भाजप सरकार भांडवलधार्जिणेच - संभाजी जगदाळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

कोल्हापूर - ‘‘भारतीय जनता पक्ष सरकार सत्तेत येऊन चार वर्षे झाली तरी सर्वसामान्यांचे जगणे सुसह्य होईल, असा कोणताही धोरणात्मक निर्णय झाला नाही. उलट भांडवलदारांचेच भले करण्यात मोदी सरकार गुंतले आहे. अशा सरकारला जागे करण्यासाठी लोकांनी संघटित व्हावे,’’ असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते संभाजीराव जगदाळे यांनी येथे केले.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाण पक्ष, जनता दल सेक्‍युलर आदी पक्षांतर्फे शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकात ‘जन एकता-जन अधिकार आंदोलन’ याविषयी जनजागृती सभेत ते बोलत होते.

श्री. जगदाळे म्हणाले, ‘‘भाजप सरकार सत्तेत आल्यापासून देशात धार्मिक उन्माद वाढला आहे. त्यातून भेदाभेद टोकाला गेला. सामाजिकस्तरावर अशांतता निर्माण झाली. अशात शिक्षणविषयक धोरणे कमकुवत करण्यातही सरकारचा पुढाकार राहिला. दलित दुर्बल घटकांवरील अन्याय-अत्याचारात वाढ झाली. या सर्व घटना पाहता सरकार समाजाचे भले करील, यावर विश्‍वास ठेवणे मुश्‍कील झाले आहे.’’ भाकप नेते सतीशचंद्र कांबळे, नामदेव गावडे, अनिल चव्हाण, शंकर कराळे उपस्थित होते.

भाजपच्या सत्ताकाळात नोटबंदी झाली, जीएसटी कर असे विषय चर्चेत आणले. त्यातून सामान्याला त्रास सोसावा लागला. याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेकडो परदेस दौरे केले. त्यातून सामान्य लोकांचे हित साधले गेले, असे काही घडले नाही. सरकारला जागे करण्यासाठी जनआंदोलन उभे करण्यात येत आहे. 
- संभाजी जगदाळे, 

नेते, शेतकरी कामगार पक्ष

आज मोटारसायकल रॅली
डाव्या पक्षांतर्फे जनएकता आंदोलन जनअधिकार आंदोलनाचा भाग म्हणून आज (ता. २३) सायंकाळी पाचला जनजागृती मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. सायंकाळी पाचला बिंदू चौकातूनही रॅली निघेल.

Web Title: Kolhapur News Sambhaji Jagdale Comment