सेवा पुस्तके मिळवताना निवृत्त शिक्षकांना मनस्ताप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषद शाळांत शिक्षक म्हणून दीर्घकाळ सेवा बजावलेल्या व नवी पिढी घडविण्यात मोलाचे योगदान दिलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांची चारशेहून अधिक सेवापुस्तके जिल्हा परिषदेच्या कागदोपत्री गठड्यात दडली आहेत. यामुळे गेली दोन वर्षे पाठपुरावा करून थकलेल्या सेवानिवृत्तांना पेन्शनपासून इतर आर्थिक लाभ मिळविण्यासाठी अडथळे येत आहेत. 

कोल्हापूर - जिल्हा परिषद शाळांत शिक्षक म्हणून दीर्घकाळ सेवा बजावलेल्या व नवी पिढी घडविण्यात मोलाचे योगदान दिलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांची चारशेहून अधिक सेवापुस्तके जिल्हा परिषदेच्या कागदोपत्री गठड्यात दडली आहेत. यामुळे गेली दोन वर्षे पाठपुरावा करून थकलेल्या सेवानिवृत्तांना पेन्शनपासून इतर आर्थिक लाभ मिळविण्यासाठी अडथळे येत आहेत. 

जिल्हा परिषदेत बहुतेक अधिकारी व कर्मचारी एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने सेवा पुस्तकांचा घोळ सोडविण्याचा बोजा उतारवयातील शिक्षकांच्या डोक्‍यावर आला आहे. 

जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाचे अनेक पदाधिकारी ही गडप झालेली सेवा पुस्तके मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे हेलपाटे मारत आहेत. काही वेळा तुमची सेवा पुस्तके तालुका शिक्षण विभागाकडे दिली आहेत. तिथे संपर्क साधा, तिथेच तुम्हाला सेवा पुस्तके मिळतील, असे सांगितले गेले. त्यानुसार काही सेवानिवृत्त तालुक्‍याला गेले. तेथे चार पुस्तके मिळाली आहेत. उर्वरितांची पुस्तके पुढच्या पंधरा दिवसांत येतील, असे सांगून पुन्हा हेलपाट्याचा मार्ग दाखविला गेला. एखाद्या शिक्षकाने फारच चिकाटी दाखविली तर ‘तुम्ही जिल्हा परिषदेत जा’ एवढेच मोघम उत्तर मिळाले. तर काही वेळा शिरोळ तालुक्‍यातील सेवानिवृत्त शिक्षकांची सेवा पुस्तके पन्हाळा तालुक्‍याकडे चुकून पाठविली गेल्याचे सांगण्यात आले. तेथून परत आल्यानंतर देऊ, असेही उत्तर मिळाले.  

या साऱ्या अजब अनुभवातून तावून सुलाखून निघालेल्या शिक्षक संघाच्या शिक्षकांनी वयाची ऐंशी ते नव्वदी गाठलेली आहे. अशा शिक्षकांनी सेवा पुस्तके शोधण्याचा चंग बांधला. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या रेकॉर्ड विभागात गेले, तेथे सेवा पुस्तकांचा शोध घेतला. तेव्हा त्यांना कशीबशी शंभर सेवा पुस्तके हाती लागली; पण उतारवयातील शिक्षकांना रोज येऊन कागदोपत्राच्या गठ्ठ्यातून सेवा पुस्तक शोधण्याचे काम शारीरिकदृष्ट्या सत्व परीक्षा पाहणारे ठरले आणि तोही प्रयत्न थांबला. 
तरीही शिक्षण विभागाला याची दया आली नाही. उर्वरितांची सेवा पुस्तके केव्हा मिळतील, हे अजूनही सांगितले जात नसल्याने सेवानिवृत्त शिक्षक हवालदिल झाले आहेत.   

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी न्याय द्यावा
जिल्हा परिषदेतील २७ टन रद्दी नष्ट करण्यात येणार असल्याची माहिती सेवानिवृत्त शिक्षक संघास समजली. संघाने पुरातत्त्व विभागाला निवेदन देऊन या रद्दीत सेवानिवृत्तांची सेवा पुस्तके नष्ट होणार नाहीत, याची खबरदारी घेण्याची मागणी केली. त्यानंतर पुरातत्त्व विभागाने तसे पत्र जिल्हा परिषदेला देऊन सेवा पुस्तक नष्ट होणार नाहीत, याची काळजी घेण्यास सांगितले. तरी सेवा पुस्तके शोधणे व वेळेत सेवानिवृत्तांपर्यंत पोचविणे हे काम शिक्षण विभागाचे आहे. मात्र, त्यांनीही ते काम वेळेत न केल्याने वरिष्ठ अधिकारी संतापल्याशिवाय कामच करायचे नाही, अशा मानसिकतेत विभाग असल्याचे पूर्वानुभवातून दिसते. त्यामुळे सेवानिवृत्तांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीच न्याय द्यावा, अशी अपेक्षा होत आहे.

Web Title: Kolhapur News retired teachers service book issue