कलरफुल संडे सेलिब्रेशन ...! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 डिसेंबर 2017

कोल्हापूर - मी मोबाईलचे चित्र काढणार आहे... तू शाळेचे काढ, नाहीतर खेळण्याचे... असं निखळ, निर्व्याज आणि बालमनाला साद घालणारं कलरफुल वातावरण... जणू येथे स्पर्धा नाहीच. रेषांचा कागदावरील नृत्याविष्कार आणि रंगांचा उत्सवच हा... बालमित्रांच्या चेहऱ्यांवरील भावविश्‍वही एन्जॉय करत होतं कलरफुल सेलिब्रेशन... निमित्त होतं सकाळ चित्रकला स्पर्धेचं. दरम्यान, "सकाळ' कोल्हापूर आवृत्ती क्षेत्रातील 319 केंद्रांवर ही स्पर्धा रंगली. 

कोल्हापूर - मी मोबाईलचे चित्र काढणार आहे... तू शाळेचे काढ, नाहीतर खेळण्याचे... असं निखळ, निर्व्याज आणि बालमनाला साद घालणारं कलरफुल वातावरण... जणू येथे स्पर्धा नाहीच. रेषांचा कागदावरील नृत्याविष्कार आणि रंगांचा उत्सवच हा... बालमित्रांच्या चेहऱ्यांवरील भावविश्‍वही एन्जॉय करत होतं कलरफुल सेलिब्रेशन... निमित्त होतं सकाळ चित्रकला स्पर्धेचं. दरम्यान, "सकाळ' कोल्हापूर आवृत्ती क्षेत्रातील 319 केंद्रांवर ही स्पर्धा रंगली. 

स्पर्धेचे यंदाचे बत्तीसावे वर्ष आणि त्यातही कोल्हापूर आणि "सकाळ' बालमित्र चित्रकला स्पर्धेचे नाते अतूट. प्रत्येक वर्षी येथे भरभरून या स्पर्धेला प्रतिसाद मिळतो. साहजिकच या निमित्तानं आज जिल्ह्यात बालचित्रकारांची "सकाळ'पासूनच धांदल उडाली. रविवार सुटीचा दिवस असूनही बालमित्रांनी आपापल्या पालकांसोबत शाळा जवळ केल्या.

काहींनी आपल्याच शाळेतर्फे नोंदणी केली, ते शाळांपर्यंत पोचण्याच्या लगबगीत होते. आज तसं दप्तर नव्हतंच सोबत. आज सोबत होत्या फक्त पेन्सिलीच पेन्सिली, खोडरबर आणि रंगांचं साहित्य. सगळं काही आवडीचंच. उगवतीच्या सूर्याची किरणं अंगावर लपेटत ही सारी मंडळी आपापल्या केंद्रावर पोचली. 

सकाळच्या सत्रात सकाळी नऊ ते दहा ही पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा "क' आणि "ड' गटासाठी होती आणि त्यानंतर पहिली ते दुसरी आणि तिसरी ते चौशी अशा "अ' आणि "ब' गटातील स्पर्धा झाली. 

पहिली ते दुसरी गटासाठी "माझे घर', "माझे खेळणे', "माझी शाळा', "माझा मोबाईल' असे तर तिसरी ते चौथी गटासाठी "मी पतंग उडवतो', "किल्ला', "खेळण्यांची दुनिया', "आईस्क्रीमची दुनिया' असे विषय होते. पाचवी ते सातवी गटासाठी "माझा आवडता सण', "जंगल', "रस्ता सुरक्षा', "भाजीवाला - भाजी मंडई' असे तर आठवी ते दहावी गटासाठी "शाळेच्या प्रयोगशाळेत', "पावसातील दृश्‍य', "कॉम्प्युटर गेम', "शेकोटी' असे विषय होते. सर्वच गटासाठी "वन लाईफ लव्ह ईट' असा कॉमन विषय होता. साहजिकच या आवडत्या विषयावर अनेकांनी चित्रे साकारली.

पहिला काही काळ कागदांवर रेषांनीच फेर धरला. त्यातून उमटणारं चित्र स्वतःच्याच मनाला भावत नव्हतं, म्हणून ते पुन्हा खोडलं जात होतं. चित्र पूर्ण होताच ते रंगवायची घाई सुरू झाली आणि ते पूर्ण होताच इतर मित्रांना दाखवलेही जाऊ लागले. एकमेकांच्या चित्रांना शाब्बासकी देणं सुरू झालं. थोडक्‍यात काय तर सारं काही निखळ आणि एकमेकांना आनंद वाटणारं हे वातावरण आणि या संमोहित वातावरणात चित्राविष्कार सजला. 

दरम्यान, पॉवर्ड बाय "लव्ह इट चॉकलेटस्‌ आणि एलआयसी' असणाऱ्या या स्पर्धेचे श्री चैतन्य टेक्‍नो स्कूल आणि जिंगल टून्स सहप्रायोजक होते. गंगर आयनेशन आयकेअर पार्टनर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण पार्टनर तर इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड कॉर्पोरेट पार्टनर होते. संजय घोडावत ग्रुप (कॅंडी स्टार), चाटे कोचिंग क्‍लासेस, महावीर एज्युकेशन सोसायटी यांचेही सहकार्य मिळाले. 

चॉकलेटची दुनिया... अन्‌ पतंगांची काटाकाटीही...! 
सर्वच गटांसाठी "वन लाईफ लव्ह ईट' असा कॉमन विषय होता. अनेकांच्या चित्राविष्कारात चॉकलेटची दुनिया अवतरली तर अनेकांनी "मी पतंग उडवतो' या विषयावर चित्र साकारताना पतंगांची काटाकाटीही चित्रांकित केली. "रस्ता सुरक्षा'सारख्या विषयावर "मी वाहतुकीचे नियम पाळतो, सायकल डाव्या बाजूनेच चालवतो', अशा आशयाचा मजकूरही काहींनी लिहिला आणि तसेच चित्र कागदावर साकारले. 

स्वयंसेवकांची फौज 
सकाळ चित्रकला स्पर्धेसाठी काही केंद्रावर वर्षानुवर्षे स्वयंसेवक म्हणून काम करणारी मंडळी आहेत. यानिमित्ताने ती पुन्हा एकवटली. काही संस्थांनी ठरवून विविध शाळांत आपले कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून पाठवले. प्रायव्हेट हायस्कूल केंद्रावर "एनसीसी'च्या 40 कॅडेटस्‌नी स्वयंसेवक म्हणून काम पाहिले. 

Web Title: Kolhapur News Sakal Chitrakala competition