कारखान्यांच्या साखर विक्रीवर निर्बंध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - साखरेच्या दरात घसरण झाल्याने अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी आयात शुल्कात शंभर टक्के वाढ करण्याच्या निर्णयानंतर कारखान्यांच्या साखर साठ्यावर निर्बंध घालण्याचे दुसरे पाऊल केंद्र सरकारने उचलले. या निर्बंधामुळे कारखान्यांना फेब्रुवारीत केवळ १७ टक्केच तर मार्चमध्ये १४ टक्केच साखर विकता येणार आहे. 

देशांतर्गत साखरेच्या दरात गेल्या दोन महिन्यांत प्रतिक्विंटल सुमारे ८०० रुपयांची घसरण झाली आहे. सध्या असलेल्या साखरेच्या दरातून एफआरपीसाठी लागणारी रक्कम कारखान्यांकडे उपलब्ध होत नाही. साखरेचे बाजारातील दर स्थिर राहावेत, यासाठी पहिल्यांदा आयात साखरेवरील शुल्क पन्नास टक्‍क्‍यांवरून शंभर टक्के करण्यात आले. त्यानंतर देशांतर्गत बाजारात अतिरिक्त साखर कारखान्यांकडून येऊ नये, यासाठी आज केंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने येत्या दोन महिन्यांसाठी कारखान्यांच्या साखर साठ्यावरच निर्बंध आणले आहेत. 

नव्या निर्बंधामुळे कारखान्यांना फेब्रुवारीच्या सुरुवातीला असलेला साठा, त्यात या महिन्याचे उत्पादन व त्यातून निर्यात केलेली साखर वजा करून केवळ १७ टक्केच साखर विक्रीसाठी बाहेर काढता येईल. याचा अर्थ फेब्रुवारीअखेर कारखान्यांकडे ८३ टक्के साखर शिल्लक असली पाहिजे. मार्चसाठीही याच सूत्रानुसार ८६ टक्के साखर कारखान्यांकडे शिल्लक असायला पाहिजे, म्हणजेच मार्चमध्ये केवळ १४ टक्के साखर विक्रीसाठी बाहेर काढता येईल. 

केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या कमाल मर्यादेपेक्षा कमी साखर विक्री करता येईल; पण त्यापेक्षा जास्त साखर कोणत्याही कारखान्यांना विकता येणार नाही. तसा प्रकार झाल्यास संबंधित कारखान्यावर दंडात्मक कारवाईचा इशारा सरकारने दिला आहे. देशात २२ लाख टन साखरेची गरज आहे, तेवढीच साखर बाजारात यावी, हाही या मागचा उद्देश आहे. या निर्णयाने साखर उद्योगाला पुन्हा एक दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचे सहसचिव सुभाषिश पंडा यांनी हे आदेश काढले आहेत.

Web Title: Kolhapur News Restrictions on the sale of sugar