महाडिकांचा सतेज पाटील यांना शह

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

कोल्हापूर - देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स सोसायटीच्या (जनता बझार) निवडणुकीत आज घडलेल्या नाट्यपूर्ण घडामोडीनंतर दोन्ही गटांनी एकत्र येऊन जाहीर केलेल्या पॅनलमधील आमदार सतेज पाटील समर्थकांना वगळून आज माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी नव्या पॅनलची घोषणा केली. पॅनलचे प्रमुख म्हणून काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांची घोषणा करण्यात आली असून, त्यांचे पुत्र माजी नगरसेवक सचिन यांना पॅनलमधून वगळण्यात आले. 

कोल्हापूर - देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स सोसायटीच्या (जनता बझार) निवडणुकीत आज घडलेल्या नाट्यपूर्ण घडामोडीनंतर दोन्ही गटांनी एकत्र येऊन जाहीर केलेल्या पॅनलमधील आमदार सतेज पाटील समर्थकांना वगळून आज माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी नव्या पॅनलची घोषणा केली. पॅनलचे प्रमुख म्हणून काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांची घोषणा करण्यात आली असून, त्यांचे पुत्र माजी नगरसेवक सचिन यांना पॅनलमधून वगळण्यात आले. 

दरम्यान, समर्थकांना वगळल्याच्या पार्श्‍वभूमीवर या निवडणुकीतील आपली भूमिका आमदार सतेज पाटील हे उद्या (ता. २८) जाहीर करणार आहेत. श्री. पाटील यांच्याकडून विरोधी पॅनलची घोषणा होण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास या निवडणुकीत आमदार पाटील विरुद्ध महाडिक असा सामना रंगण्याची शक्‍यता आहे. 

या निवडणुकीतील अर्ज माघारीची प्रक्रिया मंगळवारी (ता. २५) संपली. त्यानंतर काल (ता. २६) ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दोन्ही गटांचे संचालक व नेते एकत्र आले. दिवसभर यावर चर्चा होऊन रात्री दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार विकास पॅनलच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात माजी नगरसेवक सचिन चव्हाण, अजित पवार आदी आमदार पाटील समर्थकांची नावे होती. पण, आज पुन्हा श्री. महाडिक यांच्या उपस्थितीत प्रल्हाद चव्हाण, उदय पोवार, बाळासाहेब कुंभार यांची राजाराम कारखान्यावर बैठक झाली. त्यात काल जाहीर केलेल्या पॅनलमधून श्री. चव्हाण यांचे पुत्र सचिन, माजी नगरसेवक अजित पवार, कल्लाप्पा कांबळे, ज्योती पाटील यांना वगळून त्यांच्या जागी अनुक्रमे अरुण साळोखे, मधुकर चित्रुक, रविकिरण चौगले व तृप्ती शिंदे यांची नावे समाविष्ट करण्यात आली. 

पत्रकार परिषदेत या पॅनलची घोषणा करण्यात आली. या वेळी नगरसेवक नाना कदम, किरण शिराळे, कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव माने, संचालक दिलीप पाटील आदी उपस्थित होते. या पॅनलमधून आमदार पाटील समर्थकांना वगळल्याने त्यांच्याकडून विरोधी पॅनेलची उभारणी केली जाण्याची शक्‍यता आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने श्री. पाटील सध्या मुंबईत आहेत. उद्या (ता. २८) ते कोल्हापुरात येत असून, कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारांशी चर्चा करून त्यांच्याकडून पुढील निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

नाना उलपे यांच्यासाठी आग्रह
या पॅनलमध्ये आमदार पाटील समर्थक रमेश ऊर्फ नाना उलपे यांना घ्यावे, यासाठी आग्रह सुरू होता. पण, यापूर्वी जाहीर केलेल्या पॅनलमधून पाटील समर्थक अजित पवार, कल्लाप्पा कांबळे यांनाच वगळल्याने ही तडजोड मान्य न झाल्याचे स्पष्ट होते. 

प्रल्हाद चव्हाण महाडिकांबरोबर
जिल्ह्याच्या राजकारणात आमदार सतेज पाटील यांच्याबरोबर असलेले काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण हे आज या निवडणुकीसाठी माजी आमदार महाडिक यांच्याबरोबर दिसले. पॅनलची घोषणा झाल्यानंतर एकत्रित छायाचित्र काढतानाही श्री. महाडिक यांनी श्री. चव्हाण यांच्या खांद्यावर हात टाकून छायाचित्रासाठी पोझ दिली. 

पॅनलचे उमेदवार असे ः
अ वर्ग- उदयकुमार देसाई, दीपक शिराळे, प्रल्हाद चव्हाण, शिवाजी बापूसो घाटगे, उदय भोपळे, बाळासाहेब महारुद्र कुंभार, अरुण यशवंत साळुंखे, मधुकर पांडुरंग चित्रुक, ‘क’ वर्ग- प्रकाश मारूतराव खुडे, ‘ब’ वर्ग- प्रकाशराव बोंद्रे, ‘ड’ व ’ई’ वर्ग- उदय पवार, मधुकर शिंदे, सुहास प्रकाश बोंद्रे, तृप्ती मधुकर शिंदे. महिला प्रतिनिधी- ललिता जयवंत माळी, विद्या मधुकर माळी. इतर मागासवर्गीय- मदन बंडोपंत चोडणकर. अनुसूचित जाती- रविकिरण सुदाम चौगुले. भटक्‍या विमुक्त जाती- तानाजी धोंडिराम साजणीकर.

Web Title: kolhapur news satej patil