कोल्हापूरची कुमारी गंगूऽऽऽबाई मॅट्रिक पास

संभाजी गंडमाळे
बुधवार, 30 मे 2018

कोल्हापूर -  सलोनी दैनी... वय वर्षे सोळा... खरं तर एका स्थानिक वाहिनीवरील जाहिरातीतून ‘सतरा पिशव्या अठरा दुकानं’ म्हणत ही गंगूबाई प्रथमच कॅमेऱ्यासमोर आली. तिसऱ्या वर्षांपासून ते आजपर्यंतचा तिचा कॅमेऱ्यासमोरील प्रवास अक्षरशः थक्क करणारा. या साऱ्या प्रवासातही तिचे शिक्षण व अभ्यास सुरूच होता. आज ‘सीबीएसई’ बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल लागला आणि तिने ८५ टक्के गुणांसह परीक्षेतही बाजी मारली.

कोल्हापूर -  सलोनी दैनी... वय वर्षे सोळा... खरं तर एका स्थानिक वाहिनीवरील जाहिरातीतून ‘सतरा पिशव्या अठरा दुकानं’ म्हणत ही गंगूबाई प्रथमच कॅमेऱ्यासमोर आली. तिसऱ्या वर्षांपासून ते आजपर्यंतचा तिचा कॅमेऱ्यासमोरील प्रवास अक्षरशः थक्क करणारा. या साऱ्या प्रवासातही तिचे शिक्षण व अभ्यास सुरूच होता. आज ‘सीबीएसई’ बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल लागला आणि तिने ८५ टक्के गुणांसह परीक्षेतही बाजी मारली. ती कुटुंबीयांसह सध्या भूतान येथे पर्यटनासाठी गेली आहे.

कोल्हापूरची सलोनी सध्या मुंबईतील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. कधी कुणाला तिची कॉमेडी आवडते, कुणाला अँकरिंग, कुणाला तिचा डान्स तर कुणाला तिची ॲक्‍टिंग. वयाच्या सोळाव्या वर्षीच तिच्या नावावर फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीतले दहाहून अधिक पुरस्कार जमा झाले आहेत. ‘क्‍या पाचवी पास हैं हम’ कार्यक्रमाचा पहिलाच प्रोमो तिने शाहरूख खानसोबत शूट केला. अमोल पालेकर दिग्दर्शित हिंदी सिनेमासह ‘नो प्रॉब्लेम’ चित्रपटातही ती भेटली. ‘छोटे मियाँ’ आणि ‘छोटे मियाँ-बडे मियाँ’ या रिॲलिटी शोची ती विजेती ठरली. ‘पा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तर तिने ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांच्याबरोबर लाइव्ह परफॉर्मन्स केला. ‘कॉमेडी सर्कस,’ ‘चक धूम धूम’मधून ती जशी भेटली, तशीच ‘खट्टा मीठा’च्या प्रोमोतूनही भेटली. इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलसाठीच्या शॉर्ट फिल्म्स, ‘दुल्हनियाँ ले जायेंगे,’ ‘इंडियाज गॉट टॅलेंट शो’मध्ये तिचा गेस्ट ॲपिअरन्स होता. सलोनीने ‘यू ट्यूब’वरही ठसा उमटविला.

 जगभरातील भारतीयांत प्रचंड लोकप्रिय असलेल्या आणि सर्वाधिक ‘टीआरपी’चे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये ती दोन वर्षांपूर्वी सहभागी झाली. अस्सल कोल्हापुरी टॅलेंट म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सलोनीने कोपरखळ्या मारण्यात आणि कोट्या करण्यात माहीर असलेल्या कपिल शर्मालाही पोट दुखेपर्यंत हसायला लावले.

आयडॉल सलोनी
कपिल यांना एका मुलाखतीत, ‘तुझे आयडॉल कोण आहेत?’ असा प्रश्‍न विचारला होता. त्या वेळी त्यांनी नाव घेतले होते मेहमूद, जॉनी लिव्हर आणि सलोनीचे. सलोनीमध्ये असलेला निरागसपणा खूप आवडतो, असेही त्यांनी सांगितले होते.

अमुक एवढे मार्क मिळालेच पाहिजेत, असा आग्रह पालकांनी कधीच केला नाही; म्हणून मी अभ्यासात कमी पडले नाही. मिळालेल्या यशाचा अभिमान वाटतो.
- सलोनी दैनी

Web Title: Kolhapur News Saloni Daini Metric Pass