सराईत चोरट्याकडून चांदीच्या वस्तू जप्त

सराईत चोरट्याकडून चांदीच्या वस्तू जप्त

कोल्हापूर - तीन महिने टप्प्याटप्प्याने चोरी करून उद्योजकाच्या घरातील चांदीचे दागिने, उंची किमतीचे घड्याळ लंपास करणाऱ्या चोरट्यास आज शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. नागेश बसवराज गोविंदे (वय २४, रा. वळसंग, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे ४० हजारांच्या आय वॉचसह चांदीचे दागिने असे सुमारे चार किलो ६०० ग्रॅम वजनाच्या वस्तू पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केल्या आहेत.

ताराबाई पार्क येथील उद्योजक विजय आप्पासाहेब भोसले यांनी चोरीची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन नसतानाही केवळ पारंपरिक पद्धतीने तपास करून चार दिवसांत चोरी उघडकीस आणल्याची माहिती शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या वेळी शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्यासह डी. बी. शाखेचे पोलिस उपस्थित होते.

घड्याळामुळे संशय 
उंची किमतीच्या चोरलेल्या घड्याळाची कॉड घेण्यासाठी नागेश पुन्हा गेल्यानंतर पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्यांनी माहिती घेऊन त्याला ताब्यात घेतले. तेव्हा डिजिटल लॉक उघडून तो फ्लॅटमध्ये तीन महिन्यांत एक-एक वस्तू चोरत असल्याची कबुली त्याने दिल्याचे निरीक्षक मोरे यांनी सांगितले. तसेच गांजा आणि दारूच्या व्यसनात तो पैसे उडवत असल्याचेही सांगण्यात आले.

विजय भोसले आकाशवाणी केंद्रासमोरील गार्डन होम्स्‌ २ मध्ये मुलगी, नातू यांच्यासह राहतात. २८ मार्चला सायंकाळी सात ते रात्री सव्वाआठदरम्यान ते बाहेर गेले होते. त्या वेळी घरी चोरी झाली. चांदीच्या वस्तू, साड्या, उंची किमतीचे घड्याळ चोरीस गेल्याची फिर्याद त्यांनी दिली होती. पोलिसांनी त्यांच्या घरी कोण कोण येते याची माहिती घेतली, तेव्हा जिल्हा परिषदेच्या एका माजी बांधकाम समिती सभापतींच्या घरी गेली काही वर्षे नोकरी करणाऱ्या नागेशवर पोलिसांना संशय आला.

अपार्टमेंटमधील सभासद, चालक, नोकर यांच्याकडे चौकशी केली तेव्हा नागेशवर संशय बळावला. तोच त्यांच्या घरी वारंवार येत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे पोलिसांनी त्याला बी. टी. कॉलेजसमोरून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

तीन महिन्यांत घरात जाऊन एक-एक चांदीची वस्तू चोरत असल्याची कबुलीही त्याने दिली. सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार, सहायक फौजदार संदीप जाधव, हेड कॉन्स्टेबल दिवाकर होवाळे, बजरंग हेब्बाळकर, नीलेश साळुंखे, राजेश बरगाले, प्रशांत घोलप, सागर डोंगरे, विशाल चौगुले, दिगंबर पाटील, विजय इंगळे यांनी तपास केला.

चांदीच्या मूर्ती पॉलिशला
नागेशने चांदीच्या मूर्ती, ताट, वाटी, तांब्या लांबविला होता. त्यानंतर कोल्हापुरातील एक आटणीवाल्याकडे ते पॉलिशला दिले होते. पोलिसांनी नागेशला अटक केल्यावर आटणीवाल्याकडून मुद्देमाल जप्त  केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com