बुद्धिबळाच्या पटावर "सतेज' चाल...! 

संदीप खांडेकर
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेची संलग्नता रद्द होते ना होते, तोच बुद्धिबळाच्या पटावर आमदार सतेज पाटील यांनी चाल केली आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी राहिलेले माजी मंत्री (कै.) दिग्विजय खानविलकर यांचा मुलगा व असोसिएशनचे अध्यक्ष विश्‍वविजय खानविलकर यांनाच त्यांनी शह दिला आहे. ऑल मराठी चेस असोसिएशनच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाल्याने बुद्धिबळाच्या पटावर ते कोणाला आता चेकमेट करणार, याची उत्सुकता आहे. असोसिएशनने संलग्नता मिळविण्यासाठी ऑल मराठी चेस असोसिएशन महाराष्ट्रकडे अर्ज दाखल केला आहे. 

कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष धनंजय महाडिक आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयात असताना त्यांनी प्रा. संभाजी पाटील यांच्याकडून कबड्डीचे प्रशिक्षण घेतले. पुढे तेच असोसिएशनचे अध्यक्ष झाले. मात्र, ते जरी अध्यक्ष असले, तरी आमदार पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळविला होता. त्यांची ही धोबीपछाड कुणाच्याच लक्षात आली नाही आणि 2013 ला नेटक्‍या संयोजनात ही स्पर्धा झाली. दिवसरात्र प्रकाशझोतात झालेल्या स्पर्धेने कोल्हापूरकरांना कबड्डीचा थरार अनुभवता आला हे विशेष. श्री. पाटील यांच्याकडे कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्षपद आहे. सुमारे एक तप ते या पदावर आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 2006 ला 16 वर्षांखालील, तर 2008 ला राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा झाली होती. 

कोल्हापूर जिल्हा बॉक्‍सिंग असोसिएशनचे अध्यक्षपदसुद्धा त्यांच्याकडेच आहे. सुमारे 22 वर्षे हे पद त्यांच्याकडे आहे. विविध स्तरावरील स्पर्धा आयोजनात त्यांनी पुढाकार घेतल्याचे सचिव मंगेश कराळे यांनी स्पष्ट केले. 

श्री. पाटील हे राजकारणाच्या पटलावर अनेक डाव-प्रतिडाव टाकतात. बुद्धिबळ असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष होऊन त्यांनी क्रीडाप्रेमींना धक्का दिला आहे. भारतीय बुद्धिबळ महासंघ व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्यातील संघर्षात महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनाच बरखास्त झाली आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेत ऑल मराठी असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा त्यांनी खांद्यावर घेतली आहे. त्यामुळे या पटावर कोणते डाव खेळणार, याची उत्कंठा आहे. 

संलग्नतेसाठी अर्ज दाखल 
कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे भरत चौगुले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ""ऑल मराठी चेस असोसिएशनचे सचिव संजय केडगे यांच्याशी आम्ही संपर्क साधला आहे. त्यांनी अद्याप कुणालाच संलग्नता दिलेली नाही, असे सांगितले आहे. ज्या जिल्हा संघटनांना स्पर्धा आयोजनाचा, खेळाच्या प्रचाराचा अनुभव आहे, त्या संघटनांना संलग्नता मिळेल, अशी चिन्हे आहेत. संलग्नतेसाठी आम्हीसुद्धा अर्ज दाखल केला आहे. आम्हाला संलग्नता मिळू शकते.'' 

Web Title: kolhapur news satej patil