तलवार तळपत ठेवा, आम्ही पाठीशी - सतेज पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

कोल्हापूर - लोकसभेसाठी प्रा. संजय मंडलिक यांनी तलवार काढलीच आहे. ती कायम तळपत ठेवा, आम्ही त्यांच्या मागे उभे आहोत, असे आश्‍वासन काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी येथे दिले.

कोल्हापूर - लोकसभेसाठी प्रा. संजय मंडलिक यांनी तलवार काढलीच आहे. ती कायम तळपत ठेवा, आम्ही त्यांच्या मागे उभे आहोत, असे आश्‍वासन काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी येथे दिले.

दरम्यान, सवंग लोकप्रियतेसाठी (कै.) सदाशिवराव मंडलिक यांनी कधी कृषी प्रदर्शन घेतले नाही. नऊ कोटींचा रेडा आणला नाही की नटनट्या नाचवल्या नाहीत, या शब्दात राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी त्यांच्याच पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांना नाव न घेता टोला लगावला. प्रा. मंडलिक यांनीही आता आपली भूमिका लवकर जाहीर करावी, असे आवाहनही त्यांनी केले.  

महापालिकेतर्फे सायबर चौक-शिवाजी विद्यापीठ ते कळंबा फिल्टर हाऊस या रिंग रोडचे ‘लोकनेते कै. सदाशिवराव मंडलिक मार्ग’ असे नामकरण श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुश्रीफ होते. महापौर स्वाती यवलुजे उपस्थित होत्या.

श्री. पाटील म्हणाले, ‘‘(कै.) मंडलिक यांची जिल्ह्याच्या प्रत्येक प्रश्‍नात लक्ष देण्याची भूमिका प्रेरणादायी आहे. लोकांशी नाळ जुळलेले असे हे नेते होते. (कै.) मंडलिक यांच्यानंतर काल डॉ. पतंगराव कदम यांचे निधन झाले. आमचे कान धरू शकणारी, ही दोन दिग्गज माणसे आज नाहीत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे; पण त्यांचा आदर्श ठेवून आपल्याला काम करावे लागेल.’’

आगामी लोकसभा निवडणुकीबाबत श्री. पाटील म्हणाले, ‘‘प्रा. संजय मंडलिक पूर्वी गुळगुळीत बोलायचे; पण आज त्यांनी पहिल्यांदा खासदारांची कळ काढली, हे बरे झाले. शत्रू निश्‍चित असला की लढाई ठरते. आता तुम्ही तलवार काढलीच आहे, तर ती तळपत ठेवा. आम्ही तुमच्यासोबत आहोत.’’

ते म्हणाले, ‘‘गेल्या दोन-तीन वर्षांत फार मोठा निधी विकासाला येईल, असे वाटले होते; पण प्रश्‍नच जास्त विचारले गेले. आता प्रश्‍नांचा आकडा दोन-तीन हजारांवर गेला असेल; पण यातील प्रश्‍न सुटले किती, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. संसदेत प्रश्‍न विचारणारी एक संस्था आहे. त्या संस्थेला लेटरपॅडवर सही करून दिली की काम झाले, असे मला खासदार राजू शेट्टी यांनीच सांगितले आहे. त्यामुळे हा प्रश्‍न संशोधनाचा विषय आहे. ज्या भूमीतून आपण निवडून गेलो, त्याठिकाणचे प्रश्‍न सुटलेच पाहिजेत. चांगल्या गोष्टी होतील, असे वाटले होते; पण तसे झाले नाही. यापुढे हातात हात घालून (कै.) मंडलिक यांचे अपुरे असलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज राहा.’’

श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘‘मी १९८५ पासून (कै.) मंडलिक यांच्या संपर्कात आलो. त्यानंतर शेवटची लोकसभा सोडता त्यांचा सेनापती म्हणूनच काम करण्याची संधी मला मिळाली. (कै.) मंडलिक म्हणजे विचाराशी कधीही तडजोड न करणारा नेता. लोकांना चांगले वाटावे, असे ते कधी करत नव्हते. आपल्याला जे आवडेल, तेच करण्याच्या त्यांच्या सवयीमुळे ते सामान्य लोकांच्या गळ्यातील ताईत बनले.’’

‘सवंग लोकप्रियतेसाठी त्यांनी कधी कृषी प्रदर्शन घेतले नाही. नऊ कोटींचा रेडा आणला नाही की नटनट्या कधी नाचवल्या नाहीत, असा टोला खासदार महाडिक यांना नाव न घेता लगावून श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘‘खिशात पाच पैसे नसले तरी (कै.) मंडलिक निवडणुकीसाठी तयार असायचे. आहे ते रोखीने राहिलेले उधार यामुळे ते कधी निवडणूकच हरले नाहीत. समोरचा कितीही भेसळ करणारा असला तरी ते कधी डगमगले नाहीत. विचारांचा पक्का, मनाने आणि छातीनेही निर्भीड असा हा नेता हातात घेतलेले काम कितीही किंमत मोजावी लागली तरी ते पूर्ण करणाराच हा बाणा त्यांनी आयुष्यभर जपला.’’

या वेळी महापौर स्वाती यवलुजे, माजी महापौर ॲड. महादेवराव आडगुळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर, नगरसेवक भूपाल शेटे, ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. अनिल घाटगे यांनी स्वागत केले. वीरेंद्र मंडलिक यांनी आभार मानले. उपमहापौर सुनील पाटील, माजी महापौर आर. के. पोवार, अश्‍विनी रामाणे, मारुतराव कातवरे, ॲड. सुरेश कुराडे, मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार, नगरसेविका प्रज्ञा उत्तुरे आदी उपस्थित होते. 

मंडलिकांनी फोडला प्रचाराचा नारळ
कार्यक्रमानिमित्ताने प्रा. मंडलिक यांनी लोकसभेच्या प्रचाराचाच नारळ फोडला आहे. आता प्रा. मंडलिक यांनी आपली भूमिका लवकर जाहीर करून कामाला लागावे. सतेज पाटील व मी तुमच्यासोबत आहेच, असेही श्री. मुश्रीफ म्हणाले.
 
कै. मंडलिकांसोबत ‘स्वाभिमानी’
कै. मंडलिक यांनी २००९ ची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील मातब्बर नेते विरोधात असताना स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांच्यासोबत होती. शेतकऱ्यांप्रती (कै.) मंडलिक यांची असलेली भूमिका यामागे होती. त्यातून त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी सांगितले.
 
आम्ही आधीच कळ काढलीया
प्रा. मंडलिक नेहमीप्रमाणे गुळगुळीत बोलतील, असे वाटले होते; पण त्यांनीच आता त्यांची (खासदार महाडिक) कळ काढली आहे. मी व मुश्रीफ यांनी यापूर्वीच त्यांची कळ काढली आहे. आता तुम्ही फक्त मरगळ झटका, असे आवाहन सतेज पाटील यांनी प्रा. मंडलिक यांना केले.

Web Title: Kolhapur News Satej Patil comment