अश्‍वारोहणाच्या थरारक कसरतींनी फिटले पारणे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 मार्च 2018

कोल्हापूर - अश्‍वांची डौलदार चाल, विशिष्ट टप्प्यावर घेतलेली झेप आणि जॉकीने दिलेल्या इशाऱ्यानुसार वळणारे आणि धावणारे अश्‍व, अशा अश्‍वारोहणाच्या विविध थरारक कसरतींनी आज पोलो मैदानावर शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

कोल्हापूर - अश्‍वांची डौलदार चाल, विशिष्ट टप्प्यावर घेतलेली झेप आणि जॉकीने दिलेल्या इशाऱ्यानुसार वळणारे आणि धावणारे अश्‍व, अशा अश्‍वारोहणाच्या विविध थरारक कसरतींनी आज पोलो मैदानावर शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

एकाहून एक सरस अशा तंदुरुस्त अश्‍वांनी घेतलेली थरारक धाव व क्षणात घेतलेली उंच झेप, त्यांना सावरण्यासाठी जॉकीने खेचलेला लगाम, असे अश्‍वारोहणाचे विविध क्रीडापैलू दीर्घकाळानंतर येथील शौकिनांना पाहता आले. त्यामुळे काही ठराविक अश्‍वांच्या कसरतींना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद देत या नव्या खेळाविषयीची उत्सुकता अधिक दृढ केली. 

कोल्हापूर इक्वेस्टेरियम असोसिएशनतर्फे ‘रॉयल कोल्हापूर हॉर्स शो’ कालपासून पोलो मैदानावर सुरू झाला. यात आज दुसऱ्या दिवशी अश्‍वारोहणाची विविध पैलूंची प्रात्यक्षिके व स्पर्धा झाली. यात बालगटापासून ते व्यावसायिक जॉकींच्या गटापर्यंत जवळपास ४० हून अधिक अश्‍वारोहकांनी सहभाग नोंदवला. त्याच्या वेगवेगळ्या प्रकारांनुसार फेऱ्या झाल्या. यात अश्‍वाची तंदुरुस्ती, जॉकीचा ड्रेसकोड, त्यांनी दिलेल्या आज्ञांचे पालन करणारे अश्‍व, शो जंपिंग, जिलेबी रेस, टेंट पेगिंग, ट्रॉटिंग रेस, बॉल ॲन्ड बकेट, हॅक्‍स, हॅट रेस आदी प्रकार सादर झाले. हजारो क्रीडाशौकिनांच्या गर्दीने मैदान फुलून गेले.

या वेळी जॉकी गणेश खाडे, भीमराव जाधव व शशिकांत कसबेकर-जाधव यांचा सत्कार झाला. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके दिली. या वेळी याज्ञसेनी छत्रपती महाराणी, संयोगिताराजे छत्रपती, मधुरिमाराजे, यौवराज शहाजीराजे, यशराजे, असोसिएशनचे अध्यक्ष वीरेंद्रसिंह घाटगे, उपाध्यक्ष प्रशांत सुर्वे, सचिव अच्युत करांडे, सोनल करांडे, प्रशिक पाटेकर, शोहब शेख, रसिका जनवाडकर, फत्तेसिंह सावंत, बंटी सावंत आदी उपस्थित होते. 

विविध प्रात्यक्षिके अशी :
* शो जंपिंगमध्ये ः जॉकीच्या इशाऱ्यानुसार धावत येणारे अश्‍व उंच लावलेल्या बांबूला धक्का न लावता अंतर पार करतात. अशा अश्‍वावर जॉकी नियंत्रण ठेवण्याचे कसब दाखवतो.

*टॉर्ट रेस ः यामध्ये अश्‍वाच्या चारही पायांची चाल कशी डौलदार आणि शिस्तबद्ध असते याचे परीक्षण केले जाते.

*कॅटेगरी हॅक्‍स ः अश्‍वांची ठेवण, जॉकीचा ड्रेसकोड, बैठक व्यवस्था, त्याने वापरलेले साहित्य आदींचा समावेश असतो.

