास ११५६ कुटुंबांच्या पुनर्वसनाची कार्यवाही टप्प्याटप्प्याने वन्यजीव विभागाकडून सुरू आहे, मात्र पुनर्वसनासाठीचे दोन पर्याय व पर्यायी जमीन उपलब्धतेतील अडचणींमुळे कालबद्ध कृती आराखडाच नाही.

राधानगरी - विस्तारीत राधानगरी वन्यजीव अभयारण्यात समाविष्ट आणि अभयारण्य क्षेत्राबाहेर पुनर्वसनाची मागणी केलेल्या १३ महसुली गावांतर्गंत ३० वाड्यांवस्त्यातील जवळपास ११५६ कुटुंबांच्या पुनर्वसनाची कार्यवाही टप्प्याटप्प्याने वन्यजीव विभागाकडून सुरू आहे, मात्र पुनर्वसनासाठीचे दोन पर्याय व पर्यायी जमीन उपलब्धतेतील अडचणींमुळे कालबद्ध कृती आराखडाच नाही.

विस्तारीकरणानंतर तब्बल तीन दशकांनी पुनर्वसन कार्यवाही सुरू झाल्याने अद्याप ५० टक्के कुटुंबे पुनर्वसित झालेली नाहीत. सात वर्षांपूर्वी २०१२ ला राज्य शासनाने अभयारण्यग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनाबाबतचे धोरण निश्‍चित केले. या धोरणानुसार अभयारण्यग्रस्त कुटुंबांना पुनर्वसित होण्यासाठी दोन पर्याय दिलेत. पहिल्या पर्यायानुसार ऐच्छिक पुनर्वसन योजनेंतर्गत प्रतिकुटुंब दहा लाख रुपयांचे पॅकेज, तर दुसऱ्यात पर्यायी जमीन मिळणार आहे. प्रत्यक्षात दोन वर्षांपासून वन्यजीव विभागाने पुनर्वसन धोरणानुसार अभयारण्यग्रस्त कुटुंबाच्या पुनर्वसनासाठीची प्रक्रिया सुरू केली.

त्यानंतर एजीवडे, न्यू करंजे, दाऊदवाडी, कारिवडे व रामणवाडी या मोजक्‍याच खेड्यातील कुटुंबांनी ग्रामसभेच्या ठरावाद्वारे पुनर्वसनाला संमती दिली. त्यातही अधिक कुटुंबांनी ऐच्छिक , तर काही कुटुंबांनी पर्यायी जमिनीचा पर्याय स्वीकारला. सर्वात आधी एजीवडेतील एकशे चौदा कुटुंबांनी ऐच्छिक पुनर्वसनाला संमती देऊन पॅकेज रक्कम स्वीकारली. येथील नव्वद टक्‍क्‍यांहून अधिक कुटुंबे स्वतःच इतरत्र पुनर्वसित झाल्याने एजीवडे पुनर्वसन होणारे पहिले खेडे ठरणार आहे, तर दाऊदवाडीतील त्रेपन्न कुटुंबांपैकी अठ्ठावीस कुटुंबांनी ऐच्छिक, तर पंचवीस कुटुंबांनी पर्यायी जमिनीनुसार पुनर्वसित होण्यास संमती दिली. 

सध्या न्यू करंजेतील २२३ कुटुंबांच्या पुनर्वसनाची कार्यवाही सुरू झाली. यातील ऐच्छिक पुनर्वसनाचा पर्यायाला संमती असलेल्या ८५ कुटुंबांना पॅकेज रक्कम देण्याचे काम सुरू आहे, तर दीडशे कुटुंबांना पर्यायी जमीन द्यावी लागणार आहे. कारिवडेतील पुनर्वसनाची मागणी केलेल्या २९ कुटुंबांची, तर रामणवाडीतील सर्व कुटुंबांची संकलन यादी तयार करण्यात येत आहे. 

पुनर्वसन मागणी केलेली गावे, वाड्या-वस्त्या

कारिवडे, रोणोसेवाडी, डीगस, जुने करंजे, शेळप, मांडरेवाडी, कदमवाडी, बांबर, हसणे, सतीची माळ, धनगरवाडा, हरिजनवाडा, ओलवण, माळेवाडी, दाजीपूर, भटवाडी, शिवाचीवाडी, रामणवाडी, खालचा धनगरवाडा, वरचा धनगरवाडा, पाटपन्हाळा, भोसलेवाडी, पाटपन्हाळा धनगरवाडा, न्यू करंजे, दाऊदवाडी, भैरीबांबर, असणगाव धनगरवाडा, फराळे धनगरवाडा.

Web Title: Kolhapur News Rehabilitation of Radhanagari 'Wildlife Sanctuaries'