‘सकाळ’च्या कोल्हापूर आवृत्तीचा आज ३७ वा वर्धापन दिन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

केशवराव भोसले नाट्यगृहात रंगणार सोहळा
सायंकाळी पाच - कोल्हापूरचा ‘वारसा व परंपरा’ उलगडणाऱ्या दुर्मीळ वस्तूंचे व वारसास्थळांच्या पेंटिंग्ज प्रदर्शनाचे उद्‌घाटन
सायंकाळी साडेपाच - मुख्य सोहळा, सहा कर्तृत्ववंतांचा गौरव
मुख्य सोहळ्यानंतर स्नेहमेळावा. 

कोल्हापूर - डिजिटल क्रांतीवर स्वार होताना तळागाळातील सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठीही तेवढ्याच खमकेपणाने भूमिका मांडणाऱ्या भविष्यवेधी ‘सकाळ’चा ३७ वा वर्धापन दिन आज (ता. १) दिमाखात साजरा होत आहे. अर्थशास्त्र आणि संत साहित्याचे व्यासंगी व प्रसिद्ध प्रवचनकार अभय टिळक यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत. ‘भारतीय अर्थव्यवस्थेतील स्थित्यंतरे’ या विषयावर ते संवाद साधतील. 

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी साडेपाच वाजता मुख्य सोहळ्याला प्रारंभ होईल. मुख्य कार्यक्रमानंतर स्नेहमेळावा होईल. दरम्यान, वर्धापन दिनानिमित्त ‘परंपरा’ या विषयाला वाहिलेला विशेषांक प्रसिद्ध होत असून विविध माध्यमांतून ‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. गेली ३६ वर्षे कोल्हापुरात एक ऑगस्ट म्हणजे ‘सकाळ’चा वर्धापन दिन हे आगळेपण जपले आहे. वर्धापन दिनानिमित्तच्या व्याख्यानांतून विविध विषयांवर मंथन घडवताना या सोहळ्याला अनेक नामवंत वक्‍त्यांची प्रभावळ लाभली आहे. यंदा तीच परंपरा अभय टिळक पुढे नेणार आहेत. अर्थशास्त्राचे अभ्यासक, स्तंभलेखक, संपादक, संशोधक, संत साहित्याचे व्यासंगी, कीर्तनकार व प्रवचनकार अशी त्यांची बहुआयामी ओळख आहे. ‘अर्थसाक्षरतेचा प्रसार’ हा उद्देश समोर ठेवून ते सतत विविध उपक्रम राबवत असतात. पुण्यातील इंडियन स्कूल ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी या संस्थेचे ते सध्या मानद संचालक असून ‘अर्थबोध पत्रिका’ या मासिकाचे ते संपादक आहेत. ‘शहरी विकासाचे अर्थकारण’ हा त्यांच्या विशेष व्यासंगाचा विषय असून ‘अर्थकारण’ व ‘संत साहित्य’ यावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. गेले वर्षभर देशाच्या अर्थव्यवस्थेत अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले गेले. नोटाबंदीपासून ते ‘जीएसटी’पर्यंतचा प्रवास आणि त्याचे एकूणच परिणाम, अशा विविध अंगांनी ते संवाद साधणार आहेत. दरम्यान, मुख्य कार्यक्रमामध्ये सहा कर्तृत्ववंतांचा गौरवही होणार आहे. 

‘परंपरा’ उलगडणारे प्रदर्शनही
कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘कोल्हापूरचा वारसा आणि परंपरा’ उलगडणाऱ्या दुर्मीळ वस्तूंचे प्रदर्शनही मांडले आहे. नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर कलादालनात सलग तीन दिवस प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील. कोल्हापुरातील वारसास्थळांची पेंटिंग्ज आणि ज्येष्ठ संग्राहक रवींद्र उबेरॉय यांच्या संग्रहातील दुर्मीळ वस्तूंचा या प्रदर्शनात समावेश असून सायंकाळी पाच वाजता महापौर हसीना फरास यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन होईल.

यांचा गौरव
मुख्य सोहळ्यामध्ये सहा कर्तृत्ववंतांचा गौरव होणार आहे. यामध्ये १) ज्येष्ठ योगगुरू डॉ. धनंजय गुंडे, २) मोहन बागान फुटबॉल संघाशी करारबद्ध झालेला फुटबॉलपटू निखिल कदम, ३) गो कार्टिंगचे बादशाह कृष्णराज महाडिक व ध्रुव मोहिते, ४) निसर्गमित्र पराग केमकर, ५) महिला छेडछाडविरोधी समुपदेशन करणारा वुई केअर हेल्पलाईन या महिला ग्रुपचा गौरव होईल.

Web Title: kolhapur news sakal Anniversary