कोल्हापुराच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबध्द: सदाभाऊ खोत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

गेल्या तीन वर्षात देश आणि राज्याच्या प्रगतीसाठी केंद्र शासन आणि राज्य शासन हाताहात घालून अविरतपणे झटत आहेत. यशाची अनेक शिखरे आपण पदाक्रांत करत आहोत. अनेक नवीन मापदंड निर्माण करत आहोत. महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी करुन राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

कोल्हापूर : जिल्हा हा अनेक गुणवैशिष्ट्यांनी संपन्न जिल्हा आहे. या जिल्ह्यात शेतकरी खऱ्या अर्थानं सुखी संपन्न होऊ दे अशी भावना व्यक्त करुन कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 70 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास राज्याचे कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, जिल्हा परिषदेचे अध्यक्षा शौमिका महाडिक, महापौर हसिना फरास, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, पोलिस, गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी-विद्यार्थीनी तसेच शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांना कृषीराज्यमंत्री सदाशिव खोत तसेच जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी गुलाबपुष्प देवून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छ दिल्या.

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, गेल्या तीन वर्षात देश आणि राज्याच्या प्रगतीसाठी केंद्र शासन आणि राज्य शासन हाताहात घालून अविरतपणे झटत आहेत. यशाची अनेक शिखरे आपण पदाक्रांत करत आहोत. अनेक नवीन मापदंड निर्माण करत आहोत. महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी करुन राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असून हे शेतकरी नव्याने कर्ज मिळण्यास पात्र झाले आहेत. कर्जमाफीमुळे त्यांचा आनंद आणखी द्विगुणीत झाला आहे. शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढ करुन त्यांना अधिक सक्षम, सधन करण्यासाठी शासन अनेक नव नवीन योजना राबवत आहेत याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा.

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गत दोनवर्षात 52 कोटी रुपये खर्च करुन 1हजार 688 कामे करण्यात येत आहेत. आतापर्यंत यातून सुमारे 9 हजार टीसीएम पेक्षा जास्त पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे ही बाब कौतुकास्पद असून 7/12 संगणकीकरणाची मोहिमेत जिल्हा आघाडीवर असून 96 टक्के काम पूर्ण झाले आहे. महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून 3 लाख 69 हजार 52 दाखले वितरित करण्यात आले. तर जवळपास 240 किलोमीटर लांबीचे 216 अतिक्रमित पाणंद, शिवाररस्ते गेल्या वर्षभरात मोकळे केले आहेत. याचा ग्रामीण जनतेला मोठ्या प्रमाणावर लाभ मिळत आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात रस्ते सुधारणा, रुंदीकरण, नवीन रस्ते, पुलांच्या कामांना विशेष प्राधान्य दिले आहे. असे सांगून कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, गेल्या तीन वर्षात जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजनेमध्येही भरघोस निधी प्राप्त होत मोठ्या प्रमाणात कल्याणकारी  योजना राबविण्यात येत आहेत.

जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगून  दिनांक 29 व 30 ऑगस्ट रोजी महाअवयवदान अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये  सर्वांनी सहभागी व्हावे असे कृषीराज्यमंत्री खोत यांनी आवाहन केले.

शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेमधील राज्य गुणवत्ता यादीत गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात जिल्हा परिषद प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2017 मध्ये गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तन्वी संतोष शिवणे (प्रथम), पर्वणी चतुर्धन निळकंठ (द्वितीय), सौजन्या युवराज चव्हाण (द्वितीय) सृष्टी विद्यासागर होनमाने (तृतीय) यांचा सत्कार करण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शाळा परीक्षा 2017 यामध्ये गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वर्धन धनाजी माळी , नरेंद्र संजय दाभोळकर, श्वेता सदानंद बाळेकुंद्री, प्रथमेश राजीव जरग, प्रथमेश मलकारे आरगे, पार्थ कृष्णात पाटील, केतन कृष्णात संकपाळ, आर्षद मुबारक नाकाडे, आर्या राजाराम तळप, समृध्दी मनोज कुलकर्णी, संचिता सचिन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डॉ. भारती अभ्यंकर आणि डॉ .लिला सुनिल महापुरे यांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक वनीकरण विभागांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या अमित दळवी, राजू सुर्यवंशी, पॉवर फॉर पिपल्स फाँडेशन गारगोटी, इचलकरंजी नगरपालिका, धनंजय नामदेव सावंत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले. आभार नायब तहसिलदार प्रकाश दगडे यांनी मानले. सुत्रसंचालन श्री. सोनार यांनी केले.

Web Title: Kolhapur news Sadabhau Khot kolhapur development