आणखी किती बळी घेणार?

कोल्हापुरातील खड्ड्यांवर ‘सकाळ’ने प्रकाश टाकला. हा अंकच सभेत दाखवताना आशीष ढवळे आणि राजसिंह शेळके.
कोल्हापुरातील खड्ड्यांवर ‘सकाळ’ने प्रकाश टाकला. हा अंकच सभेत दाखवताना आशीष ढवळे आणि राजसिंह शेळके.

कोल्हापूर - ‘‘शहरातील खड्डे बुजविले जात नाहीत. अधिकारी निगरगट्ट आहेत. आणखी किती बळी गेल्यावर आपल्याला जाग येणार? बळी गेल्यानंतरच महापालिका काम करणार का? यासह अनेक प्रश्‍नांचा भडिमार नगरसेवकांनी अधिकाऱ्यांवर करीत आजची सभा गाजविली. महापौर हसीना फरास सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. राजहंस प्रिंटिंग प्रेसजवळच्या महापालिकेच्या अपुऱ्या कामामुळे दोन सख्ख्या भावांना जीव गमवावा लागला. त्याला दोषी कोण, यावर नगरसेवकांनी भर दिल्यानंतर यासाठी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना चौकशी करण्याचे आदेश आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सभागृहात दिले.

नगरसेवक चव्हाणांची ‘अरे-कारे’ची भाषा
अपघातात दोन बळी गेल्याच्या घटनेवर बोलताना नगरसेवक राहुल चव्हाण संतप्त झाले. त्यांनी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांच्याशी ‘आरे तुरे’ भाषेत बोलायला सुरवात केली. त्यावर महापौर हसीना फरास यांनी राहुल चव्हाण यांना ताकीद देताना, ‘‘तुम्ही मान द्या आणि तुम्ही मान घ्या. कोणालाही एकेरी भाषेत बोलू नका. तुमच्या भावना जरूर व्यक्त करा. तुम्हाला जे बोलायचे ते बोला; पण ‘आरे कारे’ची भाषा करू नका. त्यानंतर श्री. चव्हाण यांनी श्री. कुलकर्णी यांना धारेवर धरत कामात दिरंगाई का केली, असा सवाल केला. नगरसेवक सत्यजित कदम, किरण नकाते, शारंगधर देशमुख, मुरलीधर जाधव, विजय सूर्यवंशी, स्मिता माने, सूरमंजिरी लाटकर, वहिदा सौदागर यांनीही अधिकाऱ्यांना प्रश्‍न विचारून भंडावून सोडले. श्री. नकाते यांनी हे काम अधिकाऱ्याच्या हलगर्जीमुळेच रखडल्याने अपघातात मृत झालेल्या कुटुंबीयांना महापालिकेने मदत देण्याची मागणी केली.

नालेसफाई झालीच नाही - प्रा. पाटील
प्रा. जयंत पाटील म्हणाले, ‘‘शहरात नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला, तरी नालेसफाई झालीच नाही. त्याचा अनुभव या पावसात आला. नालेसफाईला आपल्याकडे बजेटच नाही, ही धक्कादायक बाब आली आहे. आयआरबी आणि नगरोत्थानमधील रस्त्यालगतच्या गटारी हे पाणी तुंबण्याचे कारण बनल्या आहेत. फुटपाथने विनाकारण जागा अडवून ठेवली आहे. त्यामुळे या गटारी साफ कराव्यात, फुटपाथवर गवत वाढून अनेक अडथळे आहेत. ते दूर करावेत.’’ जयश्री जाधव यांनीही नालेसफाई न झाल्याचा फटका या पावसात अनेक कुटुंबांना बसला. गरिबांचे संसार पाण्यात गेले, हे पाहून दुःख झाले. यापुढे महापालिकेने नीट नालेसफाई करायला हवी. नाल्यात, खरमातीचे ढीग होते. त्यामुळे पाणी तुंबून लोकांच्या घरात गेले. नालेसफाईकडे लक्ष द्यायलाच हवे, असे मत व्यक्त केले.

प्रलंबित फाईलींचे प्रकरण प्रशासनाच्या अंगलट
प्रलंबित फाईलींच्या विषयावरूनही दिलीप पोवार, किरण शिराळे, शेखर कुसाळे, सत्यजित कदम, स्मिता माने यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ई फाईलींचा आग्रह असतो, मग स्कॅनिंग केलेली मूळ फाईल तुम्हाला का हवी असते? प्रशासन लोकांना खेटे मारायलाच लावते. नगरसेवकही त्यात भरडले जातात, असे सांगत अनेक नगरसेवकांनी फाईलींविषयी आपले अनुभव सांगितले.

कोल्हापूरचा विकास कसा होणार? - स्मिता माने
स्मिता माने म्हणाल्या, ‘‘महापालिकेत सहा-सहा महिने, वर्षभर फाईली प्रलंबित राहतात. फाईलींसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. या फाईली कोणाच्या व्यक्तिगत नसतात. त्या विकासकामांच्याच असतात. इतका काळ फाईली रेंगाळणार असतील तर कोल्हापूरचा विकास कसा होणार? विकासाची गतीही संथच राहील, असे मत व्यक्त करीत फाईलींचा निपटारा जलद व्हावा, अशी अपेक्षा व्यक्‍त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com