#SaathChal मायलेकरांची सत्ताविसावी वारी !

संभाजी गंडमाळे
गुरुवार, 19 जुलै 2018

माझ्याबरोबर आता माझे काही मित्रही प्रत्येक वर्षी वारीत सहभागी होत असून, ते ही आपल्या आई-वडिलांना वारी घडवून आणत आहेत.  प्रोफेशनल रिदम आर्टिस्ट असणारा स्वानंद जाधव त्याच्या आनंदवारी विषयी सांगत होता. 

कोल्हापूर - गेल्या सात-आठ वर्षांपासून वारीला येणाऱ्यांत टीन एजर्सचे प्रमाण वाढले आहे. मी तर वयाच्या सातव्या वर्षांपासून आईबरोबर वारी करतो आहे. आईची यंदा अठ्ठावीसावी तर माझी सत्तावीसावी वारी. 

माझ्याबरोबर आता माझे काही मित्रही प्रत्येक वर्षी वारीत सहभागी होत असून, ते ही आपल्या आई-वडिलांना वारी घडवून आणत आहेत.  प्रोफेशनल रिदम आर्टिस्ट असणारा स्वानंद जाधव त्याच्या आनंदवारी विषयी सांगत होता. 

यंदाही तो आई सुधा यांच्या बरोबर वारीत सहभागी असून त्याच्याबरोबर त्याचे पाच ते सहा मित्रही वारीत आहेत. कॉम्प्युटर सेल्स आणि सर्व्हिसेसचे काम करणारा अक्षय नाझरे त्याची आई सुरेखा यांच्यासह वारीला आला आहे. त्यांची यंदाची नववी वारी असल्याचेही स्वानंद सांगतो.  

जाधव यांच्या घरीच वारीची परंपरा आहे. साहजिकच लहानपणापासून त्याला वारीची आणि भजनाची गोडी लागली. पुढे त्याची हिच आवड करिअर बनली आणि तो रिदम आर्टिस्ट म्हणून नावारूपाला आला. शहरातील बहुतांश सर्व वाद्यवृंदाशी तो संबंधित आहे आणि या वाद्यवृंदात तरुणांची संख्या अधिक आहे. साहजिकच त्याच्या वारीची तयारी जेव्हा सुरू होते. तेंव्हा इतर मित्रही त्याच्याबरोबर वारीत सहभागासाठी पुढे येतात. 

स्वानंद सांगतो, ‘‘पंढरपूरचा विठ्ठल ‘कानडा’ आहे आणि म्हणूनच तो अनाकलनीय आहे, मात्र त्याचं स्वरूप लहानपणापासून समजू लागलं. कारण कळत्या वयापासूनच मी वारीत सहभागी होऊ लागलो. एकदा वारी सुरू केली आणि पुढे एकही वर्ष ती कधीच चुकवली नाही. आमची पुढची पिढीही नक्कीच ही परंपरा पुढे सुरू ठेवेल, यात कुठलीही शंका नाही.’’

आई-वडिलांना सांभाळण्याबाबतचे कायदे करावे लागतात, हे सध्याचे वास्तव आहे. ज्यांच्यासाठी हे कायदे करावे लागले, त्यांनी एकदा तरी वारी अनुभवावी म्हणजे नक्कीच त्यांचे विचार बदलतील.
- स्वानंद जाधव

Web Title: Kolhapur News #SaathChal Palkhi Wari Pandharpur

टॅग्स