एकट्याला हेरून लुटारूंना मिळते ‘सुवर्णसंधी’

सुधाकर काशीद
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

कॅरियर म्हणजे लाखो रुपयांच्या सोन्या-चांदीच्या ऐवजाची किंवा त्या व्यवहारातील पैशांची ने-आण करणारी मंडळी. या माणसाकडे वरवर बघितले की, यांच्या खिशात चारपाचशे रुपये तरी असतील की नाही अशी शंका येते. पण अक्षरशः एक नव्हे, दोन नव्हे, ३० ते ४० लाखांचा ऐवज वाहून नेण्याचे एक जोखमीचे ‘कसब’ त्यांच्याकडे असते.

कोल्हापूर - ही माणसं दिसायला अगदी साधी. हातात किंवा खांद्याजवळ अडकवलेली एक पिशवी. चेहरा निर्विकार. लक्‍झरीतून उतरून सराफ बाजारात आली की मात्र त्यांची लगबग सुरू. ठरलेल्या सराफी दुकानात जायचं. मालकाबरोबर इकडचं-तिकडचं बोलायचं. आणि बोलत-बोलतच जवळच्या पिशवीतनं पार्सल बाहेर काढायचं. पार्सल खोलायचं. त्यात चक्के सोन्याचे नवे कोरे लखलखते अलंकार. एक पार्सल साधारण ३० ते ३५ लाख रुपये किमतीचं.

पार्सलबरोबर दागिन्यांची पावती किंवा हिशेब दाखविणारी एक साधी चिठ्ठी. पिशवीत अशीच आणखी लहान-मोठी चार-पाच पार्सल. ती अशीच संबंधितांना पोचवायची आणि पुन्हा रात्री किंवा दुसऱ्या दिवशी इतर हिशेब करून पुन्हा लक्‍झरी पकडायची... ही साधी माणसं म्हणजे कॅरियर. कॅरियर म्हणजे लाखो रुपयांच्या सोन्या-चांदीच्या ऐवजाची किंवा त्या व्यवहारातील पैशांची ने-आण करणारी मंडळी. या माणसाकडे वरवर बघितले की, यांच्या खिशात चारपाचशे रुपये तरी असतील की नाही अशी शंका येते. पण अक्षरशः एक नव्हे, दोन नव्हे, ३० ते ४० लाखांचा ऐवज वाहून नेण्याचे एक जोखमीचे ‘कसब’ त्यांच्याकडे असते.

गुजरीत अशीच जोखीम पत्करणाऱ्या कांतिलालवर हल्ला झाला. त्याला पुरता लुटला; पण हा प्रकार सराफ बाजारात तसा फार नवा नाही किंवा त्यात अनेकांना आश्‍चर्य वाटत नाही. कारण सोन्या-चांदीचे दागिने, पैशाची वाहतूक हेच काम करणाऱ्या या कॅरियरच्या वाट्याला असा प्रसंग येणार नाही, असे कोणीच म्हणू शकत नाही किंवा ही जोखीम अंगावर घेतल्याशिवाय या कॅरियरच्या व्यवसायात कोणी उतरत नाही. काही ठिकाणी मालक मंडळी किंवा त्यांच्या कुटुंबातील एखादी व्यक्तीही हे काम करते. 

कोल्हापूर, मुंबई, राजकोट, सेलम, बंगळूर, दिल्ली, अहमदाबाद या सराफ बाजारातील मोठ्या बाजारपेठा मानल्या जातात. मुंबईत सोन्याचे अलंकार मोठ्या प्रमाणात तयार होतात. त्यात व्हरायटीही असते. त्यामुळे अनेक व्यापारी हे अलंकार मागवतात. कुरियरने असे अलंकार पाठवतात येतात. पण कुरियल पार्सल नेणाऱ्या बस लुटण्याचे प्रकार घडले. त्यात मोठ्या प्रमाणावर लूट झाली. याबरोबरच हे अलंकार नेण्याचे, आणण्याचे काम कॅरियरकडे दिले जाते. त्याला प्रत्येक फेरीसाठी काही पैसे ठरलेले असतात. किंवा काही वेळा मालक मंडळीही स्वतः किंवा कुटुंबीय हे काम करतात. 

पिशवीत, बॅगेत किंबहुना चोरट्यांना या माणसाकडे किमती दागिने किंवा ऐवज आहे हे कळू नये, अशा साध्या पद्धतीने हे प्रवास करतात. यात विश्‍वासाचा मोठा भाग असतो. कारण एका माणसाच्या पिशवीत लाखो रुपयांचा ऐवज विश्‍वासाने दिलेला असतो. पण काही वेळा या व्यवहाराची टीप कोणीतरी कोणाला देतो व उदाहरणार्थ मुंबईतून ४० ते ५० लाख रुपयांचे दागिने एकटा माणूस कोल्हापूरला घेऊन जात असल्याची टीप मिळाली की, लुटारूंनी संधी साधण्याचा मोका मिळतो. त्यातून यापूर्वीही अशा लुटीच्या घटना घडल्या आहेत. टीप देणारी मंडळी ही या कॅरियरच्या व्यवसायात मोठा धोका आहेत. काही वेळा काही बेकायदेशीर खरेदी-विक्री असेल तर लुटीच्या घटनेनंतरही ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ असे म्हणायची वेळ आली आहे. 

त्यामुळे सोन्या-चांदीची ही व्यक्तीमार्फत होणारी वाहतूक खूप जोखमीची किंवा जीवघेण्या जोखमीची आहेत. कोल्हापुरात रोज या मार्गाने अलंकार येतात आणि बाहेर जातात. यापूर्वीही अशा लुटीच्या घटना कोल्हापुरात घडल्या. एकूण परिस्थिती पाहता गुन्हेगारी क्षेत्र किंवा झटपट पैसा मिळवण्याची हाव वाढली. त्यामुळे अशा व्यवहारातील जोखीम वाढली आहे. त्यातून फार मोठा अनर्थ घडण्यापूर्वीच काही तरी सुरक्षित मार्ग काढणे आवश्‍यक आहे. प्रॅक्‍टिकली हे अवघड आहे; पण अशी सोन्या-चांदीच्या अलंकाराची एकट्या-दुकट्याकडून केली जाणारी वाहतूक ही गुन्हेगारांच्या दृष्टीने सुवर्णसंधीच आहे. 

विशिष्ट जॅकेट कॅरियर महत्त्वाचे
अलीकडे पिशवीशिवाय एक विशिष्ट जॅकेट कॅरियर वापरतात. त्या जॅकेटला भरपूर खिसे असतात. हे जॅकेट आत व त्यावर शर्ट घालून सोन्याची बिस्किटे किंवा अलंकाराची ने-आण करतात. अर्थात हा व्यवसायाचा एक अतिशय जोखमीचा भाग आहे. एखाद्याच्या जीवावर बेतू शकेल इतकी वाईट ही जोखीम आहे. त्यामुळे असे व्यवहार करणारे आपल्या दौऱ्याबद्दल खूप गुप्तता बाळगतात. त्याशिवाय त्यांना इलाजही नसतो; पण कधीतरी कोणाकडून तरी कोणाला टीप जाते व लुटीची घटना घडते.

Web Title: Kolhapur News Robbery of Gold special story