चालक, मोटार मालकाच्या मित्रानेच सराफास लुबाडले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - गुजरीत मुंबईतील सराफाला लुटण्यासाठी वापरलेली मोटार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मोटारीवरील चालक आणि मोटार मालकाच्या मित्राने ही लूट केल्याचा संशय आहे. मोटार मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर ही माहिती पुढे आली.

कोल्हापूर - गुजरीत मुंबईतील सराफाला लुटण्यासाठी वापरलेली मोटार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मोटारीवरील चालक आणि मोटार मालकाच्या मित्राने ही लूट केल्याचा संशय आहे. मोटार मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर ही माहिती पुढे आली. चालक आणि मोटार मालकाचा दोस्त दोघेही पसार झाले आहेत. त्यांच्या तपासासाठी पोलिसांची पथके रायगड, पुणे ग्रामीण, शिर्डी, जळगाव, मुंबई आदी ठिकाणी रवाना झाल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

गुजरीत मुंबईतील सराफाची लूट करणारे मुंबई-पुण्यातील असल्याची माहिती प्रथमदर्शनी मिळाली आहे. २५ जानेवारीला पुण्यातून मोटार खरेदी केली असून, त्याचा मालक मुंबईतील असल्याची माहिती मिळाली. मालकाने मोटार घेतल्यानंतर मित्रानेच मोटारीवर चालक ठेवण्याची सूचना केली होती. एवढेच नव्हे तर संबंधित चालकही त्यानेच पाठविला होता. त्याच चालकाने आणि मित्राने ही लूट केल्याची माहिती पुढे येत आहे.

मोटार मालकाला पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. जेथे लूट झाली, त्या गुजरीतील स्थानिकांकडून पोलिस माहिती घेत आहेत. यात कोल्हापुरातील कोणी सहभागी आहे काय याची माहिती पोलिसांनी घेतली असून, ही टीप मुंबईतून मिळाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सराफाने कमी केलेल्या कामगाराने ही टीप दिल्याचा प्राथमिक संशय होता; मात्र असे काहीच तपासात आढळले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

नवी कोरी मोटार चोरीसाठी...
देवदर्शनासाठी नवीन मोटार मित्राने थेट शिर्डीला नेली. तेथून त्यांनी चालकासह लुटीचा प्लॅन केला. त्यानंतर ही मोटार थेट मुंबईतील सराफाला लुटण्यासाठी कोल्हापुरात वापरल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. नवीन गाडी देवाला घेऊन जातो म्हणून सांगून ती लुटीसाठी वापरल्याने मूळ मालकानेही आश्‍चर्य व्यक्त केले आहे. 

मोटारचालकाने ही लूट केल्याची माहिती चौकशीतून पुढे आली आहे. मालकाचा मित्र आणि चालक हेच सूत्रधार असण्याची शक्‍यता आहे. सध्या ते गायब आहेत. त्यांच्या शोधासाठी पथके रायगड, मुंबई, पुणे ग्रामीणसह इतर जिल्ह्यांत रवाना झाली आहेत. तपास योग्य दिशेने सुरू आहे.
- संजय मोहिते,
जिल्हा पोलिस अधीक्षक

चालकच मुख्य सूत्रधार
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चारपैकी एक व्यक्ती पट्ट्यांचा शर्ट घातलेली आहे. तीच व्यक्ती मोटारीचा चालक आहे. त्यानेच ही लूट केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्याला सहकार्य करणारा मोटारमालकाचा मित्रही सीसीटीव्हीमध्ये दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचा शोध सुरू आहे.
 

Web Title: Kolhapur News robbery of Gold near Mahalaxmi temple