संस्कृत दिनदर्शिका आता परदेशात...!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

कोल्हापूर - संस्कृत जतन व संवर्धनासाठी सात वर्षांपूर्वी सुरू झालेला संस्कृत दिनदर्शिकेचा उपक्रम आता ग्लोबल झाला आहे. कोल्हापूर मेड असणाऱ्या या दिनदर्शिकेला परदेशातूनही मागणी वाढली आहे. यंदा अमेरिकेतून तीनशे दिनदर्शिकांची मागणी आली आहे.

कोल्हापूर - संस्कृत जतन व संवर्धनासाठी सात वर्षांपूर्वी सुरू झालेला संस्कृत दिनदर्शिकेचा उपक्रम आता ग्लोबल झाला आहे. कोल्हापूर मेड असणाऱ्या या दिनदर्शिकेला परदेशातूनही मागणी वाढली आहे. यंदा अमेरिकेतून तीनशे दिनदर्शिकांची मागणी आली आहे. दरम्यान, संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी येथे ‘संस्कृतभारती’च्या माध्यमातून विविध उपक्रम सुरू असून ७ जानेवारीला जनपद संमेलन होणार आहे.

सात वर्षांपूर्वी संस्कृत दिनदर्शिकेची संकल्पना येथील कार्यकर्त्यांनी सुचविली आणि सुरुवातीला फक्त एक हजार प्रती काढल्या. पुणे विभागांतर्गत कोल्हापूर येत असल्याने दिनदर्शिकेचे प्रकाशन पुण्याच्या पत्त्यावर होते. संस्कृतमध्ये पीएचडी केलेले डॉ. चंद्रकांत कुलकर्णी दिनदर्शिकेचे स्वरूप निश्‍चित करतात आणि छपाईही कोल्हापुरातच होते. 

प्रत्येक महिन्याच्या पानावर संस्कृतमधील काही मंत्र, वचने, श्‍लोक आणि कुठल्याही वयोगटातील लोकांना समजतील अशी फळे, फुलांची संस्कृत नावे, सचित्र कथा, महापुरुषांची माहिती प्रसिद्ध केली जाते. वारंवार हे पान नजरेसमोर राहिल्याने किमान काही शब्दांची माहिती होईल आणि त्यातून संस्कृत भाषेची गोडी लागेल, हाच त्यामागील प्रमुख उद्देश आहे.

‘संस्कृतभारती’च्या या उपक्रमाबाबत कोल्हापूर अध्यक्ष जयवंत गायकवाड, सचिव अतुल प्रभावळेकर, खजानीस विनायक केखलेकर यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘दिनदर्शिकेच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. चेन्नईपासून आसामपर्यंत गेल्या वर्षीपर्यंत मागणी होती आणि आता परदेशातूनही मागणी येत आहे. त्यामुळे यंदा पहिल्या टप्प्यात दहा हजार दिनदर्शिकांची छपाई केली आहे. मागणी वाढल्यास आणखी छपाई करून त्यांचे वितरण केले जाणार आहे.’’

संस्कृत भाषा आत्मसात केल्यानंतर त्याचे अनेक फायदे आहेत. संस्कृत मंत्रोपचार आरोग्यासाठीही उपयुक्त ठरतो. त्यामुळेच वेद पठण करणारे पंडित अगदी सत्तर-ऐंशीव्या वर्षानंतरही तरुणांना लाजवेल, अशा सळसळत्या ऊर्जेने कार्यरत असतात. त्यामुळे सात जानेवारीला विवेकानंद कॉलेजच्या बापूजी साळुंखे स्मृतिभवनात होणाऱ्या जनपद संमेलनाला अधिकाधिक कोल्हापूरकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Kolhapur News Sanskrit Calendar