सरोज ग्रुपचे नाव सातासमुद्रापार...

अभिजित कुलकर्णी
मंगळवार, 15 मे 2018

उद्योगनगरी म्हणून देश-विदेशांत नावलौकिक मिळविलेल्या कोल्हापूरच्या उद्योगात आता तिसरी पिढी आली आहे. शिस्त, कौशल्याच्या जोरावर लाखांची उलाढाल कोट्यवधीत पोचली आहे. मंदीसह अनेक उन्हाळे-पावसाळे झेलत कोल्हापूरच्या उद्योजकांनी सातासमुद्रापार आपला झेंडा फडकविला. उद्योगातील तीन पिढ्यांची वैशिष्ट्ये आजपासून...

नागाव - वाहन उद्योगातील सिलिंडर हेड हे सर्वांत क्‍लिष्ट आणि अवघड काम म्हणून ओळखले जाते. अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्यांनाही कोडे पडावे असे हे काम. कोल्हापूरच्या एका अशिक्षिताने त्यावर प्रावीण्य मिळविले आणि कोल्हापूरचे नाव सातासमुद्रापार पोचविले. म्हणूनच कोल्हापूरच्या औद्योगिक जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या उद्योग समूहातील शृंखलेत बापूसाहेब जाधव यांच्या ‘सरोज ग्रुप ऑफ कंपनीज’ला विशेष महत्त्व आहे. 

औद्योगिक क्षेत्रात या उद्योग समूहाने ५५ वर्षे पूर्ण केली आहेत. ज्येष्ठ उद्योजक (कै.) बापूसाहेब ऊर्फ परशुराम शंकरराव जाधव यांनी १९६३ मध्ये उद्यमनगर येथे भाड्याच्या जागेत ‘सरोज आयर्न’ या नावाने उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. 

पॅटर्न मेकिंगचे रोजंदारीवर काम करणारे बापूसाहेब अल्पावधीतच ‘आयर्न मॅन’ म्हणून ओळखले जाऊ लागले. अशिक्षित बापू अनुभवाच्या शिदोरीवर उच्च शिक्षितांचेही गुरू ठरले. दीपक, अजित आणि भरत या तीन मुलांनी आणि त्यांच्या पाठोपाठ आता बापूंचे नातू शंतनू यांनीही त्यांचा हा वारसा यशस्वीपणे सांभाळला आहे. 

सिलिंडर हेड आणि हाउसिंग उत्पादनात गुणवत्ता, सेवा आणि विश्वासार्हता यांमुळेच ‘सरोज ग्रुप’ला विशेष महत्त्व आले आहे.

कास्टिंग उत्पादनात तीनशे कोटींची उलाढाल
वर्षाला पंधरा हजार टन कास्टिंग उत्पादन करून तीनशे कोटींची उलाढाल करणारा उद्योग समूह म्हणूनही याचा औद्योगिक क्षेत्रात लौकिक आहे. पॅटर्न मेकिंगमधील सीडी स्कॅनर, फौंड्रीमधील सॅण्ड रिक्‍लेमेशन प्रकल्प, रोबोटिक्‍स फेटलिंग आणि ड्रिलिंग, ऑटो पोअरिंग अशी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित मशिनरी कोल्हापुरात सर्वप्रथम स्वीकारणारा उद्योग म्हणूनही सरोज ग्रुपचे नाव घेतले जाते.

देश-विदेशांतील प्रमुख ग्राहक कंपन्या
प्रमुख ग्राहक कंपन्यांत कमिन्स इंडिया, एस्कॉर्ट, इंटरनॅशनल ट्रॅक्‍टर, भारत अर्थमूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल), किर्लोस्कर ऑइल इंजिन, ग्रीव्हज, कॅमको यांना व ॲरो स्पेशालिटी (यूएसए) आणि नॉर्म ब्रिम्स (जर्मनी, दक्षिण आफ्रिका) यांचा समावेश आहे. 

वैशिष्ट्ये...
 यूएसए, जर्मनी, दक्षिण आफ्रिका येथे निर्यात
 पंधराशे समाधानी कामगार
 निर्णय क्षमता, कंपनी अंतर्गत शिस्त 
 ३०० कोटींची उलाढाल

Web Title: Kolhapur News Saroj Group success story