*जिलेबी रेस ः १०० मीटर अंतरावर एका दोरीला जिलेबी बांधलेली असते. तेथे अश्‍व धावत जातात. त्यावरील जॉकी तोंडाने ती जिलेबी घेते आणि पुन्हा माघारी येते. सर्वात कमी वेळ घेणाऱ्या अश्‍वाला या स्पर्धेत विजेते घोषित केले जाते.

*हॅट रेस ः पोलपर्यंत जाऊन त्यावर अश्‍वावरील जॉकी जाऊन हॅट (टोपी) ठेवतो. कमी वेळेत ही किमया करणाऱ्या जॉकीला विजयी घोषित केले जाते.

* टेंट पेगिंग ः अत्यंत जलदगतीने अश्‍व धावतात. त्यावरील जॉकी भाल्याने जमिनीवर टाकलेले कागदाचे चौकोन उचलतात. चौकोनाला स्पर्श केला तर दोन, तो उचलला; पण निसटून खाली पडला तर ४ आणि तो कागदाचा चौकोन यशस्वीरित्या उचलणाऱ्या जॉकीस सहा गुण मिळतात, अशी माहिती जॉकी सागर जाधव, गणेश खाडे यांनी दिली. 

स्पर्धेतील अनुक्रमे विजेते :
*ट्रॉटिंग रेस ः चिल्ड्रन - विधी सावंत (संजय घोडावत स्कूल), रितेश जाधव (एआयएसएसएमएस), चेतन मेंडिगिरी (घोडावत, स्कूल).
*बॉल ॲन्ड बकेट ः माधव लांबोरे (गुरुकुलम), पृथ्वीराज कोंडेकर (सायरस पुनावाला), प्रथमेश पॉल (एआयएसएसएमएस).
*शो जंपिंग नॉर्मल खुला गट ः के. व्ही. सिंग (जॅपलूप), कईस दलाल (जॅपलूप), स्वप्नील साने (ए. के. स्पोर्टस्‌).
*जिलेबी रेस ः रितेश जाधव (एआयएसएसएमएस), प्रथमेश पॉल (एआयएसएसएमएस), हर्षवर्धन मुळे (ग्रिनफिंगर्स).
*शो जंपिंग चॅलेंज ः निहारिका मणियार (जॅपलूप), अनिरुद्ध मोहिरे (ए. के. स्पोर्टस्‌), करिश्‍मा जोशी (जॅपलूप).
*शो जंपिंग नॉर्मल चिल्ड्रन ः वंश जोगनी (जॅपलूप), रोहन करमरकर (जॅपलूप), सिद्धराज शिंदे (ग्रीन फिंगर्स).
*शो जंपिंग फॉल्ट ॲन्ड आऊट ः शौनक दांडेकर (जॅपलूप), शौनक दांडेकर (जॅपलूक), निहारिका मणियार (जॅपलूप).
*हॅक्‍स ज्युनिअर ः सिद्धराज शिंदे (ग्रीन फिंगर्स), अमर खराडे (ग्रीन फिंगर्स), करिश्‍मा जोशी (जॅपलूप). 
*हॅक्‍स चिल्ड्रन ः रोहन करमरकर (जॅपलूप), सिद्धराज शिंदे (ग्रीन फिंगर्स), मैथिली देशमुख (जॅपलूप).
*हॅट रेस ज्युनिअर ः अजिम शेख (वैयक्तिक), विनायक करनावर (ग्रीन फिंगर्स), सनी सोनार (आर्या इक्वेस्टेरियम स्टुडिओ)
*हॅट रेस चिल्ड्रन ः संस्कार मोरे (आर्या इक्वेस्टेरियम स्टुडिओ), रितेश जाधव (एआयएसएसएमएस), प्रथमेश पॉल (एआयएसएसएमएस)
*टेंट पेगिंग ः विनायक करनावर (ग्रीन फिंगर्स), प्रथमेश पॉल (एआयएसएसएमएस), अमर खराडे (ग्रीन फिंगर्स).

Web Title: Kolhapur News Royal Kolhapur Horse show