‘रॉकेट इंजिनिअरिंग’चा इंजिनच्या बाजारपेठेत दबदबा

अभिजित कुलकर्णी
गुरुवार, 17 मे 2018

नागाव - डिझेल इंजिनच्या दुरुस्तीने कोल्हापुरात उद्योग सुरू झाला. त्यातूनच इंजिनची निर्मिती आणि विक्री सुरू झाली. १९६० च्या दशकात कोल्हापूरचे उद्यमनगर डिझेल इंजिनमुळे देशात नावारूपाला आले. त्यानंतर कोल्हापूरच्या औद्योगिक विकासाला चालना मिळाली. नंतरच्या काळात हा उद्योग साखर आणि वाहन उद्योगाकडे वळला, पण गेली अठ्ठावन्न वर्षे डिझेल इंजिनच्या निर्मितीमध्ये अविरत कार्यरत असणाऱ्या ‘रॉकेट इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन’ चा भारतीय बाजारपेठेत दबदबा आहे. 

एकत्रित कुटुंब व्यवस्थेमधील वसा हे एक आदर्श उदाहरण म्हणून औद्योगिक क्षेत्रात ओळखले जाते. या कुटुंबातील तिसरी पिढी आज या उद्योगामध्ये कार्यरत झाली आहे. डिझेल इंजिनबरोबरच बदलत्या काळानुसार सबमर्शिबल पंप, चॉपकटर, रसवंती आणि कमी वजनाची इंजिन आदी उत्पादने विकसित करत रॉकेट इंजिनिअरिंगची औद्योगिक क्षेत्रातील वाटचाल सुरू आहे. 

ऑगस्ट १९६० मध्ये (कै.) हेमुभाई शहा ऊर्फ वसा यांनी उद्यमनगर येथे कंपनीची स्थापना केली. त्यांच्या कुशल मार्गदर्शनाने त्यांचे बंधू बाबाभाई, हसमुखभाई व सुभाषभाई यांनी कंपनीच्या प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत ठेवला. ‘कॉमेट’ या नावाने भारतीय बाजारपेठेत स्वतःचा ब्रॅण्ड आणला. त्याचबरोबर उषा इंटरनॅशनल, बाटलीबॉय आणि थर्मेक्‍स या नामांकित कंपन्यांना पुरवठाही केला जातो.

वार्षिक एक लाख इंजिनची निर्मिती क्षमता असणाऱ्या रॉकेट इंजिनिअरिंगमध्ये इंजिनच्या दीर्घकालीन वापरात महत्त्वाचे घटक असणाऱ्या सिलिंडर हेड, कॅमशाफ्ट, क्रॅन्कशाफ्ट, कनेक्‍टिंग रॉड आदी पार्टस्‌ची निर्मिती स्पेशल परपज मशीनवर केली जाते. 

दुसऱ्या पिढीतील जयराज, जोगेश, किरण व पारस वसा यांनी कंपनीच्या उत्पादनाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून दिला. उत्पादित इंजिनाला दोनशेहून अधिक वितरक आणि दहा टक्के निर्यात केली जाते. भव्यराज आणि दीप वसा यांच्या माध्यमातून तिसरी पिढी कंपनीत कार्यरत आहे.

गुणवत्ता, सेवेमुळे ब्रॅण्डला पसंती
कंपनीने फाऊंड्री आणि मशीन शॉपमध्ये पन्नास कोटींहून अधिक गुंतवणूक केली आहे. कंपनीची वार्षिक उलाढाल शंभर कोटी रुपयांची आहे. एक हजार कुटुंबे कंपनीवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अवलंबून आहेत. गुणवत्ता पूर्ण उत्पादने, माफक दर, विक्री पश्‍चात विनम्र सेवा आणि विश्‍वासार्हता यामुळेच रॉकेट इंजिनचा कॉमेट हा ब्रॅण्ड शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.

Web Title: Kolhapur News Rocket Engg. success story