सदाभाऊंकडून शेट्टी बेदखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेली ३० वर्षे साखर कारखानदार, राजकीय पुढाऱ्यांना रांगड्या व गावरान भाषेत टीकेचे लक्ष्य केलेल्या व ‘स्वाभिमानी’तून हकालपट्टी केलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नव्या संघटनेच्या स्थापनेदिवशी ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांनाच बेदखल केले. भाषणात त्यांचा नामोल्लेख टाळत श्री. खोत यांनी त्यांना ऊस दराबाबत मात्र अप्रत्यक्षरीत्या आव्हान दिले. 

कोल्हापूर - शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेली ३० वर्षे साखर कारखानदार, राजकीय पुढाऱ्यांना रांगड्या व गावरान भाषेत टीकेचे लक्ष्य केलेल्या व ‘स्वाभिमानी’तून हकालपट्टी केलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नव्या संघटनेच्या स्थापनेदिवशी ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांनाच बेदखल केले. भाषणात त्यांचा नामोल्लेख टाळत श्री. खोत यांनी त्यांना ऊस दराबाबत मात्र अप्रत्यक्षरीत्या आव्हान दिले. 

श्री. खोत यांनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे आपल्या रयत क्रांती संघटनेची घोषणा केली. संघटनेच्या ध्वजाबरोबरच लोगोचेही अनावरण झाले. झालेल्या मेळाव्यात श्री. शेट्टी हेच त्यांचे लक्ष्य असेल, अशी शक्‍यता होती; पण इतर वक्‍त्यांनी श्री. शेट्टी यांच्यावर खरपूस टीका केली; मात्र श्री. खोत यांनी त्यांना बेदखल करत त्यांचा नामोल्लेखही टाळला. 

श्री. खोत यांनीच त्यांचे नाव न घेता यावर्षी दुसरे कोण नाही, तर मीच उसाचा दर ठरवणार, अशी घोषणा केली. इचलकरंजीत होणाऱ्या दसरा मेळाव्यात तो निश्‍चित सांगितला जाईल आणि हाच अंतिम दर असेल, हे सांगून श्री. खोत यांनी एकप्रकारे श्री. शेट्टी यांनाच आव्हान दिले. 

वर्षभराच्या मंत्रिपदाच्या काळात आपल्यावर टीका झाली, संपवण्याचा प्रयत्न झाला, प्रतिमा मलिन करण्याचे प्रकार झाले; पण आपण घाबरलो नाही, असे सांगत श्री. खोत यांनी त्यांच्यावर टीका करण्याचा समाचार घेतला. श्री. खोत यांनी ३६ मिनिटांच्या भाषणात शेट्टी किंवा त्यांच्या संघटनेतील कोणाचेही नाव घेतले नाही. 
घरावर तुळशीपत्र ठेवून संघटनेसाठी काम करूनही माझी चौकशी होत असेल, तर निश्‍चितच वाईट वाटले; पण माझ्या संघटनेत कोणाची चौकशी होणार नाही आणि कोणाची हकालपट्टीही होणार नसल्याचे सांगत श्री. खोत यांनी संघटनेचा मसुदाही जाहीर केला. 

अख्खे कुटुंब उपस्थित
मेळाव्याला बुलडाणा, अमरावती, पुणे, नगर, बीड, जालना येथून आलेल्या कार्यकर्त्यांचीही हजेरी श्री. खोत यांनी मेळाव्यात घेतली. या मेळाव्याला त्यांचे अख्खे कुटुंबही उपस्थित होते. त्यात त्यांच्या मातोश्री श्रीमती रत्नाबाई, पत्नी, दोन्ही मुले, सुना, भाचे व नातवंडे असा गोतावळाच व्यासपीठावर उपस्थित होता. 

शरद जोशी हेच गुरू
गेली ३० वर्षे श्री. खोत व शेट्टी एकत्र आहेत; पण श्री. खोत यांनी मात्र शरद जोशी हेच आपले गुरू असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘मी शरद जोशींना गुरू मानले, त्यांनी शेतीच अर्थशास्त्र समजावून सांगितले. शेतकऱ्यांना कसे लुटले जाते, हे सांगितले. गावगड्याच्या शेतकऱ्यांच्या पोरांना मी हेच पटवून सांगितले आणि तेही माझ्यावर जीव ओवाळून टाकायला तयार झाले. ही ताकद श्री. जोशी यांच्यामुळे निर्माण झाली.’’

Web Title: kolhapur news sadabhau khot ignores raju shetty