प्लास्टिकच्या रस्त्यापासून... प्लास्टिक खाणाऱ्या जीवाणूपर्यंत

युवराज यादव
सोमवार, 11 डिसेंबर 2017

कोल्हापूर - प्लास्टिकचा वापर करणारा भारत हा जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. सुमारे साडेतीन कोटी लोकांचा तो रोजगार बनला आहे... सर्वसामान्यांचे तर जीवनच जणू प्लास्टिकमय झाले आहे. या साऱ्यातून प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्‍न विक्राळ रूप धारण करत आहे.

कोल्हापूर - प्लास्टिकचा वापर करणारा भारत हा जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. सुमारे साडेतीन कोटी लोकांचा तो रोजगार बनला आहे... सर्वसामान्यांचे तर जीवनच जणू प्लास्टिकमय झाले आहे. या साऱ्यातून प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्‍न विक्राळ रूप धारण करत आहे. यासाठी प्लास्टिकच्या विल्हेवाटीचे विविध उपाय शोधले जात आहेत. यातून प्लास्टिकचा अक्राळविक्राळ रूप घेत चाललेल्या राक्षसाला रोखण्यासाठी काही प्रभावी उपायही समोर आले आहेत. या संशोधनांमध्ये प्लास्टिकच्या विविधांगी पुनर्वापराबरोबरच प्लास्टिक (पॉली) खाणाऱ्या जीवाणूच्या शोधाचाही समावेश आहे. त्यामुळे भविष्यातील प्लास्टिकविरोधी मोहिमेत टाळता न येऊ शकणाऱ्या प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठीआशादायक चित्र निर्माण झाले आहे...

प्लास्टिकच्या रस्त्याचा यशस्वी मंत्र
प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यासंदर्भात भारतात क्रांतिकारी संशोधन केले आहे ते डॉ. आर. वासुदेवन यांनी. त्यांनी प्लास्टिकचा वापर रस्त्यासाठी करून त्याच्या पुनर्वापरासाठी प्रभावी उपाय शोधला. त्यामुळे आता ‘प्लास्टिक रोड मॅन’ अशी त्यांची ओळख बनली आहे.

मदुराई येथील थियागराजर अभियांत्रिकी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख असलेले वासुदेवन यांनी २००२ मध्ये आपल्या कॉलेज कॅम्पसमधील रस्ते प्लास्टिकच्या वापरातून बनवले व हा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवला. यामध्ये रस्त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खडीला प्लास्टिक कोटिंग करण्यात येते आणि नंतर ती डांबरीकरणासाठी वापरण्यात येते. यामुळे रस्ता भक्‍कम होतोच; पण त्याचबरोबर नंतरचा देखभालीचा खर्चही ५० टक्‍के वाचतो. या रस्त्यात पाणी मुरण्याचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे तो जास्त टिकतो. तमिळनाडूच नव्हे तर देशातील अनेक राज्यांमध्ये त्यांच्या प्लास्टिकच्या रस्त्याचे प्रयोग सिद्ध झाले असून २०११ मध्ये वन आणि पर्यावरण मंत्रालयाने सर्व प्रशासकीय यंत्रणांना प्लास्टिकचा पुनर्वापर करण्याबद्दल सूचना दिल्या.

प्लास्टिक कचऱ्यावर उपाय शोधण्याबरोबर आपल्या देशातील रस्ते भक्‍कम आणि सुरक्षित करण्याचे डॉ. वासुदेवन यांचे ध्येय आहे. यासाठीच भारत सरकारला आपले तंत्र वापरासाठी नि:शुल्क देत असल्याचे ते सांगतात. विशेष म्हणजे त्यांच्या महाविद्यालयातील विभागात आता ‘कोल्ड प्रोसेस टेक्‍नॉलॉजी’वर संशोधन करण्यात येत आहे. यामध्ये रस्ते बनवताना गरम अवस्थेत मिश्रण बनवण्याऐवजी ते थंड अवस्थेत (कोल्ड इमल्शन) बनवण्याचे तंत्र विकसित करण्यात येत आहे. यामुळे थंड प्रदेशातही रस्ते बनवणे सोपे होणार आहे, तसेच धुरामुळे होणारे प्रदूषणही टळणार आहे. फिलाडेल्फिया येथील वायडनर विद्यापीठानेही या प्रकल्पाच्या संशोधनात रस दाखवला आहे. 

इंधन निर्मिती

पुण्यातील रुद्र एन्व्हायर्न्मेंटल सोल्युशन्सने प्लास्टिकपासून इंधन (पॉली-फ्युएल) बनवण्याचा नवा मार्ग शोधला आहे. या संस्थेच्या मेधा ताडपत्रीकर यांनी दोन प्रकल्प सुरू केले असून यातील यंत्रे त्यांनी आणि त्यांच्या टीमने विकसित केली आहेत. यामध्ये पायरोलायसीस तंत्राने प्लास्टिकचे विघटन करून त्याचे इंधन, गॅस आणि गाळात रूपांतर केले जाते. यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, फूड पाऊच, वॅपर्स, केबल कव्हर्स आदींचा वापर केला जातो. पुण्यातील ५५०० घरांत ही मोहीम राबवण्यात आली असून तेथून एका महिन्यात ५ ते ६ टन प्लास्टिक गोळा केले जाते.

२००९ मध्ये मेधा आणि शिरीष फडतारे यांनी ठाण्यात एका हरणाच्या जोडीचा प्लास्टिक खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याचे पाहिले. याबाबत काहीतरी करण्याचे ठरवून ते कामाला लागले. सुरुवातीला त्यांनी चक्‍क प्रेशर कुकरमध्ये प्लास्टिक उकळून प्रयोग केला. यानंतर त्यांच्या काही तज्ज्ञ मित्रांनी यासाठीचे मशीन बनवण्यासाठी मदत केली. प्लास्टिक हे मूळ क्रूड ऑईलपासून बनवले जाते. त्यामुळे उलटी प्रक्रिया करून प्लास्टिकचे इंधनात रूपांतर करण्यासाठी त्यांनी प्रयोग सुरू केले. यासाठी तीन मशीन बनवल्या गेल्या.

टप्प्याटप्याने सुधारणा करीत २०१४ मध्ये सुधारित मशीन बनवण्यात यश आहे. गोळा केलेले प्लास्टिक एका बंद भट्टीत (रिॲक्‍टर) टाकले जाते. त्यामध्ये उत्प्रेरक (कॅटॅलिस्ट) घालून १५० अंश सेल्सियसपर्यंत गरम केले जाते. यावेळी निघणारे मिथेन, प्रोपेनसारखे वायू गोळा केले जातात. जे नंतर पुढील आवर्तनात प्लास्टिक आणखी गरम करण्यासाठी स्रोत म्हणून वापरले जातात. यावेळी प्लास्टिकचे इंधन बनते व राहिलेले गॅस घनरूप (गाळ) घेतात. १०० किलो प्लास्टिकपासून ४५ ते ६५ लिटर इंधन बनते, तर यातील २० टक्‍के भागाचे गॅस, पाणी आणि गाळात रूपांतर होते. यातील गाळामध्ये पॉलिमरचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा वापर खडीसोबत रस्ता बनवण्यासाठी केला जातो. यामुळे प्लास्टिकचे १०० टक्‍के रूपांतर होते, तेही कोणत्याही प्रकारचे प्रदूषण न करता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News Reuse of plastic