समरजित घाटगेंनी घेतली महाडिकांची भेट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 मार्च 2018

कोल्हापूर - कागलच्या शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आज माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेतली. ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्कात झालेल्या या भेटीत कागलमध्ये दोन्ही घाटगे गटांनी एकत्र यावे, अशी अपेक्षा श्री. महाडिक यांनी यावेळी व्यक्त केल्याचे समजते. 

कोल्हापूर - कागलच्या शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आज माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेतली. ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्कात झालेल्या या भेटीत कागलमध्ये दोन्ही घाटगे गटांनी एकत्र यावे, अशी अपेक्षा श्री. महाडिक यांनी यावेळी व्यक्त केल्याचे समजते. 

दरम्यान, या भेटीच्या निमित्ताने श्री. महाडिक यांनी ‘गोकुळ’च्या आगामी निवडणुकीसाठी जुळवाजुळव सुरू केल्याचे बोलले जाते. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ हे श्री. महाडिक यांच्यासोबत होते. पुढच्या निवडणुकीत त्यांचा तीव्र विरोध राहणार हे निश्‍चित असल्याने त्याच तालुक्‍यातील दोन्ही घाटगेंना एकत्र करण्याची राजकीय खेळी यानिमित्ताने सुरू झाल्याचे बोलले जाते. 

रोज सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत श्री. महाडिक ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्कातील कार्यालयात असतात. आजही नेहमीप्रमाणे श्री. महाडिक या कार्यालयात आले. त्यानंतर काही वेळातच ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे तेथे आले. या दोघांत बंद खोलीत सुमारे तासभर चर्चा झाली. चर्चेचा तपशील समजला 
नसला तरी कागल तालुक्‍यात राजे गट व संजयबाबा घाटगे गट यांनी एकत्र यावे यासाठी प्रयत्न करावा, अशी सूचना श्री. महाडिक यांनी श्री. घाटगे यांना केल्याचे समजते. त्यावर विधानसभा निवडणुकीत पक्ष जी जबाबदारी देईल, त्याप्रमाणे काम करण्याचा ‘शब्द’ श्री. घाटगे यांनी दिला. 

महापालिकेच्या ‘स्थायी’ सभापती निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर ‘मीच जिल्ह्याचा जादूगर’ असे वक्तव्य श्री. महाडिक यांनी केले होते. त्याला ‘जादूगरांना मग विधानपरिषद का वाचवता आली नाही?’ असे प्रत्युत्तर आमदार हसन मुश्रीफ यांनी दिले होते. त्यावरून या दोघांतही मतभेद सुरू झालेत, हे लपून राहिलेले नाही. आमदार सतेज पाटील यांच्याशी मैत्रीचे संबंध असतानाही २०१५ मध्ये झालेल्या ‘गोकुळ’च्या निवडणुकीत श्री. मुश्रीफ यांनी श्री. महाडिक यांना साथ दिली. विधानसभेत ‘गोकुळ’चे संचालक रणजितसिंह पाटील यांनी मदत केल्याने त्याची परतफेड म्हणून आपण हा निर्णय घेतल्याचा खुलासा श्री. मुश्रीफ यांनी त्यावेळी केला होता. ‘गोकुळ’च्या पुढच्या निवडणुकीत श्री. मुश्रीफ विरोधात असणार याची जाणीव श्री. महाडिक यांनाही झाली आहे. त्यातूनच कागल तालुक्‍यातील दोन घाटगेंना एकत्र करून ‘गोकुळ’मधला आपला मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न यातून सुरू आहे. 

विधानसभेसाठी बेरजेचे राजकारण
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात श्री. महाडिक यांचे पुत्र अमल हे आमदार आहेत. २०१४ च्या निवडणुकीत राजे गटाची ताकद तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या मागे होती. त्यामुळे मतदारसंघातील इतर गावांत श्री. पाटील पिछाडीवर असताना ‘शाहू-कागल’च्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या या मतदारसंघातील गावांत त्यांना मोठे मताधिक्‍य मिळाले. परंतु, ते पराभव वाचवू शकले नाहीत. समरजितसिंह हे आता भाजपसोबत आहेत. दक्षिणमधील किमान १२ ते १४ गावांत त्यांचा प्रभाव आहे. त्यांची ही ताकद आगामी निवडणुकीत मुलामागे राहावी, हेही बेरजेचे राजकारण श्री. महाडिक यांच्या या भेटीतून दिसून येते.

Web Title: Kolhapur News Samarjeet Ghatge Meet Mahadevrao Mahadik