साखरी-म्हाळुंगेत जलयुक्त शिवारमध्ये अपहार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

शिवसेनेकडून पाहणी - नियमबाह्य कामांचा केला भांडाफोड 
कोल्हापूर - साखरी-म्हाळुंगे (ता. गगनबावडा) येथे झालेल्या जलयुक्त शिवार योजनेतून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याची चुकीची मापे, पीचिंग केलेले नाही, पाणीसाठ्यासाठी योग्य खोदाई नाही, दोन बंधाऱ्यातील अंतर कमी ठेवून लाखोंचा अपहार केल्याचा भांडाफोड शिवसेनेने आज प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन केला. 

शिवसेनेकडून पाहणी - नियमबाह्य कामांचा केला भांडाफोड 
कोल्हापूर - साखरी-म्हाळुंगे (ता. गगनबावडा) येथे झालेल्या जलयुक्त शिवार योजनेतून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याची चुकीची मापे, पीचिंग केलेले नाही, पाणीसाठ्यासाठी योग्य खोदाई नाही, दोन बंधाऱ्यातील अंतर कमी ठेवून लाखोंचा अपहार केल्याचा भांडाफोड शिवसेनेने आज प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन केला. 

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, युवा सेना जिल्हाध्यक्ष हर्षल सुर्वे व शहाजी देसाई यांनी साखरी येथील कामाची मापे घेऊन व चुकीच्या पद्धतीने झालेली कामे प्रसार माध्यमांसमोर आणली. याचा अधिकाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी योग्य समिती नियुक्त करू, पहिले एका व्यक्तीकडे तीन लाख रुपये दिले आहेत, आता एक देतो, पण आंदोलन करू नका, असा प्रस्ताव तालुका कृषी अधिकाऱ्याने ठेवल्यानंतर श्री. पवार यांनी थेट दूरध्वनीवरूनच त्यांना धारेवर धरले. 

साखरी-म्हाळुंगे येथे जलयुक्त शिवारमधून सुमारे २७ लाखांची कामे झाली आहेत. ही कामे भैरेवाडी (ता. पन्हाळा) येथील विनय कोरे मजूर सहकारी संस्था व घुडेवाडी (ता. राधानगरी) येथील सुशांत पोवार हे निविदाधारक आहेत. तालुक्‍यात १८ मातीचे बंधारे केले आहेत. बंधाऱ्याची रुंदी ३५ मीटर हवी असताना ३० मीटरच आहे. ६५ मीटर लांबीऐवजी ५५ मीटर लांबी आहे. दगडी पिचिंगमध्ये मोठा गैरव्यवहार झाला आहे. दगडी पिचिंगमध्ये अर्धे दगड आणि अर्धा जांबा दगड वापरून शासनाची फसवणूक केली आहे. बंधारा मजबूत होण्यासाठी काळ्या मातीचा वापर करावा लागतो, पण काळ्या मातीची एक पाटीही त्यामध्ये दिसत नाही. 

काळी माती टाकल्यानंतर त्यावर रोलर फिरवावा लागतो. त्यात पाणी मारून घट्ट करावे लागते. घट्ट झाल्यानंतर पुन्हा मातीचा थर घेऊन रोलिंग करावे लागते, मात्र यापैकी कोणतेही काम नियमानुसार झालेले नसल्याचे दिसून आले. ज्या ठिकाणी मातीचे ढीग उभे केले आहेत. त्या सर्व ठिकाणची माती पहिल्याच पावसात वाहून जाऊ शकते. बंधाऱ्याची अपेक्षित खोली केलेली नाही. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी साठणार नाही आणि मुरणारही नाही. 
दोन बंधाऱ्यातील अंतर हे २५० मीटर असले पाहिजे; पण हे अंतर १०० ते १५० मीटरवरच आहे.  बंधाऱ्यातील २२ टीसीएमची एका बंधाऱ्याची पाणी क्षमता दिली आहे; मात्र यापेक्षा निम्मेच पाणी साठेल, अशी परिस्थिती आहे.

पाण्याचा सांडवा  पिचिंगच्या समान पातळीवर काढावा लागतो; पण तो पिचिंगच्या दहा फुटांहून अधिक खोल काढला आहे. त्यामुळे पाणी साठणार नाही. हा बंधारा तत्काळ फुटून धोका निर्माण होतो. हे काम गगनबावडा तालुका कृषी अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली करायचे आहे; मात्र ८० टक्के काम नियमबाह्य आणि निकृष्ट झाल्याचे प्रत्यक्ष उदाहरण संजय पवार, हर्षल सुर्वे व शहाजी देसाई यांनी दिले. या वेळी रवी चौगले, आप्पा पुणेकर, प्रवीण पालव व शरद चौगुले उपस्थित होते.

Web Title: kolhapur news sakhari-mhalunge jalyukta shivar appropriation