कोल्हापूरात गुळ व्यापाऱ्याचे पावणे दोनलाख रुपये पळविले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

कोल्हापूर - लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या पाठीमागील वारणा बॅंकेसमोर गूळ व्यापाऱ्याची १ लाख ८६ हजार रुपये असलेली बॅग चोरट्याने पळविली. मोटारसायकलच्या हॅंडलला लावलेली बॅग अल्पवयीन मुलाने पळविल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून येते

कोल्हापूर - लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या पाठीमागील वारणा बॅंकेसमोर गूळ व्यापाऱ्याची १ लाख ८६ हजार रुपये असलेली बॅग चोरट्याने पळविली. मोटारसायकलच्या हॅंडलला लावलेली बॅग अल्पवयीन मुलाने पळविल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून येते. गूळ व्यापारी संदीप शिवगोंडा सदलगे (वय ३४, रा. डफळे कॉलनी, उचगाव) यांनी याबाबतची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लक्ष्मीपुरीतील वारणा बॅंकेसमोर सदलगे यांचे धनवंती ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास त्यांनी दुकान बंद केले. तेव्हा सोबत पत्नी आणि मुलगी होती. या वेळी दुकानात जमलेले सुमारे १ लाख ८६ हजार रुपये सदलगे यांनी छोट्या पिशवीत ठेवले. तीच बॅग मोटारसायकलला अडकवली. तेथे ते पत्नी व मुलीसोबत चर्चा करत उभे होते. मुलीने शेजारच्या दुकानात जाण्याची मागणी केली. त्यामुळे सदलगे मुलीसोबत दुकानात गेले. पाठोपाठ पत्नीही त्यांच्यासोबत दुकानात गेली. नेमकी हीच संधी साधून चोरटा बॅग घेऊन पळून गेला. पळून जाणाऱ्या मुलाला सदलगे यांनी पाहिले. त्यांनी तातडीने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात जाऊन याची माहिती दिली. पोलिसांनी चोरट्यास पकडण्यासाठी नाकाबंदी करून प्रयत्न केले; मात्र त्यात अपयश आले. पोलिसांनी सीसीटीव्ही पाहिले असता संशयित चोरटा अल्पवयीन असण्याची शक्‍यता दिसून आली.

तपास सुरू आहे...
काही दिवसांपूर्वी रिलायन्स मॉलजवळून सुमारे सात लाख रुपये असलेली बॅग चोरीस गेली आहे. त्याचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना मिळाले आहे; मात्र अद्याप केवळ तपास सुरू आहे एवढेच सांगितले जाते. आर. के. नगर परिसरात महिलेची दागिन्यांची बॅग मोपेडमधून पळविण्यात आली; मात्र अद्याप चोरटे पकडले गेले नाहीत. त्यामुळे सेफ सिटीसाठी म्हणून बसविलेल्या कॅमेऱ्यात चोरटे कैद होऊनही तपासात मात्र काहीच प्रगती दिसून येत नाही.

Web Title: Kolhapur News Robbery in LaxmiPuri