सुरक्षित विद्यार्थी वाहतूक हाच हवा निकष

लुमाकांत नलवडे
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर - रुईकर कॉलनीत रिक्षा आणि मोटारीचा अपघात झाला आणि पुन्हा एकदा विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांचा प्रश्‍न ऐरणीवर आला. खरोखरच रिक्षामामा योग्य आहे की नाही? नियमावर बोट ठेवले तर आर्थिक गणिताचे काय? अशा अनेक प्रश्‍नांचा ऊहापोह.

कोल्हापूर - रुईकर कॉलनीत रिक्षा आणि मोटारीचा अपघात झाला आणि पुन्हा एकदा विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांचा प्रश्‍न ऐरणीवर आला. खरोखरच रिक्षामामा योग्य आहे की नाही? नियमावर बोट ठेवले तर आर्थिक गणिताचे काय? अशा अनेक प्रश्‍नांचा ऊहापोह.

जिल्ह्यात सुमारे दहा हजारांहून अधिक रिक्षा आहेत. त्यापैकी साधारण आठ-दहा टक्के रिक्षांतून विद्यार्थ्यांची वाहतूक होत आहे. एखादा अपघात झाला की, रिक्षांतून विद्यार्थी वाहतूक धोक्‍याची असल्याची चर्चा होते. मात्र, साधारण आठ-दहा वर्षांपूर्वी झालेल्या अपघातानंतर विद्यार्थी वाहतूक हाच विषय चर्चेत आला. शहर वाहतूक नियंत्रण शाखा, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पालक, रिक्षाचालक, शिक्षक यांच्या बैठका झाल्या. यातील एक बैठक काँग्रेस भवनमध्ये झाली. तेथे पालक समिती आणि रिक्षा संघटना यांच्यात बैठक झाली. सखोल चर्चेनंतर एका रिक्षात दहा मुले घेण्याचा निर्णय तोंडी झाली. याला अधिकृत दुजोरा नाही. मात्र, तेव्हापासून आजपर्यंत एका रिक्षात दहा मुले प्रमाणे विद्यार्थी वाहतूक होत आहे. 

नियम काय आहे?
एका प्रवासी रिक्षामधून १२ वर्षांखालील पाच विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाऊ शकते. ही रिक्षा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे अधिकृत नोंद असणे आवश्‍यक आहे. परिवहन कायद्यानुसार प्रत्येक रिक्षाचे पासिंग वेळेवर झालेले पाहिजे. विमा उतरलेला पाहिजे. रिक्षा पूर्णपणे सुरक्षित पाहिजे. चालकाकडे वाहनचालक परवाना पाहिजे. रिक्षावर विद्यार्थी वाहतूक लिहिलेले पाहिजे.

सध्या काय होते?
एका रिक्षात किमान वीस विद्यार्थ्यांची वाहतूक होते. त्यामुळे रिक्षात विद्यार्थ्यांना बैठकीस अपुरी जागा मिळते. रिक्षाची वाहतूक धोकादायक बनते. वेळेचे नियोजन करण्यासाठी रिक्षाचालकांचा वेग कळत न कळत मर्यादेपेक्षा अधिक वाढतो. यातून केव्हाही अपघात होऊ शकतो. अपघात एकाच रिक्षातील अनेकांच्या जीवावर बेतू शकतो.

आकडे बोलतात...
 जिल्ह्यातील रिक्षांची संख्या     १० हजारांहून अधिक
 शहरातील रिक्षांची संख्या     ८५००
 विद्यार्थी वाहतूक रिक्षा     ७००
 एका रिक्षातून विद्यार्थी वाहतूक     २०
 एकूण विद्यार्थ्यांची वाहतूक     सुमारे १३-१४ हजार
 एकूण रिक्षाचालक-मालक     सुमारे ७००-८००
 शाळांची संख्या     २६-३०

सध्या विद्यार्थ्यांच्या दफ्तराबरोबरच जेवणाच्या डब्याची पिशवी आणि स्पोर्टस्‌चे किट असते. त्यामुळे ते रिक्षाच्या बाहेर येते. त्यालाही पर्याय म्हणून आवश्‍यक दफ्तर आणण्याचा आमचा आग्रह असतो. कालचा अपघात केवळ मोटारचालकाच्या मोबाईलवर बोलण्यामुळे झाला आहे. यामध्ये रिक्षाचालकाचा काहीच दोष नाही. 
- शिवाजी पाटील, अध्यक्ष - विद्यार्थी वाहतूक रिक्षा संघटना.  

विद्यार्थ्यांना नियमित शाळेत पोचविणे, त्यांचा होमवर्क पाहणे, त्यांना सुरक्षित घरी घेऊन जाण्याची जबाबदारी रिक्षामामा प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. पालकांना आर्थिक बोजा पडू नये, रिक्षामामांनाही परवडावे, यासाठी हा सुवर्णमध्य आहे. आमच्या रिक्षा पूर्णपणे सुरक्षित आहेत. दोन्ही बाजूला दरवाजे असतात. पालकांचाही आमच्यावर विश्‍वास आहे.
- शिवाजी पंदारे,
रिक्षाचालक - विद्यार्थी वाहतूक

 जिल्ह्यातील विद्यार्थी वाहतूक सुरक्षित होते की नाही, याची तपासणी मोहीम १५ नोव्हेंबरपासून सुरू केली जाईल. विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर होईल, यासाठी प्रयत्न केले जातील. प्रत्येक विद्यार्थ्याचा जीव महत्त्वाचा आहे. रिक्षाचालकांनीही त्याचा विचार करावा, नियमानुसारच वाहतूक करावी; अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी १५ नोव्हेंबरपासून परिवहन विभागाकडून तपासणी होईल. 
- प्रा. डॉ. डी. टी. पवार,
प्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: Kolhapur News Safe Traffic of student needed