‘स्वाभिमानी’तील नाराजांवर सदाभाऊंचे लक्ष

विकास कांबळे
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

खासदार शेट्टींसमोर आव्हान - कमळाचीही पडद्याआडून साथ शक्‍य

खासदार शेट्टींसमोर आव्हान - कमळाचीही पडद्याआडून साथ शक्‍य

कोल्हापूर - स्वाभिमानीतून हकालपट्टी झाल्यानंतर राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना आपले अस्तित्व टिकविण्यासाठी स्वत:चाच झेंडा घेऊन पुन्हा मैदानात उतरावे लागणार आहे. त्याशिवाय त्यांना पर्यायदेखील नाही. त्यामुळे त्यांनी नवीन संघटना स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी गेल्या काही वर्षांपासून संघटनेपासून दुरावलेल्या आणि संघटनेत राहूनही खासदार राजू शेट्टींवर नाराज असलेल्यांवर सदाभाऊ लक्ष ठेवून आहेत. त्यांच्याशी सदाभाऊंनी संपर्क साधण्यास सुरवात केली असून त्याला ‘कमळा’बाईचीही चांगली साथ असल्याचे बोलले जात आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील राजू शेट्टी आणि सदाभाऊंची जोडी म्हणजे सर्जा-राज्याची जोडी असे शेतकरी म्हणत असत. दोघांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत संघटना वाढविण्यासाठी रक्‍ताचे पाणी केले. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकेचा भडिमार करत सरकारला बदनाम करण्याचे काम भाजपच्या नेत्यांबरोबर स्वाभिमानीने पश्‍चिम महाराष्ट्रात अधिक केले. शरद जोशी यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला म्हणून राजू शेट्टी यांनी जोशी यांच्या शेतकरी संघटनेला रामराम केला आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना ही नवीन संघटना स्थापन केली. त्या वेळी शरद जोशी यांना जातीयवादी ठरवून शेट्टी स्वत: पुरोगामी असल्याचे सिद्ध करण्यासाठी धडपडू लागले. या काळात सदाभाऊंची त्यांना मोठी साथ लाभली. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकीत खासदार शेट्टी आपण शरद जोशींपासून बाजूला होताना कोणते कारण पुढे केले होते, हे त्यांना आठवेना. खासदार शेट्टी यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फुटीची बिजे रोवली. राज्यातील दोन्ही काँग्रेसची सत्ता गेली. भाजप आघाडीची सत्ता आली. ठरल्याप्रमाणे सदाभाऊंना मंत्रिपद मिळाले.

या मंत्रिपदाचे सुख फार काळ त्यांना खासदार शेट्टी यांनी उपभोगू दिले नाही. सदाभाऊ खोत मंत्री झाल्यानंतर काही महिन्यांतच त्यांच्याबाबत तक्रारी सुरू झाल्या. यातूनच खासदार राजू शेट्टी व राज्यमंत्री खोत यांच्यात संघर्ष सुरू झाला. यांच्या संघर्षाची अनेक कारणे सांगितली जातात. सांगण्याची कारणे अनेक आहेत. मात्र, वादाचे खरे कारण सदाभाऊ आणि खासदार शेट्टी यांनाच माहीत. दोघांमधील दरी वाढत गेली आणि खासदार शेट्टी यांनी भाजपला पाठिंबा देण्याच्या निर्णयाची किंमत मोजावी लागली. सदाभाऊंसारख्या सहकाऱ्याला त्यांना मुकावे लागले. संघटनेतून त्यांना काढून टाकावे लागले. 

सदाभाऊ खोत देखील संघर्षातून तयार झालेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे स्वाभिमानीतून हकालपट्टी केल्यानंतर ते गप्प बसणे शक्‍य नाही. त्यांनी नवीन संघटना काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ‘कमळा’बाईची साथ त्यांना असणारच आहे. मंत्री खोत यांच्या कार्यपद्धतीवर जसे काही कार्यकर्ते नाराज आहेत तसेच काही कार्यकर्ते खासदार शेट्टी यांच्यावर देखील नाराज आहेत. मात्र, त्यांना पर्याय नव्हता. खासदार शेट्टी बरोबर राहून भलं होणार नसल्याचे ओळखून उल्हास पाटील यांच्यासारखा आक्रमक आणि विश्‍वासू कार्यकर्ता विधानसभा निवडणुकीत बाजूला गेला आणि आमदार होऊन दाखविले. खासदार शेट्टी यांच्या बालेकिल्ल्यात उल्हास पाटील यांनी शेट्टींना धोबीपछाड केले. या वेळी देखील खासदार शेट्टी यांच्या निर्णयाने अनेकजण नाराज होऊन उघडपणे उल्हास पाटील यांच्या बाजूने राहिले. असे अनेक कार्यकर्ते गेल्या पंधरा वर्षांत शेट्टी यांच्यापासून दुरावले आहेत. काही नाराजीने शांत आहेत. अशा सर्व कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याची मोहीम मंत्री खोत यांनी हाती घेतली आहे.

स्वातंत्र्य दिनापासून सुरवात 
स्वातंत्र्य दिनानिमित्त कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री खोत यांनी यातील काही कार्यकर्त्यांना बोलावून घेऊन चर्चा केली, तर काही कार्यकर्ते स्वत:हून जाऊन भेटले आहेत. सध्या तरी सत्तेत असल्याने सदाभाऊंकडे गर्दी दिसत आहे. ही गर्दी टिकविण्यात आणि वाढविण्यात सदाभाऊ कितपत यशस्वी होतात, हे येणारा काळच सांगेल.

Web Title: kolhapur news sadabhau attention on the anger of swabhimani