चव्हाणसाहेब, आता तुम्हीच लक्ष घाला

चव्हाणसाहेब, आता तुम्हीच लक्ष घाला

कोल्हापूर - राज्य सरकारविरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली. त्यातून कार्यकर्त्यांतील मरगळ झटकली जात आहे, नेत्यांच्या दौऱ्याने शिवसेना, भाजप कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे; पण एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात काँग्रेस मात्र गटबाजीतच अडकली आहे.

सद्यस्थितीत नेत्यांनी ठरवले तर काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस येऊ शकतील; पण त्यासाठी पुढाकार कोण घेणार ? हाच प्रश्‍न आहे. आज (ता. १) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण जिल्ह्यात येत आहेत. आता त्यांनीच स्वतःच्या जिल्ह्याप्रमाणे याही जिल्ह्यात लक्ष घालण्याची गरज आहे. 
पुरोगामी अशी ओळख असलेल्या या जिल्ह्यावर राष्ट्रवादीच्या स्थापनेपूर्वी काँग्रेसचेच वर्चस्व होते.

गावातील ग्रामपंचायतीपासून महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा ते लोकसभेपर्यंत सर्वत्र काँग्रेसच काँग्रेस होती. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरही काँग्रेसचा गड शाबूतच होता; पण पाच-सात वर्षांत नेत्यांतील अंतर्गत गटबाजीतून काँग्रेसची वाताहत झाली. आज पक्षातील नेत्यांची नावे घ्यायचे म्हटले तर जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील ही दोन नावे सोडली तर तिसरे नाव पुढे येत नाही; पण या दोघांचीही तोंडं दोन दिशेला आहेत. दोन ताकदीच्या नेत्यांच्या दिशा पक्षात असूनही वेगळ्या आहेत.

माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केव्हाच पक्षापासून फारकत घेतली. दुसरे माजी मंत्री जयवंतराव आवळे काँग्रेसचे निष्ठावंत; पण जिल्हा बॅंक, शिवाजी विद्यापीठाच्या निवडणुकीत मुलाची वर्णी लावण्यापुरताच त्यांचा पक्षाशी काय तो संबंध येतो. माजी आमदार बजरंग देसाई यांच्या स्नुषा काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या मात्र मुलाने अलीकडेच थेट भाजपतच प्रवेश केल्याने पक्षापासून लांबच. पक्षाचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांना यापूर्वीच निलंबित केले. 

पक्षांतर्गत गटबाजीमुळे विधानसभेत जिल्ह्यातील एकही आमदार काँग्रेसचा नाही. जिल्हा परिषदेची पक्षाकडे असलेली सत्ता गेली. महापालिकेत सत्ता असली तरी ती कधी जाईल, याची शाश्‍वती नाही. जिल्हा बॅंकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. ‘गोकुळ’वर काँग्रेसची सत्ता आहे म्हणतात; पण या ठिकाणी आमदार पाटील व पी. एन. यांच्यातच मतभेद आहेत. पी. एन. यांनी बोलवलेल्या कार्यक्रमाला सतेज पाटील समर्थक येत नाहीत, सतेज यांच्या कार्यक्रमाला पी. एन. यांचे कार्यकर्ते येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. 

चव्हाण कानमंत्र देतील का ? 
जिल्ह्यातील काँग्रेसच्या अशा परिस्थितीत आज (ता. १) जिल्ह्याच्या दौऱ्यावर प्रदेशाध्यक्ष चव्हाण येत आहेत. राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असूनही श्री. चव्हाण यांनी नांदेडची महापालिका एकहाती जिंकण्याचा करिष्मा करून दाखवला. राज्य व केंद्रातील मंत्र्यांनी नांदेडमध्ये तळ ठोकला असताना श्री. चव्हाण या सर्वांना भारी पडले. आता हेच श्री. चव्हाण कोल्हापुरातील नेत्यांना कानमंत्र देतील का ?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com