नद्या प्रदुषण प्रश्‍नी हरित लवादकडे दाद मागणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

सध्या वारणेच्या पाण्याचा जो वाद सुरु आहे त्याचे मूळही पंचगंगा प्रदुषण आहे. याप्रश्‍नी सातत्याने आंदोलने केली आहेत. मात्र, सरकारकडून याला प्रतिसाद मिळाला नाही. नदीकाठावरील जीवांचे हाल होत असतानाही याकडे होणारे दुर्लक्ष वेदनादायी आहे. शासनाकडून याला प्रतिसाद मिळत नसल्यानेच राष्ट्रीय हरीत लवादाकडे न्याय मागण्याची वेळ आली आहे, असेही धर्माधिकारी म्हणाले.

जयसिंगपूर - शिरोळ तालुक्‍यातील पंचगंगा, कृष्णा, वारणा आणि दूधगंगा नद्यांनी प्रदुषणाची पातळी ओलांडली आहे. याप्रश्‍नी शिरोळ येथील छत्रपती ताराराणी आघाडीचे संस्थापक प्रसाद धर्माधिकारी यांच्यावतीने अॅड. धैर्यशील सुतार यांनी हरीत लवादाकडे दाद मागणार असल्याची नोटीस उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, पुणे विभागीय आयुक्तांसह कोल्हापूर व सांगली जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिली आहे. या नोटीसीला पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. 

माहिती देताना श्री धर्माधिकारी म्हणाले, नदीकाठावरील ग्रामस्थांसह जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आणखीन किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला याप्रश्‍नी जाग येणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. साथीच्या आजारांनी अनेकांचे बळी गेले आहेत. दरवर्षी सातत्याने लाखो मासे मृत होत आहेत. प्रदुषित पाण्यामुळे शेती नापिक होण्याचा धोका वाढला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण हा मुद्दा शासनाच्या निदर्शनास आणून देत आहे. मात्र, शासन याप्रश्‍नी ढिम्म आहे. 

सध्या वारणेच्या पाण्याचा जो वाद सुरु आहे त्याचे मूळही पंचगंगा प्रदुषण आहे. याप्रश्‍नी सातत्याने आंदोलने केली आहेत. मात्र, सरकारकडून याला प्रतिसाद मिळाला नाही. नदीकाठावरील जीवांचे हाल होत असतानाही याकडे होणारे दुर्लक्ष वेदनादायी आहे. शासनाकडून याला प्रतिसाद मिळत नसल्यानेच राष्ट्रीय हरीत लवादाकडे न्याय मागण्याची वेळ आली आहे, असेही धर्माधिकारी म्हणाले.

कोल्हापूर शहराचे दररोज 120 दशलक्ष लिटर तर इचलकरंजीचे 60 दशलक्ष लिटर पाणी कोणत्याही प्रक्रियेविना नदीत मिसळत आहे. याशिवाय पंचगंगा काठावरील विविध धार्मिक विधी, कत्तलखाने, साखर कारखाने, पंचतारांकित औद्योगिक वसाहती, औद्योगिक वसाहती, विविध गावचे सांडपाणी, सांगलीच्या शेरीनाल्याचे पाणी थेट कृष्णा व पंचगंगा नदीत मिसळते. नद्या प्रदुषणमुक्त करण्यासाठी आता हरीत लवादाकडे धाव घेतली असून यातून न्याय मिळेल अशी अपेक्षा श्री धर्माधिकारी म्हणाले. 

वारणा आणि कोयना धरणातून 278 दशलक्ष घनफूट पाणी राजापूर बंधाऱ्यात अडवले जाते. पंचगंगा आणि कृष्णेच्या प्रदुषणामुळे हे सर्वच पाणी प्रदुषित बनले आहे. यामुळे कॅन्सर, कावीळ, गॅस्ट्रो, टायफाईडच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. नद्या प्रदुषणमुक्तीसाठी आपला लढा आहे. 

- प्रसाद धर्माधिकारी

Web Title: Kolhapur News River Pollution Issue