उचगावात वृद्धेला डांबून नऊ लाख लुबाडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

गांधीनगर - घरात एकट्या असलेल्या वृद्धेला मारहाण करून रोकड, सोन्याचे दागिने असा एकूण नऊ लाख ४६ हजारांचा ऐवज चोरट्याने लुटला. उचगाव (ता. करवीर) येथील शिंदे कॉलनीत हा दरोडा पडला. चोरट्याने केलेल्या मारहाणीत श्रीमती लालूबाई भगवान पवार (वय ८०) जखमी झाल्या आहेत.

गांधीनगर - घरात एकट्या असलेल्या वृद्धेला मारहाण करून रोकड, सोन्याचे दागिने असा एकूण नऊ लाख ४६ हजारांचा ऐवज चोरट्याने लुटला. उचगाव (ता. करवीर) येथील शिंदे कॉलनीत हा दरोडा पडला. चोरट्याने केलेल्या मारहाणीत श्रीमती लालूबाई भगवान पवार (वय ८०) जखमी झाल्या आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नामदेव भगवान पवार उचगाव येथील शिंदे कॉलनीमध्ये साईराम हॉस्पिटलच्या मागे आई, दोन पत्नी आणि चार मुलांसह राहतात. त्यांची वीटभट्टी आहे. ते शनिवारी (ता. ९) नेहमीप्रमाणे पत्नी आणि मुलांसह वीटभट्टीवर गेले. दरम्यान, दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास तोंडाला कापड बांधून घरात घुसलेल्या अनोळखी तरुणाने लालूबाई यांना चाकूचा धाक दाखविला. त्यांच्या तोंडात बोळा कोंबून त्यांचे हात-पाय बांधले. त्यानंतर कपाटातील आणि बेडच्या कप्प्यातील दागिन्यांची पेटी आणि रोकड चोरून नेली. यामध्ये १२० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण नऊ लाख ४६ हजार १०० रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला.

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पवार घरी आले असता चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी आईला दवाखान्यात नेले आणि पोलिसांना याची माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी घटनास्थळाची पाहणी केली. श्‍वान घटनास्थळावरून महामार्गापर्यंत गेले व तेथे घुटमळले. ठसेतज्ज्ञांनाही बोलावण्यात आले; परंतु ठसेतज्ज्ञांना कोणतेही ठसे मिळाले नाहीत. दरम्यान, घटनास्थळी करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज गुरव यांनीही भेट देऊन पाहणी केली. याबाबत नामदेव पवार यांनी फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण तपास करीत आहेत.
 

Web Title: Kolhapur News robbery incidence in Unchagaon