तुम्हीच सांगा रस्ते कसे झाडायचे?

मोहन मेस्त्री
मंगळवार, 22 मे 2018

कोल्हापूर - नालेसफाई इतकी रस्ते स्वच्छताही गरजेची असते. या झाडू कामगारांना प्रत्येक वर्षाला झाडू (खराटा), खोरे, प्लास्टिक बुट्टी, चामडी चपला, घोंगडे, स्वेटर दरवर्षी मिळत असे; पण गेल्या पाच वर्षांपासून यातील कोणतीही वस्तू मिळाली नसल्याची तक्रार कर्मचारी खासगीत करतात.

कोल्हापूर - नालेसफाई इतकी रस्ते स्वच्छताही गरजेची असते. या झाडू कामगारांना प्रत्येक वर्षाला झाडू (खराटा), खोरे, प्लास्टिक बुट्टी, चामडी चपला, घोंगडे, स्वेटर दरवर्षी मिळत असे; पण गेल्या पाच वर्षांपासून यातील कोणतीही वस्तू मिळाली नसल्याची तक्रार कर्मचारी खासगीत करतात. एकीकडे खराटा, खोरे आणि बुट्टीही नसल्याची तक्रार त्यांना कोणाकडे करता येत नाही. मात्र रस्ते सफाई झाली नाही तर नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या रोषाला यांनाच सामोरे जावे लागते. 

झाडू कामगारांना खराट्याप्रमाणे गवत काढण्यासाठी विळाही गरजेचा असतो. उपनगरात अनेक ठिकाणी गटारे वा ड्रेनेजलाईन नसल्याने पाणी उघड्या जमिनीवरूनच वाहत असते. तेथे  गवत वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे रस्ते झाडण्यापेक्षा गवत कापण्याचेच काम अधिक असल्याचे कामगार सांगतात. यासाठीचा विळाही २५० ते ३०० रुपये खर्च करून स्वत: घ्यावा लागत आहे. या दलदलीच्या व गटारींच्या आसपासचे गवतही कापून टाकताना हातमोजे नसल्याने धोकाच असतो.  

शहरातील प्रमुख रस्ते सफाई आणि उघड्या गटारी साफ करण्याकडे नागरिक आणि अधिकाऱ्यांचेही बारीक लक्ष असते. सध्या तर रात्रीच्या वेळी रस्ते साफ काम करून घेतले जातात. मशीनद्वारेही मुख्य रस्ते स्वच्छ केले जात असले तरी गल्लीत मात्र झाडू कामगारच असतात. 

हंगामी कर्मचारी वाऱ्यावरच
आरोग्य विभागात ४० ते ५० वर्षें काम करूनही हंगामीच असणारे कामगार आहेत. या कामगारांना ना नोकरीची शाश्‍वती, ना त्यांच्या जीवाची काळजी अशी स्थिती आहे. हंगामी सफाई कामगारांना तर कोणतीही साधने दिली जात नाहीत.

आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षक साधने नाहीत हे सत्य आहे.त्यांना पैसे जमा करण्याचा निर्णय झालेला आहे. याबाबत पावसाळ्यापूर्वी नक्कीच याेग्य ती कार्यवाही केली जाईल. 
-डॉ. दिलीप पाटील,
प्र. आरोग्य अधिकारी, महापालिका

Web Title: Kolhapur News Road cleaning issue