बनावट कागदपत्राद्वारे प्लॉटची विक्री करून २७ लाखांना गंडा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

कोल्हापूर - बनावट कागदपत्राच्या आधारे प्लॉटची विक्री करून २७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दहा जणांवर गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद रामचंद्र गुंडाप्पा भोसले (वय ३७, रा. सावर्डे, ता. पन्हाळा) यांनी दिली. 

कोल्हापूर - बनावट कागदपत्राच्या आधारे प्लॉटची विक्री करून २७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दहा जणांवर गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद रामचंद्र गुंडाप्पा भोसले (वय ३७, रा. सावर्डे, ता. पन्हाळा) यांनी दिली. 

रामचंद्र पुंडलिक सावरे (३३), बबन पुंडलिक सावरे (३६, दोघे रा. गणेशनगर, शिंगणापूर), प्रशांत शेटे (३५, रा. कळंबा), अभिजित अंबादास बागडे (३५), स्वप्नील जगन्नाथ साळोखे (२८), विनोद ऊर्फ बाळू शिरगावे (३५), रोहन अनिल दाभाडे (२५, सर्व रा. जगतापनगर, पाचगाव), दस्त करून देणारी तोतया व्यक्ती, नसीन महंमद देसाई (४०, नागाव, करवीर) आणि इनायत महंमद जमादार (३८, रा. यड्राव, ता. शिरोळ) या नावांच्या तोतया व्यक्ती अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. 

महावीर बाळासाहेब कापसे यांच्या मालकीचा मौजे बालिंगा (ता. करवीर) येथे २५७.२५ चौरस मीटरचा प्लॉट आहे. कापसे यांच्या नावाची बनावट कागदपत्रे व मतदान ओळखपत्र तयार करण्यात आले. त्यानंतर २९ जून २०१७ ला कापसे यांच्या नावाने तोतयास दुय्यम निबंधक वर्ग २, करवीर क्रमांक २, कसबा बावडा कार्यालयात उभे करण्यात आले. त्याआधारे कापसे यांच्या मालकीचा प्लॉट स्वप्नील साळोखे याच्या नावाने खरेदी करण्यात आला. त्यावर नसीम देसाई आणि इनायत जमादार यांनी साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केल्या. प्लॉट खरेदीचा हा दस्त बनावट आहे, हे माहीत असूनही तो त्यांनी रामचंद्र भोसले यांना विक्री करण्याचे ठरविले.

संशयितांनी २ जानेवारी २०१८ ला कार्यालयीन वेळेत टपाल कार्यालयाजवळील कार्यालयात संचकार पत्र तयार केले. त्यानंतर २९ जानेवारी २०१८ ला कार्यालयीन वेळेत दुय्यम निबंधक, कसबा बावडा कार्यालयात खरेदीपत्र करून संबंधित कापसे यांच्या नावाचा प्लॉट रामचंद्र भोसले यांना परस्पर विक्री केला. त्यापोटी त्या सर्वांनी वेळोवेळी २६ लाख ८४ हजार रुपये भोसले यांच्याकडून घेतले. प्लॉट खरेदीत फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर भोसले यांनी संबंधित दहा संशयितांकडे दिलेल्या पैशांची मागणी केली. पण, उलट सर्वांनी त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. अखेरीस त्यांनी काल (ता. ९) दुपारी याबाबतची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली. प्रभारी पोलिस निरीक्षक तानाजी सावंत तपास करीत आहेत.

 

Web Title: Kolhapur News Sale of plot by fake documents